Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार
असल्याची घोषणा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज रायगडावरून केली. शिवाजी
महाराजांचा ३४८ वा
शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर परंपरागत पध्दतीनं
आणि मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते
बोलत होते. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून सामान्य मराठा जनतेनं
रस्त्यावर येऊ नये, असं आवाहन
त्यांनी यावेळी केलं. छत्रपती शाहू
महाराजांच्या समाधीस्थळापासून हा
पहिला मोर्चा काढणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. आरक्षण हा
मराठा समाजाचा हक्क असून मराठा समाजाला गृहीत धरू नका
असंही यावेळी संभाजी राजे म्हणाले. शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून
साजरा करण्याची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, संपूर्ण रायगड आणि किल्ला परिसरात कडेकोट
बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
राज्यात आज शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा होत आहे.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या
हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात
म्हटलं आहे.
****
बीड इथं जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री
धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान आवास
योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या तसचं कोरोना
काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांचे शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले.
नांदेड इथं जिल्हा परिषद प्रांगणात नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती
मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते शिवशक राजदंड
स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं.
हिंगोली इथं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांनी छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आणि शिवशक
राजदंड स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून
दिलेल्या आदर्शानुसार नवीन महाराष्ट्र घडवू या असं
हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निमित्तानं
दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
उस्मानाबाद इथं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते
शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं. जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते भगवी गुढी उभारण्यात आली.
धुळ्यात जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्या हस्ते गुढी
उभारण्यात आली. या निमित्त झालेल्या
कार्यक्रमात पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा
परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे ऑनलाइन सहभागी झाले होते.
सोलापूर महानगरपालिकेत महापौर
श्रीकांचना यन्नम आणि महापालिका आयुक्त पी.
शिवशंकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन
करून आणि गुढी उभारून अभिवादन करण्यात आलं.
गडचिरोलीत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री
डॉ.राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात
आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी
दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, आदि
उपस्थित होते.
****
हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार
यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी त्यांना
श्वसनाचा त्रास सुरु झाल्यानं दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर
असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
****
तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ
केली आहे. यानुसार पेट्रोलच्या किमतींत प्रती लिटर २७ पैशांनी तर डिझेलच्या
किंमतीत प्रतिलिटर २९ पैशांनी वाढ झाली आहे.
****
आयकर विभाग उद्यापासून आपलं
नवीन पोर्टल www.incometax.gov.in सुरु करत आहे. यावर करदात्यांना ऑनलाईन विवरणपत्र भरता येणार आहे. याचा
फायदा करदात्यांना लवकर परतावा मिळण्यासाठी होईल.
****
भारतानं कोरोना विषाणू प्रतिबंधक
लसीकरणात महत्वाचा टप्पा गाठला असून आतापर्यंत देशात २३ कोटी १३ लाख लोकांचं
लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासात देशात ३३ लाख ५३ हजार नागरिकांना कोविड
प्रतिबंधक लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. यात ३० लाख लोकांना पहिली मात्रा तर ३ लाख ५३ हजार लोकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात
आली.
****
देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असून काल दिवसभरात केवळ १ लाख
४१ हजार ४६० रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या ६० दिवसांतील ही सर्वात कमी रुग्ण
संख्या आहे. देशात काल २ हजार ६७७ नागरिकांचा मृत्यू झाला तर काल देशभरात १ लाख ८९
हजार ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
****
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल एका दिवसात २० लाख ३६ हजार ३११
नमुन्यांची तपासणी केली आहे.
****
या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र
आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या युट्युब चॅनेलवर पुन्हा ऐकू शकता.
No comments:
Post a Comment