Tuesday, 8 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०८ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालं आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौक्ते चक्रीवादळ मदतीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

येत्या २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत कोविड लस देणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. देशात उत्पादीत लसींपैकी ७५ टक्के मात्रा केंद्र सरकार खरेदी करून, त्यांचा राज्य सरकारांना पुरवठा करेल, असं त्यांनी सांगितलं.

****

बँकिंग नियमन कायदा १९४९ मध्ये केंद्र शासनानं गेल्या वर्षी केलेल्या सुधारणांचा, राज्यातल्या सहकारी बँकांच्या कामकाजावर होणारा परिणाम, आणि त्या अनुषंगानं करावयाच्या उपाययोजना, याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सहकार आयुक्त तसंच निबंधक अनिल कवडे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

****

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक विषयांवर या भेटीत चर्चा झाली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व स्मारकं, पुरातन स्थळं सुरु करण्याची मागणी, औरंगाबाद टूरिस्ट गाईड असोसिएशन, आणि औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हादसिंग पटेल आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना, याबाबतचं निवेदन पाठवण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तहसील कार्यालयात काल अग्निशमन दलाच्या वतीनं आपत्कालीन व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या यंत्रणांचं प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यावेळी नागरिकांना प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूंची माहिती देण्यात आली.

****

लातूर महानगरपालिकेच्या पाच मोफत लसीकरण केंद्रांवर, आज १८ ते ४४ वर्ष तसंच ४५ वर्षावरील नागरिकांसाठी, कोवॅक्सिन लसीची फक्त दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...