Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 March 2021
Time 7.10am to 7.25am
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २४ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर तपासणी, निगराणी आणि उपचार प्रक्रिया अधिक कठोर पद्धतीनं लागू
करण्याचे राज्यांना अधिकार
** देशात एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना, कोविड लस
देण्याचा निर्णय
** राज्यात २८ हजार ६९९ कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ५१ रुग्णांचा मृत्यू तर चार हजार ८३१ नवे बाधित
** मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा
निर्णय घटनात्मक असल्याचा केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा
** मनसुख हिरेन यांच्या हत्येत सचिन वाझेचा सहभाग उघड
** राज्यातल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातल्या
कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांची केंद्रीय गृहसचिवांकडे मागणी
आणि
** पहिल्या एक दिवसीय क्रिकेट
सामन्यात भारताचा इंग्लंडवर ६६ धावांनी विजय
****
केंद्रीय गृहमंत्रालयानं कोविड संदर्भात
नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एक एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत हे आदेश
लागू असतील. काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार
आणि केंद्रशासित प्रदेशांना, तपासणी, निगराणी आणि उपचार प्रक्रिया अधिक कठोर पद्धतीनं
लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्ती कोविड प्रतिबंधक नियमाचं पालन
करत असल्याकडे लक्ष देण्याची सूचना, सर्व राज्य सरकारांना करण्यात आली आहे. तसंच लसीकरण
प्रक्रियेला वेग देण्यासही सांगण्यात आलं आहे. यापूर्वी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं
काटेकोर पालन करण्याची सूचना, केंद्रीय गृहमंत्रालयानं केली आहे.
****
देशात एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयापेक्षा
अधिक वयाच्या सर्व नागरिकांना, कोविड लस दिली जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना
ही माहिती दिली. यापुढे कोविड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमध्ये चार ते आठ आठवड्यांचं
अंतर असेल, असं त्यांनी सांगितलं. देशात कोविडच्या दोन्ही लसींचा पुरेसा साठा असून,
सर्वांनी आपलं नाव नोंदवून लस घ्यावी, असं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.
दरम्यान, ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना
कोविड लस देण्याची मागणी मान्य केल्याबद्दल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र
सरकारचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या
मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती. ही
मागणी मान्य झाल्यानं आता राज्यात लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.
****
राज्यात काल २८ हजार ६९९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या २५ लाख ३३ हजार २६ झाली आहे. काल १३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
५३ हजार ५८९ झाली असून, मृत्यूदर
दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल १३ हजार १६५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात
आतापर्यंत २२ लाख ४७ हजार ४९५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८८ पूर्णांक ७३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ३०
हजार ६४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ८३१ कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद झाली, तर ५१ रुग्णांचा
या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २५, नांदेड जिल्ह्यातल्या १०, जालना जिल्ह्यातल्या सहा, परभणी जिल्ह्यातल्या पाच, लातूर आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर
हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ७९१ रुग्ण
आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ३३०, जालना जिल्ह्यात ५५३, लातूर ४४१, परभणी २७०, बीड २०७, उस्मानाबाद
१३० तर हिंगोली जिल्ह्यात १०९ नवे
रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव
रोखण्यासाठी रुग्ण व्यवस्थापन चोखरित्या करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांनी दिले आहेत. ते काल जिल्हा सामान्य रुग्णालयात घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
लक्षणं नसलेल्या तसंच सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना कोविड सुश्रुषा केंद्रात पाठवावं,
आणि उपचारांची जास्त गरज असलेल्या रुग्णांना मिनी घाटीतील रुग्णखाटा उपलब्ध होतील याची
खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली. या रुग्णालयात उपलब्ध एकूण रुग्ण खाटा, अतिदक्षता
विभागातल्या रुग्णखाटा, तसंच रिक्त खाटा याबाबतची अद्ययावत माहिती रुग्णालयाच्या दर्शनी
भागात लावण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान, औरंगाबाद शहरात रात्रीची संचारबंदी आणि टाळेबंदीचं
उल्लंघन केल्याप्रकरणी तीन पेट्रोल पंप आणि एका हॉटेलवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कारवाई केली.
****
औरंगाबाद शहरात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या
देखभालीसाठी दररोज २०० रुपये प्रमाणे, दहा दिवसांची दोन हजार रुपये फी घ्यावी, असे
आदेश महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. खासगी डॉक्टर प्रत्येक
रुग्णाकडून दहा हजार रुपये फी घेतात, मात्र यापुढे खासगी डॉक्टरांनी ऑनलाईन उपचार केले,
तर दोन हजार रुपये फी घ्यावी, असं पांडेय यांनी म्हटलं आहे. खासगी प्रयोगशाळा कोविड
चाचणी करण्यासाठी अवाजवी शुल्क आकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर पांडेय यांनी औरंगाबाद
शहरातल्या सर्व खासगी प्रयोगशाळांना कोविड चाचणी करण्यास आणि घरी जाऊन स्वॅब घेण्यास
बंदी घातली आहे.
****
लातूर शहरातले सर्व व्यापारी, व्यावसायिक
आणि दुकानदारांच्या कोविड चाचण्या करून घेण्याचे आदेश, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी. यांनी दिले आहेत. या चाचण्यांसाठी महानगरपालिकेनं ४ केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून
दिली आहे. आठ दिवसांच्या कालावधीत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कोविड चाचणी करून घेण्याचं
आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
****
मुस्लिम धर्मियांचं आगामी शब-ए-बारात उत्सव,
कोणत्याही प्रकाच्या मिरवणुकांचं आयोजन न करता, मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करून साजरे
करण्याची सूचना, राज्य सरकारनं केली आहे. मशिदीत नमाज पठणाकरीता गर्दी करून नये, ४०
ते ५० व्यक्तींनी टप्प्या-टप्याने शारीरिक अंतराच्या नियमांचं पालन, तसंच मास्कचा वापर
करून दुवा पठण करावं, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत
घेतलेला निर्णय घटनात्मक असल्याचा दावा केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
काल सलग सातव्या दिवशी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं आपली बाजू मांडली. हे आरक्षण
मंजूर करण्याचा महाराष्ट्र सरकारला अधिकार आहे, असं केंद्र सरकारच्या वतीनं महाधिवक्ता
तुषार मेहता यांनी सांगितलं. त्यांनी मराठा समाजाला शिक्षण तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये
आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं.
****
मनसुख हिरेन यांच्या हत्येत सचिन वाझे
याचा सहभाग उघड झाला असून, सचिन वाझेचा ताबा घेण्यासाठी २५ तारखेला राष्ट्रीय
तपास संस्था - एनआयए न्यायालयात अर्ज करणार असल्याचं, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक
-एटीएस प्रमुख जयजीतसिंग यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याचा जबाब नोंदवला असून, तो चुकीचा असल्याचे
पुरावे मिळाले आहेत, त्या संदर्भात अधिक चौकशीसाठी सचिन वाझे यांचा ताबा हवा असल्याचं,
त्यांनी सांगितलं. पोलिस कर्मचारी विनायक शिंदे याचेही हत्येत सहभागाचे पुरावे मिळाले
असून, यासाठी वापरलेलं सिमकार्ड, नरेश रमणिकलाल नावाच्या बुकीकडून मागवण्यात आल्याची
माहिती जयजीतसिंग यांनी दिली. या गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, सिम कार्ड तसंच काही सीसीटीव्हीचं
चित्रीकरण वाझे याने नष्ट केल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. या चौकशीत इतरही अनेक नावं
समारे आली असून, तपासानंतर आणखी काही जणांना अटक होणार असल्याचं एटीएस प्रमुखांनी सांगितलं.
****
राज्यातल्या आयपीएस
अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातल्या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे केली
आहे. फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत
केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. आपल्याकडे असलेली सगळी
कागदपत्रं आणि पुरावे आपण गृहसचिवांना दिले, राज्य सरकारकडे
हे सगळे दस्तऐवज असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही, हे
त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, असं फडणवीस यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. या
सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून योग्य ती कारवाई करू, असं गृहसचिवांनी सांगितल्याची माहिती, फडणवीस यांनी दिली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी
व्हावी यासाठी गरज पडली तर न्यायालयातही दाद मागू असं ते
म्हणाले
****
राज्यात कर्करोग प्रतिबंधासाठी
मार्गदर्शक प्रणाली टाटा रुग्णालयानं तयार करावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी
केलं आहे. कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते
बोलत होते. औरंगाबाद इथल्या कर्करोग रुग्णालयावरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी, जालना इथं टाटा रुग्णालयाचं क्षेत्रीय केंद्र उभारावं, असं टोपे यांनी सांगितलं. या क्षेत्रीय केंद्रामध्ये मुखकर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग, याविषयी
तपासणी, निदान आणि उपचाराची व्यवस्था करता येऊ शकते, असं टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सांगितलं.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
संचालक मंडळाच्या निवडणुकीत, ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या गटाला २१ पैकी १०
जागा, तर ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर गटाला नऊ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे नेते
गणेश रोकडे स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजयी ठरले. तर पूर्णेतून बालाजी देसाई हे बिनविरोध
निवडून आले, हे दोन्ही उमेदवार कोणत्या गटाचे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँक संचालक मंडळ निवडणुकीत, माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांची बिनविरोध निवड
झाली आहे.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या एक दिवसीय
क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ६६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पाहुण्या
संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला बोलावलं. भारतीय संघानं ३१७ धावा करत, इंग्लंडसमोर
३१८ धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा संघ
४३व्या षटकांत, २५१ धावांतच तंबूत परतला. कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांना
उत्कृष्ट खेळासाठी पुरस्कार देण्यात आला. तर
शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला पुढचा सामना शुक्रवारी २६ मार्चला
होणार आहे.
****
लातूर महानगरपालिकेच्या मालमत्ता करावर १२
टक्के सवलतीची अभय योजनेची मुदत, उद्या २५ मार्चला संपते आहे. त्यापूर्वी नागरिकांनी
मालमत्ता कराची थकबाकी, तसंच चालू कराचा भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन
महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात वीज
देयकाची वसुली थांबवण्याची मागणी, संभाजी ब्रिगेडनं केली आहे. या मागणीचं निवेदन देण्यासाठी
गेलेल्या कार्यकर्त्यांनीं उपकार्यकारी अभियंता गैरहजर असल्यानं, त्यांच्या खुर्चीला
चपलांचा हार घालून निवेदन चिकटवलं. ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या
नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात याआधीच
मंजुरी मिळालेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती देऊन,
संबंधित कामं वेळेत पूर्ण करावित, असे निर्देश पाणी पुरवठा
आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. उमरगा तालुक्यातल्या मुरुम
इथल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला, सुधारीत प्रशासकीय
मान्यता देण्यासंदर्भात काल मंत्रालयात, बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
//********//
No comments:
Post a Comment