Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 06 June 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०६ जून २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं
श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर
मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी
संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित तारखेच्या पाच दिवस आधिच राज्यात दाखल
**
राज्यातील कोविड विषयक निर्बंध गटनिहाय
कमी करण्यास उद्यापासून
सुरुवात
**
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाइनच होणार
** राज्यात १३ हजार ६५९ नवे कोविड रुग्ण: मराठवाड्यात
४२ जणांचा मृत्यू तर ९३७ बाधित
** आरक्षण
मिळेपर्यंत संघर्ष करण्याचा
बीडच्या मोर्चात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचा इशारा
**
जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा; राज्य
शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये हिंगोली नगर पालिका राज्यात
प्रथम क्रमांकावर
आणि
**
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित तारखेच्या पाच दिवस आधिच महाराष्ट्रात पोहोचला
असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं काल जाहीर केलं. तीन जूनला केरळमध्ये दाखल
झाल्यापासून सतत तिसऱ्या दिवशी
मान्सूनने अरबी समुद्राच्या बाजूने मोठी प्रगती करुन गोव्यासह दक्षिण कोकण आणि
मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली. मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या
पोषक वातावरण असून उद्यापासून मान्सूनची प्रगती थोडी कमी होवून संपूर्ण महाराष्ट्र
व्यापण्याला सात दिवसांचा कालावधी लागू शकतो असं वेधशाळेनं कळवलं आहे. परिणामी,
राज्यात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात काल पावसाच्या जोरदार
सरी कोसळल्या.
मराठवाड्यात बीड जिल्ह्यात काल दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. यामुळे रेणानदीला पूर आला. परिणामी अंबाजोगाई आणि
बर्दापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
औरंगाबाद जिल्ह्यात करमाड परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस
झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उस्मानाबाद, भूम, परंडा, कळंब तसंच तुळजापूर तालुक्यात पाऊस झाला. मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यात काळ दिवसभर ढगाळ वातावरण होतं तर
काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.
दरम्यान, येत्या चार दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी तर
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची
शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
राज्य सरकारनं कोविड
विषयक लागू केलेले निर्बंध हटवण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांचं पाच गटांमध्ये
वर्गीकरण केलं असून उद्यापासून गटनिहाय निर्बंध कमी होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या
गटात मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड जिल्ह्यांचा समावेश असून इथं सर्व
व्यवहार खुले करण्यात येतील. दुसऱ्या गटात हिंगोली जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यातील मॉल आणि सिनेमा
हॉलमध्ये ५० टक्के उपस्थितीची
अट घालण्यात आली आहे. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या गटात
करण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यातली दुकानं दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहेत.
तर चौथ्या गटात परभणी जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यातली सिनेमागृहं, सभागृहं, नाट्यगृहं
बंद राहणार आहेत.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइनच होणार आहेत. लेखी परीक्षेला येताना RTPCR
चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत. १० जून पासून या विद्यार्थ्यांची परीक्षा
सुरू होणार आहे. ऑफलाइन परीक्षा रद्द करावी ही विनंतीही न्यायालयाने फेटाळून लावली
आहे.
जे विद्यार्थी पहिल्या दिवशी चाचणी अहवाल सादर करु शकणार नाहीत त्यांना
पुढच्या पेपर पूर्वी किंवा १५ जून पूर्वी अहवाल सादर करण्याची मुभा द्यावी असे
निर्देश न्यायाधीश अविनाश घारोटे यांनी दिले आहेत. RTPCR चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार
नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राज्यभरातले सुमारे ४० हजार विद्यार्थी ही
परीक्षा देणार आहेत.
****
राज्याचं कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण गेल्या
तीन महिन्यात काल प्रथमच ९५ टक्क्यांवर पोहोचलं. काल राज्यात १३ हजार ६५९ नवे कोविड
रुग्ण आढळले. १० मार्च २०२१ रोजी एवढे
रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण संख्या वाढत होती.
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या आता
५८ लाख १९ हजार २२४ झाली आहे. काल ३०० रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, ९९ हजार ५१२ झाली असून, मृत्यूदर
एक पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. काल २१ हजार ७७६ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले. राज्यात आतापर्यंत ५५ लाख २८ हजार ८३४ रुग्ण, कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५
पूर्णांक एक दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ८८ हजार २७ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ९३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४२ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या
१६, औरंगाबाद ११, बीड ६, परभणी चार, उस्मानाबाद आणि जालना इथं प्रत्येकी दोन
तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले २४३ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद २११, उस्मानाबाद ११७, नांदेड १२६, लातूर
९०, जालना २८, परभणी ३७, तर हिंगोली जिल्ह्यात काल २५ नवे रुग्ण आढळून आले.
****
मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीनं काल बीड इथं आरक्षण मोर्चा काढण्यात
आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत संघर्ष करणार असल्याचा इशारा
आंदोलनकर्त्यांनी दिला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चात सहभागी
झाले होते, कोविड विषयीचे नियम पाळून सामाजिक अंतर
ठेऊन क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला
जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती असं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
शिवराज्याभिषेक दिन आज साजरा होत आहे. या दिवशी राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयात सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह
शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावं. तसंच राष्ट्रगीत आणि
महाराष्ट्र गीताचं गायन करावं, अशा सूचना राज्य सरकारकडून
देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन राज्यात हा दिन
साजरा करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्तानं राज्यातल्या
जनतेला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून,
त्यांनी दाखवलेल्या वाटेवरुन चालण्याचा, महाराष्ट्राचा
सन्मान वाढवण्याचा निर्धार करुया, असं उपमुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे. दरम्यान, कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणताही
अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासनानं किल्ले रायगड परिसरात लोकांना येण्यास मनाई
केली आहे.
****
दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेला काल बीड जिल्ह्यात परळी इथं
प्रारंभ झाला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना कोविड
प्रतिबंधक लस देण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून दिव्यांग व्यक्तींचं प्राधान्यानं लसीकरण करण्याबाबत सामाजिक न्याय
विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या. त्यानुसार आठवड्यात एक दिवस फक्त
दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी राखीव ठेऊन त्यांचे लसीकरण करण्याची ही मोहीम
संपूर्ण राज्यात राबवण्याचा आपला मानस असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. अंबाजोगाई
इथंही स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
****
मराठवाड्यात काही ठिकाणी लांब पल्ल्याच्या एस टी महामंडळाच्या गाड्या
उद्यापासून सुरु होणार आहेत. औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या बसस्थानकांवरुन उद्यापासून ही
बस सेवा होत आहे.
****
जागतिक पर्यावरण दिन काल सर्वत्र कोविड नियम पाळून साजरा करण्यात आला. या
निमित्तानं वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आले.
गेल्या दशकात ज्या देशांमध्ये वनक्षेत्र वाढलं आहे अशा जगातल्या काही
देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी
सांगितलं. ते काल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलत होते. गेल्या सहा वर्षात वन
आणि वृक्ष क्षेत्र १५ हजार वर्ग किलोमीटरनं वाढलं असल्याचं जावडेकर यांनी
सांगितलं.
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी झालेल्या २२२ नगर
पालिकांमधून हिंगोली नगर पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल या पुरस्काराचं ऑनलाईन वितरण करण्यात आलं. हिंगोली
पालिकेने पृथ्वी या घटकामध्ये शहरात गेल्या वर्षभरात ५ हजार झाडं लावून त्यांचं
संगोपन केलं तर देशी वाणाच्या १५ हजार वृक्षांची रोपवाटिका तयार केली. अहमदनगरचे
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकारी वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक
मिळवला आहे. तर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना
दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे
****
औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातल्या गोगाबाबा
टेकडी हरितकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते काल
झाला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिलेल्या पर्यावरण दिनाच्या
शुभेच्छा संदेशाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. टेकडीवर ६ हजार वृक्षांची लागवड
केली जाणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद
महानगरपालिकेच्यावतीनं काल शहरात खाम नदीपात्रालगत तसंच विविध उद्यानांमधून दहा
हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठाच्या वतीने 'पर्यावरण
: समस्या आणि उपाय' विषयावर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आलं.
शाश्वत विकास अभ्यासक, प्राध्यापक एच. एम. देसरडा यांनी या
व्याख्यानात, निसर्गाला उपभोग्य वस्तू समजू नये अन्यथा
अवघ्या विश्वाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असं मत
व्यक्त केलं.
****
हिंगोली इथं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते ‘मियावाकी’
पध्दतीने वृक्ष लागवड करुन वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात
आला. नांदेड इथं महापौर मोहिनी येवनकर यांच्या हस्ते हरित नांदेड वृक्ष लागवड
मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर, महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने उपस्थित होते. यावेळी २०० वृक्षांची
लागवड करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीनं कुलगुरू डॉ उद्धव
भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.
परभणी इथं उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला.
मानवत, गंगाखेड तसंच इतर तालुक्यातही
वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले.
लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातल्या नागराळ इथं वीस हजार वृक्ष लागवडीचा
शुभारंभ काल पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. लातूर
जिल्ह्याचं वन क्षेत्र कमी असून वनक्षेत्रात समतोल राखण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक
वर्षाला किमान दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचं
बनसोडे यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूर शहरात महापालिका मुख्यालयाच्या परिसरात महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त मित्तल यांच्या
हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.
बीड जिल्ह्याच्या पालवण इथल्या सह्याद्री देवराई वनक्षेत्रात जिल्हाधिकारी
रवींद्र जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ
करण्यात आला. पालवण इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरातही रविंद्र
जगताप यांनी वृक्ष लागवड केली. या कार्यक्रमानंतर विविध तालुक्यात आणि गावांमध्ये
वृक्षारोपणास सुरुवात झाली आहे.
जालना इथं शरातल्या हुतात्मा चौकात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते
वृक्षारोपण करण्यात आलं. जालना शहरातल्या कुंडलिका नदीपात्रातला गाळ काढण्याबरोबरच
नदीच्या खोलीकरणाचे काम समस्त महाजन ट्रस्ट आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने
करण्यात येत आहे. या प्रकल्पाची काल आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रविंद्र
बिनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर काम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत
असून यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक मदत करण्यात येईल, असं
जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी सांगितलं.
****
जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यू एच ओ च्या वतीनं उस्मानाबाद इथं १००
रुग्णखाटांचं फिरतं कोविड केंद्र उभारण्यात येत आहे. संघटनेचा हा प्रथदर्शी प्रयोग
असून, पाच राज्यात प्रत्येकी एका जिल्ह्याची या
प्रयोगासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातलं अशा प्रकारचं हे एकमेव कोविड
सुश्रुषा केंद्र असणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील याबाबत अधिक
माहिती दिली. ते म्हणाले....
जिल्हा
रुग्णालय उस्मानाबादसाठी १०० बेडस डब्ल्यू एच ओ च्या माध्यमातून मिळणार असून त्यामध्ये ऑक्सीजन कॉन्संस्टेर
४८ मिळालेले आहेत, बेडस आणि डॉक्टर मिळालेले आहेत, मॅडरेसिसि मिळालेले आहेत. आणि यासर्व
बेडसचा आम्ही जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयमध्ये येथे देखिल
जिथे आम्हाला आवश्यकता वाटते तिथे आम्ही हे बेडस शिफ्ट करुन तिथल्या रुग्णालयाची आम्ही
मदत करु शकतो.
डब्ल्यू एच ओ मार्फत जे सहकार्य आमच्या
जिल्ह्यासाठी झालेलं आहे त्याबद्दल मी डब्ल्यू एच ओचे आभार मानतो.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या माहतपुरी आणि खळी या दरम्यानच्या
नदीपात्रातल्या अवैध वाळू उपशाच्या निषेधार्थ खळी इथल्या ग्रामस्थांनी नदी पात्रात
उतरुन जलसमाधीचा इशारा दिला होता. हे आंदोलक काल दुपारी १२ वाजता नदीपात्रात
उतरल्यानंतर महसूल अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन, त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. लेखी पत्र दिल्यानंतर दुपारी
साडेतीन वाजेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
//***************//
No comments:
Post a Comment