Thursday, 1 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

·      ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना आजपासून कोविड प्रतिबंधात्मक लस.

·      राज्यात वाढता कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत.

·      औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांविरोधात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी, गुन्हा दाखल.

·      नांदेड जिल्ह्यात टाळेबंदीच्या मुदतीत १५ एप्रिलपर्यंत वाढ, तर परभणी जिल्ह्यातली संचारबंदी पाच एप्रिलपर्यंत कायम.

·      राज्यात ३९ हजार ५४४ नवीन कोविड रुग्ण, मराठवाड्यात ७६ जणांचा मृत्यू तर नव्या पाच हजार नऊ बाधितांची नोंद.

·      महिलांच्या नावे घर खरेदीवर मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत, रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      पॅन आणि आधार कार्ड एकमेकांना जोडण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ; अल्पबचतींवरील व्याज दरात कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

आणि

·      विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी कृती दल नेमणार.

****

४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना आजपासून कोविड प्रतिबंधात्मक लस घेता येणार आहे. यासाठी नागरिकांनी कोविन ॲप वर नोंदणी करावी किंवा दुपारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर ओळखपत्र दाखवूनही नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करून, लस येणार आहे. यापूर्वी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसंच ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाच लस घेता येत होती, आता एक जानेवारी १९७७ पूर्वी जन्म झालेल्या प्रत्येकाला सरसकट कोविड लस घेता येईल.

****

राज्यात वाढता कोविड संसर्ग पाहता, अधिक कडक निर्बंधांचं नियोजन करत असल्याचे संकेत, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या टाळेबंदी लावण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असं आवाहन टोपे यांनी केलं. ते म्हणाले –

लॉकडाऊनच्या बाबतीत असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आपले जे निर्बंध जे आहेत ते निश्चितप्रकारे अधिक कडक होण्याच्या दृष्टीकोनातूनची पावलं राज्य शासनान उचलणारच आहे. आणि त्यामुळे गर्दी निर्माण होणारे जी जी ठिकाणं आहेत, त्या सर्व ठिकाणांमध्ये आपल्याला अधिक कडक निर्बंध लावण्याच्या दृष्टीकोनातून आपण काही नियोजन करत आहोत. नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा.

दरम्यान, राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना विषाणू संसर्ग चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले असून, आता आरटीपीसीआर चाचणीसाठी पाचशे रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपिड अँटीजेन अँटीबॉडीज - अँटीजेन चाचणीसाठी १५० रुपये आकारण्यात येणार आहेत, अशी घोषणा टोपे यांनी केली. यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सुधारित दरानुसार ही चाचणी करणं खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचं आरोग्य मंत्री म्हणाले.

****

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांविरोधात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलील आणि त्यांच्या समर्थकांनी रात्रीच्या टाळेबंदीचं उल्लंघन केलं असून, या सर्व प्रकरणात त्यांच्याविरोधात, भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९ आणि १४२ तसंच कोविड विनिमय कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केल्याचं, पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं.

 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री औरंगाबाद जिल्ह्यात प्रस्तावित टाळेबंदी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, जलील यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं जमा झाले होते. या समर्थकांनी जलील यांच्यासह मिरवणूक काढल्याच्या चित्रफिती सामाजिक संपर्क माध्यमावरून प्रसारित झाल्या आहेत.

 

या प्रकरणी जलील यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली होती. पक्षाचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी पोलिस प्रशासनाला याबाबतचं निवेदन सादर केलं. या जल्लोष मिरवणुकीत रात्री आठ वाजेनंतर लागू संचारबंदीचं आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झालं असल्याचं, या निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी खुलासा करताना, खासदार जलील यांनी, ही गर्दी आपण बोलावलेली नव्हती. मात्र तरीही पोलिस प्रशासन जी कारवाई करेल, त्याला सहकार्याची आपली भूमिका असेल, असं सांगितलं. ते म्हणाले –

मेरे बारे में जो कहां जा रहां है की, मैने मास्क नहीं लगाया था मैने भीड इकठ्ठा किया था. मै साफ बता दूं मैनें कल कोई अपने तरफसे भीड इकठ्ठा नहीं किया था. लोग खुद खुशी का इजहार करने यहां पर आये थे. लेकिन हां अगर मतलब वो व्हिडियो वायरल हुआ है जिसमें में मास्क नही लगाया हुं तो पोलीस में जो भी कारवाई होनी चाहीये कानुन के हिसाब से जो दुसरे आम लोगोंपर करते है. वह मुझपर करना चाहिए ऐसा नहीं है के मुझपर कोई अलग कानून है करके.

****

नांदेड जिल्ह्यात टाळेबंदीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ विनीप ईटनकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. विवाहासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीच्या मर्यादेसह पूर्वी लागू असलेल्या कोविड प्रतिबंधक सूचना या काळातही लागू असतील. मास्क न घातल्यास ५०० रुपये, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये, तसंच जमावबंदीचा आदेश मोडल्यास एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातली संचारबंदी सोमवारी पाच एप्रिलच्या सकाळी सहा वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले. परभणी जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या तसंच परजिल्ह्यातून येणाऱ्या एसटीसह खासगी बसची वाहतुक १५ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेशही, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोविड संबंधित तसंच अत्यावश्यक सेवा वगळता, जिल्ह्यातली सर्व शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं, चार एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत

दरम्यान, जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवण्याबाबत जिल्हाधिकारी मुगळीकर, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी काल बैठक घेतली. शहरासह जिल्ह्यात प्रशासनानं यापुढे टाळेबंदी लावू नये, अशी मागणी या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली. शहरातल्या खासगी दवाखान्याकडून रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारीही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या सर्व प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

****

राज्यात काल ३९ हजार ५४४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली आहे. काल २२७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार ६४९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९४ शतांश टक्के झाला आहे. काल २३ हजार ६०० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ३४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ५६ हजार २४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या पाच हजार नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९, नांदेड जिल्ह्यातल्या २४, बीड नऊ, जालना सात, हिंगोली सहा, लातूर पाच, परभणी चार तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ५४२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ७९, लातूर ६०६, जालना ५३२, परभणी ४९८, बीड ३२५, उस्मानाबाद २५३ तर हिंगोली जिल्ह्यात १७४ रुग्ण आढळून आले.

****

महिलांच्या नावे होणाऱ्या घरांच्या खरेदीवर मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय राज्यभरात आजपासून लागू होत आहे. राज्य शासनानं अर्थसंकल्पात हा निर्णय घेतला आहे. आजपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे, त्यामुळे गेल्या वर्षाचेच रेडी रेकनर या वर्षीही लागू असतील. दरम्यान, राज्य शासनानं दिनांक ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत आजपासून संपुष्टात आली आहे. बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्याच्या दृष्टिकोनातून, ही सवलत देण्यात आली होती.

****

परमनंट अकाऊंट नंबर -पॅन आणि आधार कार्ड एकमेकांना जोडण्यास ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधार क्रमांकाला पॅन जोडण्याची मुदत कालपर्यंत होती, ती वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पाचव्यांदा ही मुदत वाढवण्यात आली आहे.

****

अल्पबचतींवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नव्या नियमानुसार आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी - पीपीएफ खात्यावरील गुंतवणुकीवर सहा पूर्णांक चार टक्के व्याज मिळणार आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर पाच पूर्णांक नऊ टक्के तर सुकन्या समृद्धी योजनेतल्या गुंतवणुकीवर सहा पूर्णांक नऊ टक्के व्याज मिळणार आहे.

****

राज्य शासनाच्या २०१८ - १९ वर्षाच्या कृषी पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार २०१८, बीड जिल्ह्यातल्या उदंडवडगाव इथले दत्तात्रय जाधव, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथले नानासाहेब गायके, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम इथले तात्यासाहेब गोरे यांना जाहीर झाला आहे. तर २०१९ सालचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार औरंगाबाद जिल्ह्यातल्या चिकलठाणा इथले सिकंदर जाधव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाघोली इथले सतीश खडके यांना जाहीर झाला आहे. जिजामाता कृषीभूषण पुरस्कार २०१९ परभणी जिल्ह्यातल्या झरी इथल्या मेघा देशमुख यांना जाहीर झाला आहे.

****

विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी कृती दल नेमणार असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीसंदर्भात, काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकीशी करण्यासाठी, सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा, तसंच लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करुन, संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात, असे निर्देश ठाकूर यांनी दिले.

****

लातूर शहर अधिक स्वच्छ तसंच सुंदर करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं, विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर, पालिकेच्या वतीनं ओला तसंच सुका कचरा टाकण्यासाठी, कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर, अरुण समुद्रे –

शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये बाजारपेठेत नागरिकांनी कचरा टाकू नये. यासाठी पालिकेकडून जनजागृती केली जात आहे. व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांनी आपल्याकडे जमा झालेला कचरा डस्टबिनमध्ये टाकावा. कचरा टाकतांनी ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी दोन ठिकाणी दोन डस्टबिन उपलब्ध करुन दिल्या आहेत, त्याच डस्टबिनमध्येच कचरा टाकावं असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.

अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

****

लातूर इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उप-प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख सदाशिव शिंदे यांना, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा, राज्यस्तरीय ‘शिक्षकरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदूर इथल्या होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह होळकर, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते, शिर्डी इथं दहाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिंदे यांनी, गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यात, तसंच एड्सग्रस्त मुलींना आर्थिक सहाय्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे.

****

परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी करतांना, पिशवीवरील किंमत तसंच खत विक्रेत्यानं बिलावर लावलेली किंमत पडताळून पाहावी, अशी सूचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केली आहे. सध्या रासायनिक खताच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मात्र खताचा जुना साठा, जुन्या दराने किंवा पिशवीवरील छापील किमतीच्या मर्यादेत विकणं बंधनकारक असल्याचं, कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

****

केंद्र शासनानं जी. एम. - जनुक सुधारित वांग्यांच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतकं घातक असेल तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्या वापरावर बंदी का नाही, असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे. शासनानं बंदी घातली तरीही लाखो हेक्टरवर तणरोधक कपाशीची लागवड होत आहे, तसंच हजारो हेक्टरवर बी.टी. वांग्याची सुद्धा लागवड झालेली असल्याचं घनवट यांनी सांगितलं.

****

No comments: