Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
वंचित आणि आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांना रेशनकार्ड देण्यासाठी विशेष अभियान सुरु करण्याची सूचना, केंद्र सरकारनं
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. या अभियानाचा राष्ट्रीय खाद्य सुरक्षा
अधिनियमाअंतर्गत समावेश करावा, असंही सरकारनं सांगितलं आहे. कोविड महामारीमुळे अडचणींचा
सामना करणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
देशात लसीकरणाचा वेग वाढवून
लवकरात लवकर प्रत्येक नागरिकाला कोविड प्रतिबंधक लस देऊन, कोरोना विरुद्धच्या लढाईत
सुरक्षित करण्यासाठी, केंद्र सरकार देशी लस उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. त्यानुसार
कोव्हॅक्सिन लस निर्मितीसाठी हाफकिन बायो फार्मा इन्सटीट्यूटने, भारत बायोटेक कंपनीशी
करार केला असून, हाफकिन दरवर्षी २२ कोटी ८० लाख लसींचं उत्पादन करणार आहे. यासाठी केंद्र
सरकारने ६५ कोटी, आणि महाराष्ट्र सरकारने ९४ कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. हाफकिनचे
व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड यांनी ही माहिती दिली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत
देशांतर्गत लस उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने, उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहर इंथ दोन
खाजगी कंपन्या ही लस निर्मिती करणार आहे.
****
दरम्यान, भारत बायोटेक कंपनी
उत्पादित कोव्हॅक्सिन लसीच्या बालकांवरील चाचण्यांना काल पाटणा इथल्या एम्स मध्ये सुरुवात
झाली. आवश्यक त्या प्राथमिक चाचण्या केल्यानंतर १२ ते १८ वयोगटातल्या १५ बालकांची या
लस चाचण्यांसाठी निवड करण्यात आली. काल या बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली.
****
केंद्र सरकारने आतापर्यंत
देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना २३ कोटी पेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक
लसींच्या मात्रा मोफत वितरीत केल्या आहेत. त्यापैकी वाया गेलेल्या लसींच्या मात्रा
सोडून, जवळपास २१ कोटी ७१ लाख मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. अजूनही सर्व राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांकडे एक कोटी ६४ लाख मात्रा शिल्लक असल्याची माहिती, आरोग्य
मंत्रालयाने दिली आहे.
****
कोरोना संकटाच्या काळातही
भारतीय रेल्वेने गेल्या नऊ महिन्यात उच्चांकी मालवाहतूक करण्याची यशस्वी कामगिरी केली
आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर पासून ते यावर्षी मे पर्यंत, रेल्वेनं एक हजार २३३ दशलक्ष
टन मालाची वाहतूक केली असल्याची माहिती, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी
दिली. याकाळात देशात विविध राज्यातल्या ५९ मार्गावर ७३८ किसान रेल्वेच्या माध्यमातून,
सुमारे दोन लाख ३३ हजार टन शेतमालाची वाहतूक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सात ऑगस्टला
महाराष्ट्रातल्या देवळाली ते बिहार मधल्या दानापूर दरम्यान पहिली किसान रेल्वे सुरू
करण्यात आली होती.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसी
समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्याच्या मागणीसाठी, भारतीय जनता पक्षाच्या
वतीनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
****
उस्मानाबाद इथल्या राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीनं, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा पाच तालुक्यासाठी,
ऑक्सिजन मशिन देण्यात आल्या. या मशिनचा उपयोग घेण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं
डॉक्टरचं प्रमाणपत्र आणि ऑक्सिजन आवश्यकतेचं डॉक्टरांचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
यासाठी नाममात्र प्रति दिवसाला शंभर रुपये प्रमाणे दर आकारण्यात येणार असून, काही रक्कम
ठेवी स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे. गरजु रुग्णांनी या ऑक्सिजन मशिनचा उपयोग करुन घ्यावा,
असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज
शासकीय कोविड रुग्णालयातल्या ऑक्सिजन टँकमध्ये काल रात्री अचानक गळती झाली. रुग्णांना
ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अन्य दोन टँक असल्याने मोठा अनर्थ टळला. तातडीने उपायोजना
करून गळती थांबवल्याने किरकोळ गळती झाली. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणातही परिणाम
झाला नाही, असं जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्ण
दाखल करून घेण्यास नाशिक मधल्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशननं तयारी दर्शवली आहे. या आधी
२९ मे रोजी नाशिक मधल्या रुग्णालयांच्या संघटनेनं मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन देऊन, कोविड रुग्ण दाखल करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. गेल्या दीड वर्षांपासून
रुग्णालयांचे कर्मचारी आणि डॉक्टर काम करून थकले आहेत, त्यामुळे आता रुग्ण दाखल करणं
शक्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. दरम्यान, काल नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास
जाधव यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर रुग्णालयांनी रुग्ण दाखल करण्यास तयारी दर्शवली
आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या उस्मानाबाद
शाखेच्या वतीनं जिल्हयात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची बँक सुरु करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री
आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमतून ३५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उस्मानाबाद
जिल्ह्यासाठी उपलब्ध केले आहेत. या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर बँकेचं लोकार्पण माजी खासदार
डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment