Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19
February 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
कोरोना
काळाच्या लढाईत मास्क हीच ढाल असून, नागरिकांनी मास्क वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळ्यानंतर
ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार
छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शिवजयंतीसारखे सगळेच उत्सव मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा
लागला असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले. नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल
त्यांनी आभार मानले.
दरम्यान,
नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ
पुतळ्यास विविध पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
उस्मानाबाद
इथं शिवजयंतीनिमित्त श्री साई परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं.
****
देशात
केवळ एका महिन्यात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आलं. काल सहा लाख
५८ हजार लोकांना लस टोचण्यात आली.
राज्यात
काल ८४१ लसीकरण केंद्रामधून एकूण ४८ हजार सहा लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आलं. राज्यात
आतापर्यंत एकूण आठ लाख ३० हजार ३४५ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आल्याचं आरोग्य विभागानं
सांगितलं.
****
दरम्यान,
देशात काल १३ हजार १९३ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९७ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी नऊ लाख ५०
हजार ५०० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. तर काल दहा हजार ८९६ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६७ हजार
८४५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ३७ हजार ३४२ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
राज्यात
कोविडमुळे प्रलंबित असलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत
बोलत होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी बालेवाडी
इथं १० कोटी रुपये खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत
विद्यापीठाचं उपकेंद्र पुणे, रत्नागिरी, नांदेड आणि औरंगाबाद मध्ये स्थापन केलं जाईल;
तसंच प्रबोधनकार अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.
****
भंडारा
जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी दोन
परिचारिकांवर भंडारा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत आकस्मित मृत्यूची नोंद होती. आठ जानेवारीला ही दुर्घटना घडली
होती.
****
राज्यात
काल बर्ड फ्लू मुळे १७१ पक्ष्यांचा मृत्यू झाला. मृत पक्ष्यांचे नमुने पुण्याच्या आणि
भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान,
बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात कोंबड्या नष्ट करणं, अंडी आणि पोल्ट्री नष्ट केल्यामुळे
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानापोटी सरकारनं तीन कोटी ३८ लाख १३ हजार रुपये निधी जारी
केला आहे.
****
महाराष्ट्र
राज्य सहकारी बँकेतल्या कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह
६५ संचालकांना क्लीन चीट मिळाली आहे. याप्रकरणी राज्याच्या सहकार विभागानं चौकशी समिती
स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. या चौकशी
समितीच्या अहवालात अजित पवार यांच्यासह तत्कालीन ६५ संचालकांना क्लीनचीट देण्यात आल्याची
माहिती उच्चपदसथ अधिकाऱ्यांकडून मिळाली.
****
परभणी
जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या रामपुरी बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये ‘माझा गाव
सुंदर गाव’ आणि ‘आमचा गाव आमचा विकास’ या अभियानांतर्गत तालुक्यातल्या सरपंच, ग्रामसेवक
आणि ग्रामस्थांसाठी संवाद कार्यक्रम घेण्यात आला. परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. यावेळी टाकसाळे यांनी
गावातली शाळा, अंगणवाडीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
****
नांदेड
जिल्ह्यात आज पहाटे पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, करडई, ज्वारी, कापूस,
टरबूज, खरबूज, आंब्यासह भाजीपाला बागांचं मोठं नुकसान झालं आहे. काल किनवट तालूक्यातील
सिंदखेडा शिवारात गुराख्याचा वीज पडून मृत्यू झाला.
हिंगोली
जिल्ह्यातही आज पहाटेपासून पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड
इथं ‘सृजनलोक कला न्यास’ आणि ‘राष्ट्रीय पुरातत्व संस्थे’च्या संयुक्त विद्यमानं आयोजित
सृजनमुद्रा - २०२१ या मुद्राचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री
पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
****
No comments:
Post a Comment