Wednesday, 2 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०२ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात यंदाही मान्सून समाधानकारक म्हणजे सरासरीच्या १०१ टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी मान्सूनचा दुसरा दीर्घकालिन अंदाज काल जाहीर केला. महाराष्ट्राचा विचार करता जून महिन्यात मराठवाड्यात सरासरी कमी पावसाची शक्यता आहे, तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

****

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच महेश मित्तरकुमार आणि डॉ. राजीव जैन हे आयोगाचे सदस्य असतील. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं ही निवड केली.

****

खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांसाठीचे दर राज्य सरकारनं निश्चित केले आहेत. यानुसार आता शहरांचं वर्गीकरण करून दर निश्चित करण्यात आले असून, रुग्णालयांना अधिक दर आकारता येणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे.

****

लातूर इथं काल सुमारे चार लाख रुपयांचं अवैध मद्य जप्त करण्यात आलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या कारवाईत अनुक्रमे १६२ लीटर मद्य आणि एक चारचाकी गाडी, तसंच २६२ लीटर मद्य आणि एक चारचाकी ताब्यात घेत, लक्ष्मण शिखरे, दत्ता कावळे, रजनीकांत कावळे या तिघांना अटक केली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माहूर पोलीस ठाण्यातला कर्मचारी विष्णू मुटकुळे याला काल १० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. तक्रारदार आणि अन्य एकाच्या रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मुटकुळे यानं ही लाच मागितली होती.

****

मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे असलेलं निवेदन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांच्याकडे काल सादर करण्यात आलं.

****

नांदेड आणि परभणी जिल्ह्यात सर्व प्रकारची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. दोन्ही जिल्हा प्रशासनांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...