Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20
February 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२० फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
· छत्रपती शिवाजी
महाराजांचा इतिहास जगभर पोहचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार - किल्ले शिवनेरीवर
शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
· छत्रपती शिवाजी
महाराजांची ३९१ वी जयंती कोविड नियमांचं पालन करत उत्साहात साजरी.
· पेट्रोल डिझेलला
पर्याय म्हणून इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर वाढवणं आवश्यक - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन
गडकरी.
· पेट्रोल पंपावरुन
डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी औरंगाबाद पोलिसांकडून जेरबंद.
· राज्यात काल सहा
हजार ११२ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात आठ रुग्णांचा मृत्यू तर नव्या ३८६ रुग्णांची
नोंद.
आणि
· मराठवाड्यात अवकाळी
पावसानं रबी पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान; तत्काळ पंचनामे करून, नुकसान भरपाई देण्याची
शेतकरी वर्गाची मागणी.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहचवण्यासाठी
शक्य ते सर्व प्रयत्न करू असं आश्वासन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या, शिवनेरी किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीनं मोजक्या
लोकांच्या उपस्थितीत काल शिवजन्म सोहळा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री
अजित पवार, खासदार युवराज संभाजी छत्रपती, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सोहळ्याला
उपस्थित होते.
राज्यभरात काल सर्वत्र कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून
छत्रपती शिवाजी महाराजांना ३९१व्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत शिवाजी पार्क इथं तर विधान भवनात विधान परिषदेचे सभापती
रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
यांनी शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज
यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहरातल्या क्रांतीचौक इथं शिवरायांच्या पुतळ्याला
विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. बजाज कामगार
संघटनेनं शिवनेरीवरुन आणलेल्या शिव ज्योतीचं पूजन यावेळी करण्यात आलं. गडवाट संघटनेच्या
वतीनं या ठिकाणी किल्ले शिवनेरीची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराजांच्या
पुतळ्यांवर, आर आर पाटील फांऊडेशनच्या वतीनं हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात
आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु
डॉ. प्रमोद येवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं. यावेळी प्र-कुलगुरु श्याम शिरसाट यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित
होते.
दरम्यान, शिवराय ही महाराष्ट्राची सुरक्षित ठेव असून
प्रत्येकाने महाराजांचा हा उज्ज्वल इतिहास समर्थपणे पुढे नेण्याचे काम करावं, असं आवाहन
प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण यांनी
केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं डॉ पठाण यांचं ‘शिवरायांची
राजनीती, रणनीती आणि धर्मनीती’ या विषयावर काल ऑनलाईन व्याख्यान झालं, त्यावेळी ते
बोलत होते.
****
लातूर इथं शिवप्रेमींनी कोविड नियमाचं पालन करत, शिवजयंती
उत्साहाने साजरी केली. आमदार धीरज देशमुख यांनी शिवाजी चौक इथं महाराजांच्या अश्वारूढ
पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. ग्रीन लातूरच्या वतीनं हरित प्रभात फेरी काढण्यात
आली. महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त शहीद उद्यान, पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात
३९१ शोभिवंत फुलझाडं लावण्याच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
****
जालना शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली. विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांच्या
पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
****
नांदेड इथं सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या
वतीनं शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात
आली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना
अभिवादन केलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
****
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीत
शिवजयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात अपंग कल्याण निधीतून ५ टक्के आरक्षित रक्कम
७५ अपंगांना वाटप करण्यात आली. या सर्वांना प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण दीड
लाख रुपये वाटप करण्यात आलं. कळमनुरी इथं वकील संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना
अभिवादन करण्यात आलं.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात विविध पक्ष, संघटनांच्या वतीनं
शिवरायांना अभिवादन करण्यात आलं. शनिवारबाजारातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. फेटेधारी
ध्वजधारी युवक-युवती, पारंपारिक वेषभुषेतले गोंधळी, भजनी मंडळं, आणि शिवप्रेमी या मिरवणुकीत
सहभागी झाले. शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत एक सजीव देखावा शोभायात्रेत
लक्षवेधी ठरला. जिंतूर इथं राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या आगारात विनाअपघात सेवा बजावणाऱ्या
चालकांचा काल शिवजयंतीचं औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं काल तुळजाभवानी
मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. उस्मानाबाद इथं शिवाजी महाराजांच्या
प्रतिमा तसंच पुतळ्यांना अभिवादन करण्यासह श्री साई परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबीर
घेण्यात आलं. अनेक शिवप्रेमींनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं शिवाजी चौकात ध्वजारोहण
आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. कोविड काळात
उल्लेखनीय कार्य केलेल्या कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
****
पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून पुढच्या १० वर्षात
इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर वाढवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री
नितीन गडकरी यांनी केलं आहे. कोविड-19 वर पतंजलीच्या औषधाची घोषणा काल दिल्लीत करण्यात
आली. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी पतंजलीचे बाबा रामदेव, केंद्रीय आरोग्य मंत्री
हर्षवर्धन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशात इलेट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी
अधिक प्रयत्न होण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या
अनुषंगानं बोलताना, संपूर्ण विश्वाला दिशा देण्याची ताकद भारतीय आयुर्वेदात असल्याचं
गडकरी म्हणोल.
****
जनतेला पेट्रोल दरवाढीच्या संकटातून सोडवण्यासाठी
राज्य आणि केंद्र सरकारने परस्पर समन्वयातून करकपात करण्याचं आवाहन, माजी केंद्रीय
मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत येत नसल्यामुळे त्यावर विविध करांची आकारणी केली
जाते. केंद्र आणि राज्य दोन्हीचे कर असल्यामुळे पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहे. यातून
दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून त्या अनुषंगाने विचार करत असल्याचं प्रभू यांनी
सांगितलं. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलियम पदार्थांवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली
जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय
टोळीला औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
कन्नड तालुक्यात एका पथकरनाक्यावर गुजरातकडून वाळू भरुन येणाऱ्या गाड्यांची तपासणी
करत असतांना चार ट्रक, त्यांचे चालक आणि क्लिनर अशा एकूण १४ जणांना ताब्यात घेण्यात
आलं. ही टोळी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी डिझेलच्या टाकीतून हातपंपाचा
वापर करून डीझेल चोरत होती. चोरलेल्या डिझेलच्या कॅन वाळू वाहतुकीच्या ट्रकमध्ये लपवून
ओळखीच्या ट्रकचालकांना स्वस्त दरात डिझेलची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली
आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यात या टोळीनं ५६ पेक्षा जास्त ठिकाणी डिझेल
चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकाला उत्कृष्ट कामगिरीसाठी ३५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
****
राज्यात काल सहा हजार ११२ नव्या कोविड रुग्णांची नोंद
झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ८७ हजार ६३२ झाली
आहे. काल ४४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ७१३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४८ शतांश टक्के
झाला आहे. काल दोन हजार १५९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९
लाख ८९ हजार ९६३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक
३२ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ४४ हजार ७६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला, तर नव्या ३८६ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
४ तर नांदेड, परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १५८ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात
६१, लातूर ४८, नांदेड ४५, बीड ३०, हिंगोली १६, उस्मानाबाद १५, तर परभणी जिल्ह्यात १३
नवे रुग्ण आढळले.
****
मराठवाड्यात लातूर, परभणी, हिंगोलीसह अनेक भागात कालही
जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांतल्या या अवकाळी पावसानं रबी पिकांचं मोठं नुकसान
झालं असून, नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
बीड जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे
आंबा, डाळिंब, पपई, तसंच द्राक्षबागांचं आणि ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांचं मोठं
नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी
अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे
काढणीला आलेल पीक आडवं झालं आहे. हरभरा, ज्वारी आणि गहू पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
हवेतल्या गारठ्यामुळे पिकांवर रोगराईची भीती वर्तवली जात आहे.
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात लिंबा तसंच परभणी
तालुक्यात सिंगणापूर भागात गारांच्या पावसानं तडाखा दिला. आंबा, गहू तसंच अन्य पिकांचं
मोठं नुकसान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यात या पावसामुळे गहू, हरभरा, तूर आणि
हळद पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारी,
हरभरा तसंच आंबा मोसंबी पपई या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागांचे
तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी
पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेला गहू, हरभरा, करडई, ज्वारी, आंबा बागा तसंच
भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक
विमा कवच घेतलं आहे, त्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची माहिती छायाचित्रासह विमा कंपनीकडे
तत्काळ पाठवावी, असं आवाहन प्रा.शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी केलं आहे
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात तिडी पिंपळगाव
इथले शेतकरी आश्रोबा भागवत यांच्या लहान-मोठ्या शंभर कोंबड्या बर्ड फ्ल्यूची लागण होऊन
दगावल्या आहेत. गुगळी धामणगाव इथले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गाडीलवार यांनी ही माहिती
दिली. तलाठी यशवंत सोडगीर यांनी या घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघात रस्ते
विकासासाठी १२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून मतदारसंघातल्या १४० किलोमीटर लांबीच्या
७ रस्त्यांच्या कामासाठी ८० कोटी रुपये निधीची मागणी केली होती. यापैकी पहिल्या टप्प्याचा
निधी मिळाला आहे. उर्वरित निधी मार्च महिन्यानंतर मंजूर केला जाईल असं आश्वासन गडकरी
यांनी दिल्याचं, आमदार पवार यांनी सांगितलं आहे.
****
‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’अंतर्गत गर्भवतींना
बुडीत मजुरीचा लाभ सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयातून मिळवून द्यावा, असं आवाहन औरंगाबादचे
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी केलं आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात
जिल्हास्तरीय सुकाणू तसंच सनियंत्रण समितीची बैठक गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली काल
झाली, त्यावेळी ते बोलत होते. ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात असल्याबद्दल
संबंधित विभागातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं.
****
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत
स्थापन बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शिस्त
येत आहे. ही बाब लक्षात घेऊन काल उस्मानाबाद इथं १५ महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना
उमेद अंतर्गत ३४ लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं. बचत गटांना विविध व्यवसायासाठी
लागणारी सगळी तांत्रिक मदत उमेद अभियानाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचं तालुका
समन्वयक राहुल मोरे यांनी सांगितलं तर आत्तापर्यंत देण्यात आलेल्या कर्जांची परतफेड
बचत गटांनी वेळेवर केली असल्याची माहिती तालुका अभियान व्यवस्थापक अभिजीत पडवळ यांनी
दिली.
****
बीड जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांचं निराकरण
करण्यासाठी विविध विभागांनी तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
रविंद्र जगताप यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत
ते बोलत होते. समस्यांच्या निराकरणासाठी नियमित बैठका घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी
जगताप यांनी केली.
****
No comments:
Post a Comment