Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्यासह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या बैठकीला
उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर
चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी समाज मध्यमांवरून जाहिर केलं.
****
शैक्षणिक
संस्था आकारत असलेल्या शुल्क नियमनासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई,
पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद अशा पाच विभागीय शुल्क नियामक समित्या स्थापन केल्या
आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद असतानाही अनेक शाळांनी शुल्कवाढ केल्याच्या
तक्रारी शिक्षणमंत्र्यांकडे येत होत्या, या शुल्कवाढीविरोधात पालकांना या समित्यांकडे
दाद मागता येईल.
****
दहावी
आणि बारावी च्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी, या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र हे
योग्य प्रकारेच देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय
सामंत यांनी काल सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. भविष्यात नोकरी
किंवा उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली
जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. बारावी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील,
त्या अनुषंगाने व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश
प्रवेशाचा तातडीनं निर्णय घेण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं.
दरम्यान,
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल १५ जुलै नंतर जाहीर होईल,
असं मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्य मंडळाकडून नववी आणि दहावीतील अंतर्गत
मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.
****
इतर मागासप्रवर्ग - ओबीसी आरक्षण बचावासाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन
करणार असल्याची माहिती, राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
ते काल नाशिक इथं बोलत होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द
करण्याबद्दलचा निर्णय न्यायालयानं दिला असून, याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर
सर्व देशात होणार आहे, त्यामुळे आता सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रितपणे लढा देण्याची
गरज असल्याचं भुजबळ म्हणाले. यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार
असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
देशात
काल नव्या ८६ हजार ४९८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार १२३ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ८९ लाख
९६ हजार ४७३ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ५१ हजार ३०९ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल एक लाख ८२ हजार २८२ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ७३ लाख
४१ हजार ४६२ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १३ लाख तीन हजार ७०२ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रोनं वेगवेगळ्या प्रकारचे तीन व्हेंटिलेटर्स विकसित केले
आहेत. ‘प्राण’ अर्थात ‘प्रोग्रामेबल रेस्पिरेटरी असिस्टन्स फॉर द नीडी एड’ असं या व्हेंटिलेटर्सचं
नाव असून, त्याची किंमतही अतिशय कमी आहे आणि पोर्टेबल असल्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या
ठिकाणी ते सहजपणे नेता येतं. प्रकृती गंभीर असलेल्या बाधितांच्या फुफ्फुसात आवश्यक
त्या मात्रेत प्राणवायू पुरवठा करण्यासाठी हे व्हेंटिलेटर्स अतिशय उपयुक्त असल्याचं
इस्रोनं म्हटलं आहे.
****
कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं जारी केलेलं दिव्यांगांचं ओळखपत्र, ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जावं, असं
केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या संदर्भात सर्व
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात,
कोविन ॲपवर लसीकरता
नोंदणी करताना आवश्यक ओळखीचा पुरावा म्हणून, सात विविध दस्तऐवजांचा उल्लेख केलेला आहे, त्यात
दिव्यांगांचं ओळख प्रमाणपत्र - UDID देखील समाविष्ट करावं,
असं म्हटलं आहे.
****
भारतीय
न्याय व्यवस्थेत, माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान लागू करण्यासंबंधातल्या राष्ट्रीय
धोरणावर काम करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीनं, न्यायालयीन कामकाजाचं चित्रीकरण
आणि थेट प्रसारणासंदर्भात एक मसूदा तयार केला आहे. ई कमिटी एससीआय डॉट जीओव्ही डॉट
इन या संकेतस्थळावर हा मसूदा उपलब्ध असून, या मसुद्यावर ई समितीनं सर्व संबंधितांकडून
मतं मागवली आहेत.
****
राज्यात
१५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत
वनविभागातर्फे नागरिकांना सवलतीच्या दरात रोपं पुरवण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment