Tuesday, 23 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 March 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 March 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.

****

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृह सचिवांकडे करणार असल्याचं, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शरद पवारांनी काल पत्रकार परिषद घेत परमबीर सिंग यांचे दावे खोटे असल्याचं सांगितलं, पवार यांच्या म्हणण्यानुसार देशमुख विलगीकरणात होते, मात्र त्या दिवसांमध्ये त्यांनी प्रवास केल्याची नोंद आहे, यावरुन शरद पवारांना चुकीची माहिती दिली गेली, असं फडणवीस म्हणाले. पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि पैशाची देवाणघेवाण झाल्याचा प्रकार, गेल्यावर्षी पोलिसांच्या तपासात उघड झाला होता. तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी त्याबाबतचा अहवाल पुराव्यानिशी राज्य सरकारला सादर केला होता. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं असतानाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ स्वतःचं सरकार वाचवण्यासाठी या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप, फडणवीस यांनी केला. आज सायंकाळी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन त्यांना हा अहवाल आणि पुरावे सादर करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.  

****

देशात आतापर्यंत चार कोटी ८४ लाख लोकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. काल देशभरात ३२ लाख ५३ हजार नागरीकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

दरम्यान, देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६७ शतांश टक्के इतका झाला आहे. काल २९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी ११ लाख रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल नव्या ४० हजार ७१५ रुग्णांची नोंद झाली, तर १९९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या जवळपास तीन लाख ४५ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   

****

कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधलं अंतर वाढवून चार ते आठ आठवडे करण्याची सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. या आधी लसीच्या दोन मात्रांमधलं हे अंतर चार ते सहा आठवडे होतं. लसीकरणासंदर्भातल्या तांत्रिक सल्लागार गटानं याबाबत सूचना केली होती. ही सूचना फक्त कोविशिल्ड लसीसाठीच लागू असेल, कोवॅक्सीन लसीसाठी ही सूचना नाही, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात राज्यांनी आवश्यक जनजागृती करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ मार्चला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग असेल.

****

ट्रंपोलिन आणि टंबलिंन या खेळाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावल्याचं बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला औरंगाबाद गुन्हे शाखेनं अटक केली आहे. आरोपींमध्ये निवृत्त क्रिडा उपसंचालक, क्रिडा अधिकारी, पाटबंधारे विभागाचा कारकुन आणि एका एजंटचा समावेश आहे. या सर्वांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी २५ हजार ते तीन लाख रुपये किंमतीने २६८ जणांना बोगस प्रमाणपत्र विकलं होतं.

****

औरंगाबादचे तहसीलदार सुरेश देशमुख यांना दीड लाख रुपयाची लाच घेताना काल पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पथकानं काल एमटीडीसी कार्यालयात ही कारवाई केली. वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी महिन्याला हप्ता म्हणून देशमुख यानं तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.

 

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या राणीसावरगांव इथं, मंडळ अधिकारी बालाजी लटपटे आणि वाघदरा इथले सरपंच गोविंद सानप या दोघांना, तक्रारदाराकडून साडेबारा हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. तक्रारदाराच्या नावे शेती करण्यासाठी लटपटे आणि सानप या दोघांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाच मागितली होती.

 

उस्मानाबाद इथं राशन दुकानदारांसह नायब तहसीलदार यांना सहा हजार ७०० रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. टाळेबंदीच्या काळात केलेल्या मोफत धान्य वाटपाचे बिल काढून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

जागतिक जल दिनानिमित्त परभणी जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, काल मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत जल शपथ देण्यात आली. २२ ते २७  मार्च दरम्यान कॅच द रेन या उपक्रमाअंतर्गत जलजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून, यात पाण्याचे स्रोत बळकट करणं, भूजल पुनर्भरण करणं, जलस्त्रोतांचं पुनर्जीवन करणं, सांडपाणी व्यवस्थापन, पुनर्भरण आणि पुनर्वापर करणं, असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पुणे इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघात सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, महंमद सिराज आणि कृणाल पंड्या या नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.    

//*************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...