Wednesday, 9 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०९ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मुंबईत मान्सूनचं आगमन झालं असून, आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं असून, वहातूक कोंडी झाल्याचं वृत्त आहे. मध्य रेल्वेची वाहतुकही विस्कळीत झाली आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे.

****

कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या परिवाराला लवकरात लवकर निवृत्त वेतन देण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिले आहेत. अशा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची प्रक्रिया संबधित विभागांनी लवकरात लवकर पूर्ण करावी जेणे करून या सदस्याच्या परिवाराचं निवृत्ती वेतन एक महिन्यात सुरू होईल, असं ते म्हणाले.

****

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेवर निवडून आलेल्या दोन, तसंच दोन मनोनित सदस्यांना काल राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. केरळमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व्ही सिवदासन, आणि पत्रकार जॉन ब्रिटास तसंच मनोनित सदस्य स्वपन दासगुप्ता आणि ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

****

पुण्यातल्या मुळशी तालुक्यात उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आग प्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे आग लागली असल्याचं निष्पन्न झालं आहे. या दुर्घटनेतल्या १२ मृतदेहांची ओळख पटली आहे.

****

टपाल खात्याने काशी, प्रयाग, हरिद्वार आणि गया इथं अस्थी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुकांना स्पीड पोस्टाने अस्थी पाठवता येणार असून, तीर्थक्षेत्री अस्थी विसर्जनाचे विधी मृताच्या कुटुंबाला लाईव्ह बघता येणार आहेत.

****

पिक विमा मंजूर झाला नसल्याच्या निषेधात औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर, खुलताबाद तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली लासूर नाक्यावरील कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी अडवल्यानं आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...