आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०७ जून २०२१
सकाळी
११.०० वाजता
****
आयकर विभाग आजपासून आपले नवीन पोर्टल, www.incometax.gov.in सुरु करत आहे. करदात्यांना
सुलभता आणि आधुनिक, वेगवान सेवेचा अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशानं, हे नवीन पोर्टल
सुरू करण्यात आलं आहे. करदात्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन कर भरणा प्रणाली १८ जून
रोजी म्हणजेच आगाऊ कर हप्ता भरण्याच्या तारखेनंतर सुरू करण्यात येणार असून, या नवीन
संकेतस्थळावर करदात्यांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
****
राज्यात
येत्या दहा जून पासून सुरु होत असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षेसाठी
कोविड बाधित असलेल्यांना संधी द्यावी अशी मागणी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले
यांनी केली आहे. ते काल गोंदिया इथं वार्ताहरांशी बोलत होते. पेट्रोलच्या दर वाढीमुळे
कॉंग्रेसतर्फे आज राज्यातल्या २८८ विधानसभा क्षेत्रातील एक हजार पेट्रोल पंपांसमोर
सेल्फी काढत आंदोलन करणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली.
****
अंबाजोगाई
इथल्या योगेश्वरी देवल समितीच्या वतीनं स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालयाला १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यंत्रं देण्यात आली. प्रभारी अधिष्ठाता डॉ.
संदीप निळेकर यांच्याकडे ही यंत्र सुपूर्द करण्यात आली.
****
राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण विकास मंत्री सुनील केदार हे
काल तुळजापूर दौऱ्यावर आले होते. राज्य
खो खो संघटनेचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांच्यासह एका शिष्टमंडळानं केदार यांची
भेट घेऊन, उस्मानाबाद जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासंदर्भात विविध मागण्यांचं निवेदन सादर
केलं.
****
नांदेड
इथं ‘टेनिस कोर्ट’ चं काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याहस्ते ऑनलाईन उदघाटन करण्यात
आलं. शहरात उपलब्ध रिकाम्या जागेवर छोटी-छोटी क्रीडांगणं, विकसित केली तर युवा खेळाडूंच्या
क्रीडा गुणांना वाव मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
****
बीड तालुक्यातल्या जरुड इथं शेतात चोरुन वीज टाकलेल्या आकड्याला स्पर्श
झाल्यानं दांपत्य ठार झाल्याची घटना घडली. वैजनाथ बरडे आणि शोभा बरडे असं या
दांपत्याचं नाव असून, याप्रकरणी चोरुन वीज टाकल्याप्रकरणी
रामकिसन काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment