Wednesday, 16 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा निर्णय

** अजिंठा - वेरूळ लेणी, बिबी का मकबरा णि दौलताबाद किल्ला आजपासून पर्यटकांसाठी खुला

** अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी जमीन खरेदी भ्रष्टाचाराच्या आरोपांवर टीका केल्याच्या कारणावरून मुंबईत शिवसेना आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

आणि

** जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं वृद्धापकाळानं निधन

****

मराठा आरक्षण प्रकरणी कोल्हापूरमधील मूक आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आहे. त्याचबरोबर नाशिक, रायगड, अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आजच्या मूक आंदोलनानंतर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही आंदोलनात सहभागी होत आपली भूमिका मांडली. आरक्षण मिळवण्यासाठी खासदारांनी केंद्राकडे आग्रह धरावा, कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरूस्ती केली तर हा विषय लवकर सुटू शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलं. आजच्या आंदोलनात समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी सहभागी झाले होते. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे यांना मुंबईत येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारत संभाजीराजे यांनी मराठा समन्वयकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आंदोलनाला पाठिंबा देणारं पत्र खासदार संभाजी राजे यांना दिलं.

****

औरंगाबाद मधील अजिंठा - वेरूळ लेणी, बिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी आणि दौलताबाद किल्ला ही पर्यटनस्थळे आजपासून खुली करण्यात आली आहेत. आज या पर्यटनस्थळांची साफसफाई करण्यात आली. उद्यापासून दोन सत्रात पर्यटकांना याठिकाणी भेट देता येणार आहे. पर्यटकांनी या ठिकाणी भेट देतांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. ते म्हणाले….

सकाळच्या सत्रामध्ये एक हजार लोकं, दुपारच्या सत्रात एक हजार लोकं, अशी दोन हजार लोकं याला भेट देवू शकतील, ऑनलाईन बुकींगच्या सुविधेमध्ये ही मर्यादा घालूनच पर्यटकांना तिकीटं किंवा बुकींग दिलं जाईल. तिथं जे कोविड अप्रोपिअट बीव्हेईअर आहे. म्हणजे मास्क वापरणे,दो गज की दूरीचं आंतर ठेवणे, त्याच्यानंतर सॅनिटायझर वापरणे हे अनिवार्य आहे. किंवा तिथं व्यवसाय करणारे जे व्यवसायिक आहेत,छोटे - मोठे खेळणे विक्रेते आहेत, काही फूड स्टॉलचे लोकं आहेत.गाईड आहेत, यासगळ्यांच्या बाबतीत आरटीपीसीआर टेस्टींग महत्वाची आहे. दोन डोस पूर्ण झाले असतील व्हॅक्सीनेशनचे त्यांना काही सिमटंन्स नसतील तर त्यांना टेस्टींगची काही आवश्यकता नाही.

****

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपानंतर शिवसेनेनं केलेल्या टीकेवरून आज मुंबईत दादर भागात शिवसेना आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमुळे या भागातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन बाहेर आंदोलन सुरु केल्याचं कळताचं, या ठिकाणी  मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते दाखल झाले. त्यानंतर दोन्ही गटात हा हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं.

****

राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्य शासनाचा कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉक्‍टर विश्वजीत कदम उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी धोरण राबवणं ही महत्वाची उद्दिष्ट असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. हा सामंजस्य करार भारतासोबतचा पहिला करार असून जागतिक अन्न सुरक्षा आणि कापूस तसंच इंधनाची वाढती मागणी या क्षेत्रात संयुक्तरित्या काम करण्यास फार मोठा वाव असल्याचं अमेरिकेचे वाणिज्य दूत डेविड रांझ यांनी यावेळी सांगितलं.

****

जुन्या पिढीतील जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं वृद्धापकाळानं आज निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. चंद्रशेखर यांनी त्यांच्या कार्यकाळात ११० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यात १९६४ मध्ये प्रदर्शित झालेला 'चा चा चा' आणि 'स्ट्रीट सिंगर' या सिनेमांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. मस्ताना, जिंदगी के मेले, बागी सिपाही, टॅक्सी स्टँड, काली टोपी लाल रुमाल, बरसात की रात, बूटपॉलिश, बात एक रात की, कटी पतंग, मेहबूबा, अजनबी, कुली, शराबी, नमक हलाल आदी चित्रपटात्यांनी काम केलं होतं. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण मालिकेमध्ये दशरथ राजाचे महामंत्री सुमंतची भूमिका त्यांनी साकारली होती.

****

परभणी जिल्हा कोविड संसर्गाच्या नियमावलीत पहिल्या स्तरावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, असं असलं तरी नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे. ते म्हणाले…

माझं परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना असं आवाहन आहे की, बाहेर फिरत असतांना कंम्पलसरी मास्कचा वापर केलाच पाहिजे, त्याप्रमाणे सोशल डिस्टंन्सिंगचे अनुपालन केलं पाहिजे, वारंवार हात धुणे आणि गर्दी एका ठिकाणी जास्त करणे आपण टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे व्यवसायांशी निगडीत सर्वांच्याच आपण चाचण्या करुन घेत आहोत. ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये याच्यासाठी प्रशासन कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राबवत आहे. प्रत्येक गावासाठी एक पालकअधिकारी नियुक्त केला आहे आणि गावामध्ये एक ग्रामसुरक्षा दल आपण ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक गावामध्ये आपला सर्व्हे चालू आहे. एकंदरीतचं गाव स्वच्छ राखणे याच्याकडे देखिल प्रशासन लक्ष देत आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन कोविड बाधितांचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोविड विषाणू संसर्गानं आतपार्यंत तीन हजार ३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक लाख ४४ हजार झाली असून एक लाख ४० हजार ११४ रुग्ण कोविड मुक्त झाले आहेत.

****

लातूर जिल्ह्यातल्या गुंठेवारी आणि अकृषक जमिनीबाबत शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी एका आढावा बैठकीत दिले आहेत. संबंधित नागरिकांचे अर्ज नियमानुसार आणि दिलेल्या मुदतीत निकाली काढावेत. तसंच नागरिकांना याबाबत त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी दिले.

लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिले.

****

परभणी जिल्ह्यात यावर्षी २० लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीनं किमान एक हजार झाडं लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. लावलेल्या सर्व झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारीही घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा नगर परिषदेच्या दर्जावाढ करून तो '' वर्ग करण्यात यावा अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे. सध्या ही नगरपरीषद '' र्ग दर्जाची आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या मागणीचं पत्र दिलं आहे. दर्जावाढ झाल्यास शासनाकडून येणाऱ्या अनुदानात वाढ होऊन यातून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं सोयीचं होईल असं या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे. यासाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी दिलं.

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...