Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09
June 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात
कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले
आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे.
त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम
असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं,
हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
खरीप हंगामातील सर्व पिकांच्या किमान
हमी भावात वाढ करण्यास केंद्र सरकारची मंजुरी
**
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत, ३ लाख
६१ हजार घरकुल बांधकामांच्या ७०८
प्रस्तावांना मान्यता
**
काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री जितीन
प्रसाद यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
**
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस
आणि
**
हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीविरूद्धचा
अविश्वास ठराव ३५ विरुध्द ० मतानं पारित
****
केंद्रीय
मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं खरीप
हंगामातील सर्व पिकांच्या किमान हमी भावात
वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. आज झालेल्या समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ही माहिती दिली. गेल्या
वर्षीच्या तुलनेत यंदा किमान हमी भावातील सर्वाधिक ४५२
रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ तिळाला देण्यात आली आहे. त्याखालोखाल तूर आणि उडीद
डाळीला प्रत्येकी ३०० रुपये प्रति क्विंटल वाढ देण्याची शिफारस करण्यात
आल्याचं त्यांनी सांगितलं. भुईमुगाच्या शेंगाच्या भावात २७५ रुपये प्रतिक्विंटलनं वाढ
करण्यात आली आहे. पिक पद्धतीत परीवर्तन व्हावं हा या दरवाढी मागचा उद्देश असल्याचं
त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत, ३ लाख ६१
हजार घरकुलांच्या बांधकामांच्या ७०८ प्रस्तावांना, मान्यता देण्यात आली आहे. नागरी गृहनिर्माण मंत्रालयानं निर्धारित वेळेच्या आत घरं बांधण्यावर
भर दिला आहे. या योजने अंतर्गत देशभरात १ कोटी १२ लाख ४० हजार घरांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली असून सध्या ८२ लाख ५० हजार घरांचं बांधकाम सुरु आहे.
****
काँग्रेसचे उत्तरप्रदेशातील नेते माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश
केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपल्याला पूर्ण विश्वास असून,
संघटनात्मक आधार असलेला भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असल्याचं
प्रसाद यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या वर्षी काँग्रेस पक्षात सुधारणा, सामुहिक निर्णय तसंच स्पष्ट नेतृत्वाची, पक्षाध्यक्ष
सोनिया गांधी यांना पत्र लिहून मागणी करणाऱ्या २३ कॉंग्रेस नेत्यांमध्ये जितीन
प्रसाद यांचा समावेश होता.
****
मुंबईसह
राज्यात आज अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे.
मुंबई तसंच
किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसंच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
पालघर जिल्हाधिकारी
यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबई तसंच किनारपट्टीवरील जिल्ह्यातल्या नागरिकांना असुविधा होणार नाही
यासाठी प्रशासनानं तातडीनं पाऊलं उचलावीत आणि आवश्यकता असेल
तिथं मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील, कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची
काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुंबईत पंपींग स्टेशन्स कार्यरत राहतील आणि साचलेल्या पाण्याचा लगेच उपसा होईल
याची काळजी घेण्याते निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जोरदार
पावसामुळे वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल
तिथे पोलीस आणि इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा
सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या
आहेत.
दरम्यान,
हवामान विभागानं मुंबईत सावधानतेचा इशारा
जारी केला असून पुढचे चार दिवस मुसळधार
पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण
किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान
विभागाचा अंदाज आहे.
नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. शहरातल्या वाशी, सानपाडा या
सखल भागात पाणी साचलं आहे. सीबीडी बेलापूर इथल्या कोकण विभागीय आयुक्त कार्यालय
परिसरात पाणी साचल्यामुळे कार्यालय परिसर जलमय झाला आहे.
रायगड
जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत असल्यानं सर्वच नद्यांना पूर आला आहे. रोह्यात
कुंडलिका, नागोठण्यात आंबा, नहाडला सावित्री, पनवेलला गाढी, उल्हास, पाताळगंगा अशा
सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात आज ५८ पूर्णांक ९९ मिली मिटर पावसाची
नोंद झाली
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर फुलंब्री सिल्लोड, वैजापूर
तालुक्यात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु झाला. परभणी
जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळपर्यंत पाऊस सुरु होता.
विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचलं,
विशेषतः मध्यवस्तीतील रस्ते पावसानं पुर्णतः जलमय झाले, काही तास रस्ते पाण्याखाली होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठातून वाहणाऱ्या पिंगळगड नाल्यावरील छोट्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर
पाणी वाहत होतं. त्यामुळे सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक
पूर्णतः ठप्प होती.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत -असेगाव रस्त्यावरील टाकळगाव इथं नदी तुडुंब भरून
वाहत आहे. या ठिकाणचा रस्ता बंद असून नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा
वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड, मठपिंपळगाव, आलमगाव, तीर्थपुरी, कुंभार
पिंपळगाव या भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पावसाचं पाणी
शेतातून वाहिल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. बदनापूर, भोकरदन, मंठा तालुक्यातल्या काही भागातही पावसानं आज
हजेरी लावली.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच
होती या पावसामुळे खामगाव तालुक्यातल्या
ढोरपगाव सह परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीविरूद्धचा अविश्वास
ठराव ३५ विरुध्द ० मतानं पारित झाला. हिंगोली
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना
आणि काँग्रेसच्या आघाडीची सत्ता आहे. शिक्षण सभापतीपद हे राष्ट्रवादी
काँग्रेसच्या श्रीमती रत्नमाला चव्हाण
यांच्याकडे होते. आज या अविश्वास ठरावावरील चर्चेस उपस्थित असलेल्या
सर्व ३५ सदस्यांनी विश्वास ठरावाच्या बाजूनं
मतदान केलं. यामध्ये शिवसेनेचे ११, काँग्रेसचे
१०, राष्ट्रवादीचे १०, दोन अपक्ष तर
दोन भाजपाच्या सदस्यांच्या समावेश होता. १५ सदस्य मात्र गैरहजर होते. जिल्हा
परिषदेत ५२ सदस्य असून त्यापैकी दोन जागा रिक्त आहेत.
शिक्षण सभापतीपदाचा पदभार घेतल्यानंतर चव्हाण यांच्यावर सदस्यांना विश्वास न
घेता कामं करणं यासह इतर आरोप केले होते. त्यानंतर
राष्ट्रवादीच्याच सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी पुढाकार घेतला.
****
जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५०
कोटी रुपयांचा आराखडा तयार करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही जलसंपदा
मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. परभणीचे आमदार डॉक्टर
राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील
यांची भेट घेऊन या कालव्याच्या दुरुस्तीची मागणी केली
होती. यासाठी आवश्यकता भासल्यास जागतिक बँकेकडून कर्ज घेतलं जाईल,
असं मंत्री पाटील यांनी सांगितल्याचं आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले. हा कालवा नादुरुस्त असल्यामुळे या कालव्यातून पूर्ण क्षमतेनं पाणी वहन होत
नाही. त्यामुळे परभणी मतदारसंघातली ५० टक्के गावं, गेल्या
अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती
लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली होती.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज सहा कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान घाटीत आज २५
नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले आणि चार जणांना कोरोना मुक्त झाल्यानं सुटी
देण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात आज १४६ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये केज २६, बीड २२, आष्टी १६, अंबाजोगाई,
धारुर, आणि परळी इथले प्रत्येकी १३, माजलगाव १२, पाटोदा ११, गेवराई
नऊ, शिरुर आठ, आणि वडवणी इथल्या तीन
जणांचा समावेश आहे.
//********//
No comments:
Post a Comment