Monday, 7 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** १८ वर्षावरील सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत कोविड लस देणार – पंतप्रधानांची घोषणा

** इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचं राज्यभर आंदोलन; मराठवाड्यात ठिकठिकाणी निदर्शनं

** बारावीच्या प्रलंबित प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांबाबत सीबीएसईचे नवे दिशानिर्देश

आणि

** मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी

****

येत्या २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत कोविड लस देणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. आज जनतेशी थेट साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. राज्यांकडे असलेल्या २५ टक्के लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार स्वत:कडे घेत असून, देशात उत्पादीत लसींपैकी ७५ टक्के मात्रा केंद्र सरकार खरेदी करून, त्यांचा राज्य सरकारांना पुरवठा करेल, असं त्यांनी सांगितलं.

पैसे देऊन लस घेण्यास इच्छुक नागरिकांना खासगी रुग्णालयातून लसीची मात्रा घेता येईल. खासगी रुग्णालयांना एका मात्रेसाठी किंमतीपेक्षा कमाल दीडशे रुपये सेवा शुल्क घेता येईल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

आतापर्यंत देशात २३ कोटी नागरिकांचं कोविड लसीकरण झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सध्या देशात सात कंपन्या लस तयार करत असून, तीन कंपन्यांचं लसीवर संशोधन सुरू आहे. नाकात फवारा उडवून घेण्याच्या लसीवरही संशोधन सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा दिवाळीपर्यंत विस्तार करण्यात येत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. ८० कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

****

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षानं आज राज्यभर आंदोलन केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज गडचिरोली इथल्या पेट्रोल पंपावर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

 

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं माजी आमदार डॉ कल्याण काळे यांच्या नेतृत्वात शहरातल्या जालना महामार्गावरच्या पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल - डिझेल, गॅसच्या वाढलेल्या दरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि निषेधाचे फलक झळकवण्यात आले. फुलंब्री इथंही तालुका अध्यक्ष संदीप बोरसे यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीच्या विरोधात पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली.

 

परभणी शहर तसंच जिल्हा काँग्रेस समितीनं केलेल्या निदर्शनात उपमहापौर भगवानराव वाघमारे, महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, स्थायी समितीचे सभापती गुलमीरखान, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

 

नांदेड शहरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. नांदेड तालुक्यातल्या सुगाव इथं पेट्रोल पंपावर नांदेड महानगर युवक काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली.

 

हिंगोली शहरातही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. औंढा नागनाथ इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

 

जालना इथं ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य भीमराव डोंगरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद यांच्या नेतृत्त्वात शहरात तर माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या नेतृत्त्वात परतूर इथं निदर्शनं करण्यात आली.

****

औरंगाबाद शहरातील निर्बंध उठवल्यामुळे आज शहरातल्या सर्व बाजारपेठा सुरु झाल्या. विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. रस्त्यांवर रहदारी वाढली असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी जनतेला काळजी घेण्याविषयी आवाहन केलं आहे. ते म्हणाले…

दर गुरुवारी आपला जिल्हा प्रशासन आपले कोविड रुग्णांची पॉझिटीव्हीटीची टक्केवारी काय आहे आणि ऑक्सीजन बेड किती रिकामे आहेत, त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत आणि तदनंतर हे ठरवणार आहोत की, पुढच्या विकमध्ये आपण कोणत्या लेव्हल मध्ये राहणार आहे. आपली जर पॉझिटीव्हीटी वाढली. तर आपल्या औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये परत लेव्हल तीन लेव्हल चार चे निर्बंध येण्याची आशंका आहे. जोपर्यंत आपली पॉझिटीव्हीटी पाच परसेंटपेक्षा कमी आहे. आणि आपले २५ परसेंटपर्यंत ऑक्सीजन बेड रिकामे आहेत तोपर्यंत आपण लेव्हल वन मध्ये राहणार आहे. याच्यामध्ये आपण जबाबदारीने वागा आणि कोविड अप्रोप्रियट बिव्हेरीयचे पालन करुन आपलं महानगरपालिका लेव्हल वन मध्ये ठेवण्यामध्ये सहकार्य करा.

 

दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातल्या १४ आरोग्य केंद्रांवर आणि चार केंद्रांवर चोवीस तास चाचणी करण्यात येणार आहे. मात्र, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं आरटीपीसीआर चाचणीऐवजी लसीकरण करण्यात यावं अशी मागणी केली आहे.

****

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -सीबीएसईनं शाळांना नवे दिशानिर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रलंबित प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षा आता फक्त ऑनलाइन माध्यमातून घ्याव्या लागणार आहेत. यात बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण येत्या २८ जून पर्यंत सीबीएसईच्या वेबसाइटवर अपलोड करण्याच्या सूचनाही सीबीएसईनं दिल्या आहेत. याअंतर्गत परीक्षा घेताना प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वतंत्र छायाचित्र सुध्दा घ्यावं लागणार आहे.

****

औरंगाबाद शहरात आजपासून ड्राइव्ह इन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांनी शहरातल्या प्रोझोन मॉलच्या पार्किंगमध्ये कार आणि रिक्षामध्ये येत कोविड प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. सकाळी ११ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत नागरिकांना याठिकाणी लस घेता येणार आहे

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज तेरा कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ, अहमदनगर तीन, आणि बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगबाद जिल्ह्यात कोविड विषाणू संसर्गानं आतापर्यंत तीन हजार सातशे २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक लाख ४३ हजार ८०३ झाली असून एक लाख ३८ हजार १३३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात पाच कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १०३४ झाली आहे. दरम्यान, आज ४६ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ६०६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ८२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५८ हजार ९२९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ६४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज १५५ नवे कोविडग्रस्त आढळले. यामध्ये आष्टी तालुक्यात ३५, केज २१, बीड २०, शिरूर १९, अंबाजोगाई १८, धारूर ११, गेवराई १३, वडवणी ७, पाटोदा ५, तर माजलगाव आणि परळी तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्ण आढळले. 

****

मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, नांदेड तसंच हिंगोलीसह अनेक भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली.

औरंगाबाद शहर परिसरातही दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात पवना गाव परिसरात आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. गाव शेजारच्या माळावरचं पावसाचं पाणी गावातल्या अनेक घरात घुसल्यानं, नागरिकांची तारांबळ उडाली. हिमायतनगर तालुक्यात भोकर ते इस्लापूर मार्गावरचा पूल आज दुपारी झालेल्या पावसात वाहून गेल्यान हिमायतनगर ते इस्लामपूर चा संपर्क तुटला आहे. दोन्ही काठावर शेकडो वाहन अडकून पडली आहेत.

 

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात पिंपळदरी इथं आज दुपारी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात, वीज कोसळल्यानं एक बैल आणि गाय दगावली. केशव येसाजी रुठे यांच्या शेतात वीज कोसळून या दोन्ही जनावराचा अंत झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...