Tuesday, 2 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.03.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 March 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक०२ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या १२ आमदारांची नावं घोषित झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळे घोषित करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका.

·      विधान परिषदेवर आमदारांच्या नियुक्त्यांसाठी विदर्भ तसंच मराठवाड्यातल्या जनतेला ओलीस धरू नका- विरोधी पक्षाची मागणी.

·      पेट्रोल- डिझेलच्या दर वाढीवरुन काँग्रेसचं सायकल आंदोलन.

·      ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांच्या कोविड लसीकरणास प्रारंभ, उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसंच शरद पवार यांनी घेतली लस.

·      राज्यात सहा हजार ३९७ नवे रुग्ण तर मराठवाड्यात आठ जणांच्या मृत्यूसह ६४७ बाधित.

·      हिंगोली जिल्ह्यात आठवडाभराची कडक संचारबंदी लागू.

आणि

·      औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समीतीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द.

****

विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या १२ आमदारांची नावं घोषित झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळे घोषित केली जातील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्यानंतर सभागृहात विरोधी पक्षांनी त्याला कडाडून विरोध केला. विधानसभेत काल या महामंडळासंदर्भात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना पवार यांनी मराठवाडा, विदर्भाच्या विकासासाठी विकास मंडळे झालीच पाहिजे, हीच राज्य सरकारची भूमिका आहे. त्यानुसार येत्या अर्थसंकल्पात ही मंडळं अस्तित्वात आहेत असे गृहीत धरुनचं निधीचं वाटप केलं जाईल, असं स्पष्ट केलं. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी, राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पवार यांच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, या विधान परिषदेवर आमदारांच्या नियुक्त्या हा राज्यपाल आणि सरकार यांच्यातला मुद्दा आहे, त्यासाठी विदर्भ तसंच मराठवाड्यातल्या जनतेला ओलीस धरू नये, असं सांगत, सर्व विरोधकांसह सभात्याग केला.

****

दरम्यान, विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. कोविड प्रतिबंधासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेत, कोविड योद्ध्यांना राज्यपालांनी अभिवादन केलं. सीमा भागातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही, त्यांनी दिली. मंदावलेली अर्थव्यवस्था, शिधावाटपासह शिवभोजन, शेतकरी अर्थ साहाय्य, महसुलात लक्षणीय घट, नैसर्गिक आपत्ती, विविध प्रकारच्या मदतीपोटी पंधरा हजार कोटी रुपयांची राज्यभरात मदत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न, हे मुद्देही त्यांनी आपल्या भाषणात मांडले.

 

काँग्रेसचे भाई जगताप यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिक्षक सदस्य विक्रम काळे आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी अनुमोदन दिलं. या प्रस्तावावर आज आणि उद्या चर्चा होणार आहे.

 

अर्थ राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत २०२०-२१ च्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अधिवेशनासाठी तालिका अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. गोपीकिशन बाजोरिया, सतीश चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर यांचा समावेश आहे. विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका अध्यक्षांची नावं जाहीर केली, यामध्ये संजय शिरसाट, राजन साळवी, अशोक पवार, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.

दोन्ही सदनात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

****

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि अन्य नेते काल सायकलवरून विधान भवनात पोहोचले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन झालं. मंत्रालयासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या सर्वांनी हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक घेऊन निदर्शनंही केली.

****

पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरून सत्ताधारी पक्ष करत असलेलं आंदोलन हा निव्वळ फार्स असल्याची टीका, विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. देशातल्या अनेक राज्यांच्या तुलनेत पेट्रोलचे दर महाराष्ट्रात लीटरमागे दहा रुपयांनी जास्त आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. केंद्र सरकार पेट्रोलवर घेत असलेल्या करापैकी ४२ टक्के कर राज्याला परत करतं, त्यामुळे पटोले यांच्या नेतृत्वात झालेलं हे आंदोलन, राज्य सरकारच्या विरोधातलं होतं, असं फडणवीस म्हणाले. वाढीव वीज देयकं आणि वीज जोडण्या खंडीत करणं, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, विधानसभाध्यक्ष निवडणूक, या मुद्यांवरून फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.

****

गतवर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपूर्त केला. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, मुंबईच्या ईलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीननं मालवेअर टाकला असल्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीनं २८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या अहवालात ही बाब नमूद असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

****

६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांचं कोविड लसीकरण, कालपासून सुरू झालं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी चेन्नईत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत जे.जे. रुग्णालयात जाऊन लस घेतली.

****

राज्यात काल सहा हजार ३९७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ६१ हजार ४६७ झाली आहे. काल ३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १८४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४१ शतांश टक्के झाला आहे. तर काल पाच हजार ७५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख ३० हजार ४५८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७७ हजार ६१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या ६४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २२५ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १७८, नांदेड ९०, बीड ५२, लातूर ४१, परभणी २८, हिंगोली २४, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आठ नवे रुग्ण आढळून आले.

****

हिंगोली जिल्ह्यात कालपासून आठवडाभराची कडक संचारबंदी लागू झाली. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातल्या एसटी बस आगारातल्या सर्व बस वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून जाणाऱ्या बसच्या वाहतुकीला मात्र परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार हिंगोली, कळमनुरी, आखाडा बाळापुर, तसंच वसमत या बसस्थानकामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर चाचणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत हिंगोली बसस्थानकात तपासलेल्या प्रवाशांपैकी चार जण कोविड बाधित आढळले आहेत. दिवसभरात सुमारे दीडशे प्रवाशांची चाचणी करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात कोविड लसीकरण केंद्रांवर कालपासून ६० वर्षावरील नागरिकांना कोविड लस देण्यास सुरवात झाली. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात माजी आरोग्यमंत्री रजनी सातव यांनी कोविड लस घेतली.

****

परभणी जिल्ह्यातही ६० वर्षांवरील नागरिक तसंच ४५ वर्षांवरील अनुषंगिक आजार असलेल्या व्यक्तींना, कालपासून कोविड लस देण्यास सुरवात झाली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयासह सर्व ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयं, तसंच महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना इत्यादी अंतर्गत नोंदणीकृत केंद्रातही कोविड लसीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, जिल्हा प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. शहरातल्या एका वसतीगृहात गेल्या आठवड्यात ४५ विद्यार्थी कोविडग्रस्त आढळले होते, या पार्श्वभूमीवर शहरातल्या सगळ्याच वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ सुधा राजूरकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली

लातूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका वसतीगृहावर मोठ्या संख्येने मुलं पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही इथे ज्यांना लक्षणं आहेत, सगळ्यांची टेस्टिंग करत आहोत. इथे १०२ हॉस्टेल्स आहेत. मॅग्झीमम बालक बाहेर गावाहून इथे ट्युशनसाठी येतात. तर प्रादुर्भाव अजून होऊ नये, वाढू नये याचा खबरदारीचा उपाय म्हणून इथे टेस्टिंग केली आहे. त्यांचे रिपोर्ट जीएमसीकडून जसे आम्हाला येतील, तसे आवश्यकतेनुसार आम्ही आमची टेस्टिंग वाढवू. त्याच्यासाठी महानगरपालिकेची आमची सर्व टीम सुसज्ज आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्रावांचा नमुना विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेत पाठवला जात आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर बाधित विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवायचं की कोवीड केंद्रात, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

****

बीड इथं अकरा लसीकरण केंद्रावर ७९ जेष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. सकाळी लसीकरण अॅप मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं उशिरा नोंदणी सुरू झाली.

दरम्यान, बीड जिल्ह्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या जास्त संपर्कात येणारे भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, दूध विक्रेते यासह इतर व्यावसायिकांच्या अँटिजेन चाचणीचं नियोजन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातले सर्व दुकानदार, व्यापारी तसंच व्यावसायिकांनी अँटीजेन चाचणी करून घ्यावी असं आवाहन, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केलं आहे. व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी काल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना शासनानं कोविड लस द्यावी, अशी मागणी केली, यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले.

****

परभणी इथं काल विनामास्क फिरणाऱ्या ११४ नागरिकांविरोधात कारवाई करून, २३ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्या वतीनं आयोजित, कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत योजनेच्या जनजागृती अभियानाला लातूर जिल्ह्यात कालपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी या बहुमाध्यम प्रदर्शन वाहनाचं उद्घाटन केलं. लातूर इथल्या मुक्ताई बहुउद्देशीय सेवा भावी संस्था तसंच सर्वधर्म समभाव कला मंडळाच्या कलापथकानं, यावेळी जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये पुढचे दहा दिवस या बहुमाध्यम वाहनाद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

****

औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समीतीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द केला. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारी याचिका राधाकीशन पठाडे आणि अन्य १३ संचालकांनी दाखल केली होती. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनानं घ्यावा, त्या दरम्यान या संचालक मंडळानं कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असा आदेश खंडपीठानं दिला आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा तसंच तुळजाभवानी साखर कारखान्यासह जिल्हा मध्यवर्ती बँक उर्जितावस्थेत आणण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशन काळात संबंधितांची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात, या वर्षी वाढलेल्या ऊस लागवड क्षेत्रामुळे शेतकरी सभासदांसाठी हे दोन्ही कारखाने सुरू करणे आवश्यक असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

****

इंग्रजीचा अधिकाधिक सराव करून घेण्यासाठी छोट्या गोष्टी, संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारं अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. त्या काल जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा आढावा तसंच पुढील नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली. 

****

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा तसंच इसापूर उजव्या कालव्या मार्फत पाणीपाळ्यांचे नियोजन जलसंपदा विभागानं जाहीर केलं आहे. यानुसार दोन्ही कालव्यातून पहिली पाणीपाळी काल एक मार्च रोजी, दुसरी पाणीपाळी २७ मार्चला, तिसरी २३ एप्रिलला तर चौथी पाणीपाळी १९ मे रोजी सोडण्यात येईल. इच्छुकांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात तसंच विहीत दिनांकापूर्वी संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. विनापरवानगी पाणी उपसा केल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाईचा इशारा कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी दिला आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला प्रारंभ झाला. मौजे आळणी इथल्या जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड, यांच्या उपस्थितीत, बालकांना जंतनाशक औषधी देऊन ही मोहीम सुरू झाली. येत्या आठ मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

****

जालना जिल्ह्यात जाफ्राबाद हद्दीत मौजे गोपी शिवारात कांद्याच्या पिकात लावलेली अफूची झाडं पोलिसांनी ताब्यात घेतली. कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या पथकासह पोलिसांनी ही कारवाई केली. सुमारे ११ लाख रुपयांची ४० किलो झाडं पोलिसांनी जप्त केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...