Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात
येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा
अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि
तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
प्राणवायू तसंच औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारांनी ठोस पावलं
उचलण्याचे पंतप्रधानांचे निर्देश
**
कोविड लसींचा राज्याला शाश्वत तसंच नियमित पुरवठा होण्याची गरज मुख्यमंत्र्याकडून व्यक्त
**
आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास बंदी आदेशानुसार औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा बंद
आणि
**
औरंगाबाद इथं आज २१ कोविड बाधितांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे एक हजार २१० रुग्ण
****
प्राणवायू
तसंच औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारांनी ठोस पावलं उचलण्याचे
निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. कोविड संसर्ग अत्यधिक असलेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही पंतप्रधानांनी
आज दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी हे निर्देश दिले.
या चर्चेत महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, गुजरात, दिल्ली,
राजस्थान, कर्नाटक, आणि तामिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. सर्व
राज्यांमध्ये प्राणवायूची वाहतुक विनाव्यत्यय तसंच कमीत कमी वेळेत होत असल्याचं राज्य
सरकारांनी सुनिश्चित करावं, या टँकर्सना रस्त्यात कुठेही अडवलं जाऊ नये, असं मोदी यांनी
सांगितलं. केंद्र सरकार राज्यांना सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन पंतप्रधानांनी
सर्व मुख्यमंत्र्यांना दिलं. सर्व राज्यांनी एकत्र येवून काम केल्यास, कोणत्याही संसाधनाचा
तुटवडा भासणार नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं. अतिदक्षता कक्षातल्या रुग्णखाटांची
संख्या तसंच कोविड उपचारांसाठीच्या अन्य सुविधा वाढवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी
विशेष भर दिला. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी आणि सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निश्चित
करण्याकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं, याचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ऑक्सिजनची
निर्मिती करणाऱ्या देशातल्या प्रमुख उत्पादकांशीही मोदी यांनी आज चर्चा केली. वैद्यकीय
वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धतेचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
दरम्यान,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बोलताना, महाराष्ट्राला अधिक प्राणवायूची
गरज असून रेमडीसीवीरचा पुरेसा पुरवठा करण्याची आवश्यकता व्यक्त केली. देशात कोविड लसीकरणात
महाराष्ट्र अग्रेसर असून, कोविड लसींचा राज्याला शाश्वत तसंच नियमित पुरवठा होण्याची
गरज व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी, राज्याला बाहेरील देशातून लस आयात करून लसीकरण करता
येईल का, असा प्रश्न विचारला.
वाढत्या
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ
आली आहे, मात्र अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असं मुख्यमंत्री
ठाकरे यांनी नमूद केलं.
****
पालघर जिल्ह्यात विरार इथल्या, विजय वल्लभ रुग्णालयातल्या आगीची चौकशी करण्याचे
आदेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या रुग्णालयात इतर रुग्णांवर
उपचार सुरू राहतील, याकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. या अग्निकांडात
मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी
प्रत्येकी पाच लाख, आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी
एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, राष्ट्रीय
आपत्ती निवारण निधीतून, मृतांच्या कुटुंबाना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येक
५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
****
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात सहभाग
असल्याच्या आरोपाखाली मुंबईतले पोलीस निरीक्षक सुनील माने
यांना राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं अटक केली आहे. घटना घडली तेव्हा माने
गुन्हे शाखेत कार्यरत होते, नंतर त्यांची बदली झाली होती. याप्रकरणी अटक झालेले ते
तिसरे पोलीस कर्मचारी आहेत. याआधी सचिन वाझे आणि रियाझ काझी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना
अटक झालेली आहे.
****
आंतरजिल्हा
आणि आंतरराज्य प्रवास बंदीच्या आदेशानुसार औरंगाबाद जिल्ह्याच्या सातही प्रवेश सीमा
पोलिस विभागानं बंद केल्या आहेत. तसंच अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची
कसून तपासणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक कारणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून इतर जिल्हयात
प्रवासासाठी नागरिकांसाठी ई - पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी Covid
-19.mhpolice.in या संकतेस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचं आवाहन पोलिस आयुक्त आणि
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची ग्रामीण पोलिस आणि आरोग्य
विभागाच्या वतीनं कोविड - 19 जलद अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये सिल्लोड तालुक्यातल्या
भराडी इथले दोन, पैठण इथं पाच आणि बिडकीन इथं चार असे अकरा जण कोविड बाधित आढळून आले.
विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून आणि वाहनधारकांकडून नगरपरिषद, ग्रामपंचायतींच्या
वतीनं दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये आज विनामास्क
फिरणाऱ्या १८८ नागरिकांना ४९ हजार २०० रूपये आणि वाहनधारकांना ३२ हजार २०० रुपये दंड
ठोठावल्याचं पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या २१ कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये अकरा पुरुष
आणि दहा महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत दोन
हजार २९६ रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख १४ हजार ४९५
झाली असून १५ हजार २२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
****
बीड
जिल्ह्यात आज नवे एक हजार २१० कोविडग्रस्त आढळले, यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक
२३४, बीड २२७, आष्टी १६५, केज १२९, परळी १०७, पाटोदा ८८, गेवराई ८७, माजलगाव ५७, धारूर
४९, वडवणी ३७ तर शिरुर तालुक्यातल्या ३१ रुग्णांचा समावेश आहे.
****
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख
यांनी आज लातूर शहर विधानसभा
मतदार संघातल्या २७ गावांचे सरपंच आणि सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार,
गटविकास अधिकारी, यांच्याशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना विषाणूच्या
दुसऱ्या लाटेचे संकट अभूतपूर्व असून, त्या पासून आपल्या गावचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत
पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दक्ष रहावं, गावात स्वयंशिस्त पाळावी, कोरोना विषाणू विरोधी
पथकाच्या माध्यमातून मार्गदर्शन सूचनांचं पालन करावं, गृहविलगीकरण शास्त्रोक्त पध्दतीने
राबवावं, असं आवाहन त्यांनी यावेळी
केलं. प्रत्येक गावात लसीकरण मोहीम राबवावी, गृहविलगीकरणातल्या रूग्णांना नियमित औषध
पुरवठा करावा, आवश्यकतेनुसार गावात संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारावेत अशा सूचनाही
त्यांनी यावेळी केल्या.
****
उस्मानाबादचे
खासदार ओमराजे निंबाळकर
यांनी आज तुळजापूर
तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. तपासणीस येणाऱ्या रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याचा
त्यांनी आढावा घेतला. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रत्येक गावात, नगरपालिका
क्षेत्रात सुरु करण्यात यावी. घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी, यामुळे रुग्णांवर
लवकर उपचार करता येतील, असं ते म्हणाले. कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या
अधिकाधिक तपासण्या कराव्यात तसंच Positive रुग्णांना तात्काळ तुळजापूर इथल्या कोविड
केंद्रात दाखल करावं, अशा सूचना निंबाळकर यांनी यावेळी केल्या.
****
हिंगोली जिल्ह्याला १० हजार रेमडेसीविर इंजेक्शनाचा
साठा उपलब्ध झाला आहे. त्या पैकी ९६० इंजेक्शन काल मिळाले असून उर्वरीत टप्याटप्याने
मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितलं. जिल्ह्यात सद्यस्थितीत
प्राणवायूचा मुबलक साठा उपलब्ध असून यापुढेही त्यात कमतरता भासणार नाही, यासाठी जिल्हा
प्रशासन तसंच पालकमंत्री वर्षा गायकवाड पूर्ण क्षमतेने काम करत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी
दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरानजिक असलेल्या शेंद्रा इथल्या श्री मांगीरबाबाची
यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. श्री क्षेत्र मांगीरबाबा देवस्थान
समितीच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. वाढत्या कोविड संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर देवस्थान समितीनं यंदाही मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदीर
असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी येवू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.
****
परभणी
इथं जिल्हा उपनिबंधक कार्यालय परिसरात उभी दोन चारचाकी वाहनं भस्मसात झाली. कार्यालय
परिसरात झाडांच्या पालापाचोळ्याल्या लागलेली आग या वाहनांपर्यंत पोहोचली, आणि क्षणार्धात
आगीचे लोट उठल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
ही दोन्ही वाहनं कार्यालयाच्या आवारात निकामी अवस्थेत पडून होती.
****
लातूर जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांस पुरवठा करण्यात येत असलेल्या
प्राणवायूबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आढावा बैठक घेऊन संबधितांना आवश्यक सूचना
केल्या. जिल्ह्यात विजया, शारदा तसंच नाना एजेन्सी मार्फत प्राणवायू पुरवठा होत आहे.
बनसोडे यांनी या प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली
//**********//
No comments:
Post a Comment