Sunday, 13 June 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १३ जून २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात गेल्या चोवीस तासात ८० हजार ८३४ नवे रुग्ण आढळले असून गेल्या ७१ दिवसानंतर पहिल्यांदाच रुग्ण संख्या एवढी कमी झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २६ शतांश टक्के झाला असून गेल्या चोवीस तासात एक लाख ३२ हजार ६२ कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानं सुटी देण्यात आली. सध्या देशात केवळ ५४ हजार ५३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

दरम्यान, देशात आतापर्यंत २५ कोटीहुन अधिक लोकांचं कोरोना प्रतिबंधक लसीचं लसीकरण करण्यात आलं आहे. काल दिवसभरात ३१ लाख ६७ हजारांहून अधिक लोकांनी ही लस घेतली. यातील २८ लाख ११ हजार जणांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली तर ३ लाख ५६ हजारांहून अधिक लोकांनी लसीची दुसरी मात्रा घेतल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

२०१७ मधील भारोत्तोलन स्पर्धेतील विश्व विजेती मीराबाई चानू ४९ किलो वर्गाच्या तोक्यो ऑलिम्पीक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. आंतरराष्ट्रीय भारोत्तेालन महासंघानं ही घोषणा केली आहे. आपल्या जागतिक क्रमवारीच्या गुणांच्या आधारे मीराबाई पात्र ठरल्याचं महासंघानं सांगितलं आहे.

****

कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल सांगलीत छापा टाकून २० लाख ६० हजार रुपये किमतीचा खतांचा साठा जप्त केला. यासंदर्भात संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

राज्यात कोविड रुग्णसंख्येत घट झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येत असून जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, अहमदनगर, जळगाव, वाशिम सह इतर १३ जिल्ह्यांत उद्या सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार आहेत. रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम राहणार आहेत.

****

मुंबई आणि कोकण भागासह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतीवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

****

संक्षिप्त बातमीपत्र संपलं, आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या यू ट्यूब चॅनेलवर पुन्हा ऐकू शकता.

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...