Tuesday, 8 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      येत्या २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत कोविड लस देणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.

·      प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला दिवाळीपर्यंत मुदतवाढ.

·      पुणे जिल्ह्यात रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत, १६ महिलांसह १८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू.

·      महाविकास आघाडीतील काही नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार.

·      इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचं राज्यभर आंदोलन.

·      राज्यात १ हजार २१९ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ३९ जणांचा मृत्यू तर ६७९ बाधित.

आणि

·      मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात पाऊस.

****

येत्या २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत कोविड लस देणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. काल सायंकाळी जनतेशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. राज्यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे सोपवलेल्या २५ टक्के लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार स्वत:कडे घेत आहे, देशात उत्पादीत लसींपैकी ७५ टक्के मात्रा केंद्र सरकार खरेदी करून, त्यांचा राज्य सरकारांना पुरवठा करेल, पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले –

21 जून सोमवार से देश के हर राज्य में 18 वर्ष के उपर की उम्र के सभी नागरिकों के लिए भारत सरकार राज्यों को मुफ्त वॅक्सिन मुहय्या कराएगी। वॅक्सिन निर्माताओं से पूर्ण वॅक्सिन उत्पादन का 75 प्रतिशत हिस्सा भारत सरकार खुद ही खरीदकर राज्य सरकारों को मुफ्त देगी। याने देश की किसी भी राज्य सरकार को वॅक्सिन पर कुछ भी खर्च नही करना होगा।

 

शुल्क भरून लस घेण्यास इच्छुक नागरिकांना खासगी रुग्णालयातून लसीची मात्रा घेता येईल. खासगी रुग्णालयांना एका मात्रेसाठी किंमतीपेक्षा कमाल दीडशे रुपये सेवा शुल्क घेता येईल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

आतापर्यंत देशात २३ कोटी नागरिकांचं कोविड लसीकरण झाल्याची माहिती, त्यांनी दिली. सध्या देशात सात कंपन्या लस तयार करत असून, तीन कंपन्यांचं लसीवर संशोधन सुरू आहे. नाकात फवारा उडवून घेण्याच्या लसीवरही संशोधन सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला दिवाळीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. ते म्हणाले –

सरकार ने फैसला लिया है की ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ को अब दिपावली तक आगे बढाया जायेगा। यानी नवंबर तक 80 करोड से अधिक देशवासियों को हर महिने तय मात्रा मे मुफ्त अनाज उपलब्ध होगा। इस प्रयास का मकसद यही है की मेरे किसी भी गरीब भाई-बहन को उसके परिवार को भूखा सोना ना पडे।

****

पुण्याजवळ मुळशी इथं औद्योगिक परिसरातील, एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत, १६ महिलांसह १८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. सॅनिटायझरचं उत्पादन करणाऱ्या या कंपनीत काल दुपारी ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या नऊ बंबाच्या सहाय्यानं सायंकाळी उशीरा ही आग आटोक्यात आणण्यात आली. राज्य सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृताच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली.

****

राज्यातील महाविकास आघाडीतील काही नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. यावेळी मराठा आरक्षण, इतर मागासवर्गीय-ओबीसी आरक्षण आणि तौक्ते चक्रीवादळ मदतीसह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली जाईल.

****

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षानं काल राज्यभर आंदोलन केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली इथं पेट्रोल पंपावर आंदोलन करून, केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात, शहरातल्या जालना महामार्गावरच्या पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आलं. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर इथंही काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करत, इंधन दरवाढीचा निषेध केला.

****

ग्रामपंचायत सरपंचांनी आपापलं गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा,  गावामध्ये कोरोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक, कोकण आणि पुणे विभागातल्या सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी, गावात शासनाच्या सूचनांप्रमाणे विविध उपाययोजना राबवून माझे गाव, कोरोनामुक्त गावहे ध्येय लवकर साध्य करावे,  असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल मुलांमधल्या संभाव्य कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी, या विषयावर काल बालरोग तज्ञांच्या कृती दलाच्या सदस्यांसोबत आशा सेविकांशी संवाद साधला.

****

औरंगाबाद शहरातले निर्बंध उठवल्यामुळे काल शहरातल्या सर्व बाजारपेठा सुरु झाल्या. विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. रस्त्यांवर रहदारी वाढली असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी जनतेला काळजी घेण्याविषयी आवाहन केलं आहे. ते म्हणाले –

दर गुरुवारी आपला जिल्हा प्रशासन आपले कोविड रुग्णांची पॉझिटीव्हीटीची टक्केवारी काय आहे आणि ऑक्सिजन बेड किती रिकामे आहेत, त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत आणि तदनंतर हे ठरवणार आहोत की, पुढच्या वीकमध्ये आपण कोणत्या लेव्हल मध्ये राहणार आहे. आपली जर पॉझिटीव्हीटी वाढली, तर आपल्या औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये परत लेव्हल तीन लेव्हल चार चे निर्बंध येण्याची आशंका आहे. जोपर्यंत आपली पॉझिटीव्हीटी पाच परसेंटपेक्षा कमी आहे आणि आपले २५ परसेंटपर्यंत ऑक्सिजन बेड रिकामे आहेत तोपर्यंत आपण लेव्हल वन मध्ये राहणार आहे. याच्यामध्ये आपण जबाबदारीने वागा आणि कोविड अप्रोप्रियट बिव्हेरीयचे पालन करुन आपलं महानगरपालिका लेव्हल वन मध्ये ठेवण्यामध्ये सहकार्य करा.

 

दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातल्या १४ आरोग्य केंद्रांवर आणि चार केंद्रांवर चोवीस तास चाचणी करण्यात येणार आहे. मात्र, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं आरटीपीसीआर चाचणीऐवजी लसीकरण करण्यात यावं अशी मागणी केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद स्मार्ट शहर बस सेवा आजपासून सुरु होत आहे. शहरातल्या पाच मार्गांवर १६ बसच्या २४१ फेऱ्या होणार असल्याचं, स्मार्ट शहर बस विभागाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

****

राज्यात काल १ हजार २१९ नवे कोविड रुग्ण आढळले. राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या आता ५८ लाख ४२ हजार झाली आहे. काल १५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. काल २१ हजार ८१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५५ लाख ६४ हजार ३४८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक २५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ७४ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ६७९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३९ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी १४, बीड सहा, जालना पाच, तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले १५५ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद १४३, उस्मानाबाद १४२, नांदेड ७६, परभणी सदूसष्ठ, जालना ४६, लातूर ४५, तर हिंगोली जिल्ह्यात काल पाच नवे रुग्ण आढळून आले.

****

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांबाबत, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं, शाळांना नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रलंबित प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षा आता फक्त ऑनलाइन माध्यमातून घ्याव्या लागणार आहेत. यात बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण येत्या २८ जून पर्यंत सीबीएसईच्या वेबसाइटवर अपलोड करण्याच्या सूचनाही, देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत परीक्षा घेताना प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वतंत्र छायाचित्र सुद्धा घ्यावं लागणार आहे.

****

मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार मराठा समाजाच्या संघटनांमध्ये फूट पाडत आहे, असा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. खासदार संभाजी राजे यांनी येत्या १६ जून रोजी प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. आता यानंतर होणाऱ्या बैठकीत खासदार संभाजी राजे आणि शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनाही चर्चेसाठी बोलवण्यात येणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.

****

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाकडे लक्ष द्यावं, असे निर्देश महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी, प्रशासनाला दिले आहेत. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात काल झालेल्या कोरोना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रस्तावित ग्रामीण आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, दुरूस्ती यावर लक्ष द्यावं, असं सत्तार यांनी सूचित केलं.

****

कोविड काळात पालक गमावलेल्या अनाथ मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी परभणी जिल्हा मंगल कार्यालय संघटनेनं, मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यासंदर्भात आवाहन केलं होतं. जिल्ह्यातल्या मंडप डेकोरेशन संघटनेनं सुद्धा या निर्णयाला समर्थन देत, मंडप सजावटीचं सर्व साहित्य विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

****

मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर काल मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी तसंच हिंगोलीसह अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.

औरंगाबाद शहर परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात अंभई परिसरात काल मुसळधार पाऊस झाल्यानं केळणा नदीला पहिला पूर आला. शहरात अनेक ठिकाणी पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली.

जालना शहरासह जिल्यातल्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात पवना गाव परिसरात दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. गाव शेजारच्या माळावरचं पावसाचं पाणी गावातल्या अनेक घरात घुसल्यानं, नागरिकांची तारांबळ उडाली. हिमायतनगर तालुक्यात भोकर ते इस्लापूर मार्गावरचा पूल पावसात वाहून गेल्यानं हिमायतनगर ते इस्लामपूर चा संपर्क तुटला आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या जरोडा शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला तर पाच महिला जखमी झाल्या. काल दुपारी ही घटना घडली. जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यात पिंपळदरी इथं एका गोठ्यावर वीज कोसळून एक बैल आणि गाय दगावली.

परभणी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या २ दिवसात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परभणी शहरात काल दुपारच्या वेळी काही काळ पाऊस पडला. तसंच जिल्ह्यातल्या सेलू आणि जिंतूर शहरासह तालुक्यात काही भागात देखील काल जोरदार पाऊस झाला.  वेळेवर आलेल्या या पावसानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, येत्या ११ जून पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या भोगावदेवी गावचे सरपंच शिवाजीराव मोरे- देशमुख यांचं काल पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल भोगावदेवी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. २५ वर्षांपासून ते सरपंच म्हणून कार्यरत होते. पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. परभणी जिल्हा परिषदेचे ते दोन वेळा सदस्य होते.

****

शेतकऱ्यांच्या नावाने आलेला मागच्या वर्षाचा विमा सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी हडप केल्याचा आरोप, भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. केंद्र सरकारनं विमा कंपनीला त्यांचा सहभाग निधी देवून सुद्धा, कंपनी तांत्रिक कारणं सांगून विमा वाटप करत नाही, यावर मराठवाड्यात एकही मंत्री बोलत नसल्याची टीका, कुलकर्णी यांनी केली. विमा वाटप झालं नाही, तर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही असा इशारा, त्यांनी औरंगाबाद इथं एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

****

मागासवर्गीय कर्मचारी-अधिकारी यांचं पदोन्नतीत रद्द केलेले आरक्षण कायम करावं, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे, काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...