Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 June 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– १० जून २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू
संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे.
महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित
राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि
चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
खरीप हंगामातल्या
सर्व पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्यास केंद्र सरकारची मंजुरी.
·
शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारं कृषी सुधारणा विधेयक आगामी
पावसाळी अधिवेशनात मंजूर करणार- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.
·
राज्याच्या
अनेक भागात जोरदार पाऊस; मालाड उपनगरात मालवणी भागात न्यू कलेक्टर
परीसरात एक तीन मजली इमारत कोसळून ११ जण ठार मुंबईत सावधानतेचा इशारा.
·
राज्यात १० हजार ९८९ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ३६ जणांचा मृत्यू तर ६७९ बाधित.
·
हिंगोली जिल्हा परिषदेच्या
शिक्षण सभापतीविरूद्धचा अविश्वास ठराव मंजूर.
आणि
·
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकविमा नाकारणाऱ्या कंपन्यांविरूद्ध,
उस्मानाबादच्या खासदार -आमदाराकडून न्यायालयात खटला दाखल.
****
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं, खरीप हंगामातल्या सर्व पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्यास मंजुरी
दिली आहे. काल झालेल्या समितीच्या बैठकीनंतर
वार्ताहरांशी बोलतांना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ही माहिती
दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमान हमी भावातील,
सर्वाधिक ४५२ रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ, तिळाला देण्यात
आली आहे. त्याखालोखाल तूर आणि उडीदला, प्रत्येकी ३०० रुपये प्रति क्विंटल वाढ
देण्याची शिफारस करण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं.
भुईमुगाच्या शेंगाच्या भावात २७५ रुपये, ज्वारीच्या भावात ११८ रुपये, सूर्यफूल बियात १३० रुपये, बाजरीत
१०० रुपये, मध्यम धाग्याच्या कापसाच्या दरात २११ रुपये, लांब धाग्याच्या कापसाच्या
दरात २०० रुपये, मका २० रुपये, सोयाबीनच्या ७० रुपये, कारळ्याच्या
दरात २३५ रुपये तर मुगाच्या दरात, प्रतिक्विंटल ७९ रुपयांची वाढ करण्यात आली
आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन किमान खर्चाच्या दीड पट
किमान हमी भाव मिळावा अशी संकल्पना २०१८-१९ वर्षाच्या
अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आली होती; त्यानुसारच हा निर्णय
घेण्यात आल्याचं तोमर यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांच्या
हिताचं रक्षण करणारं कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार करणार असून, आगामी पावसाळी
अधिवेशनात हे विधेयक मंजूर केलं जाईल, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र सरकारनं केलेले तीनही कृषी कायदे शेतकरी
विरोधी आणि व्यापारी वृत्तीचं समर्थन करणारे असल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी थोरात
यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री विश्वजीत
कदम यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कृषी सुधारणा विधेयकावर
चर्चा केली.
****
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला.
मुंबईत
मालाड उपनगरात मालवणी भागात न्यू कलेक्टर परिसरात एक तीन मजली इमारत कोसळून ११ जण ठार
झाल्याचं वृत्त आहे. सहा जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
मुंबई तसंच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल मुसळधार पाऊस झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसंच ठाणे,
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
पालघर जिल्हाधिकारी
यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबई तसंच किनारपट्टीवरील जिल्ह्यातल्या नागरिकांना असुविधा होणार नाही
यासाठी प्रशासनानं तातडीनं पाऊलं उचलावीत, आणि
आवश्यकता असेल तिथं मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील, कोविडसह
इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना, मुख्यमंत्र्यांनी
दिल्या.
मुंबईत पंपींग स्टेशन्स कार्यरत राहतील, आणि
साचलेल्या पाण्याचा लगेच उपसा होईल, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जोरदार पावसामुळे वाहतूक मंद किंवा
थांबलेली असेल तिथे पोलीस आणि इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर
करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.
नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. शहरातल्या वाशी, सानपाडा या सखल भागात पाणी साचलं आहे. सीबीडी बेलापूर इथल्या कोकण विभागीय
आयुक्त कार्यालय परिसरात पाणी साचल्यामुळे कार्यालय परिसर जलमय झाला आहे.
रायगड जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत असल्यानं सर्वच नद्यांना पूर आला
आहे. रोह्यात कुंडलिका, नागोठण्यात आंबा, नहाडला
सावित्री, पनवेलला गाढी, उल्हास,
पाताळगंगा अशा सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात काल ५८
पूर्णांक ९९ मिली मीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, हवामान विभागानं मुंबईत सावधानतेचा इशारा
जारी केला असून, पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार
असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सूनने संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र,
उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा आणि विदर्भात नागपूर पर्यंत मजल मारली आहे.
दोन दिवसात महाराष्ट्र व्यापून मान्सून गुजरात, मध्य प्रदेशात दाखल होईल.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर तालुक्यात काल दुपारी अडीच
वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु झाला. सिल्लोड तालुक्यात गोळेगाव, उंडणगाव परिसरात अतिवृष्टी झाली. यामुळे
सिल्लोड-जळगांव महामार्गावर गोळेगाव जवळ जूही
नदी वर पुलाचं काम सुरु असलेल्या ठिकाणचा पर्यायी पुल वाहून गेल्यानं काही काळ वाहतूक खोळंबली. औरंगाबाद शहरातही काल संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झाला. फुलंब्री
तालुक्यातल्या बाभुळगाव तरटे इथं वीज पडून अठरा वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.
****
परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल सकाळपर्यंत पाऊस सुरु होता. विजांच्या कडकडाट
आणि सोसाट्याचा वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी
साचलं, विशेषतः मध्यवस्तीतील रस्ते पावसानं पूर्णतः
जलमय झाले, काही तास रस्ते पाण्याखाली होते. वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातून वाहणाऱ्या पिंगळगड नाल्यावरील छोट्या पुलावरून मोठ्या
प्रमाणावर पाणी वाहत होतं. त्यामुळे सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत दोन्ही बाजूची
वाहतूक पूर्णतः ठप्प होती.
बीड
जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या कन्हेरवाडी, आणि नंदागौळ या दोन गावात मुसळधार पाऊस झाला.
परळी ते अंबाजोगाई ला जोडणाऱ्या कण्हेरवाडी इथला पर्यायी रस्ता अन पूल वाहून गेला.
त्यामुळे या रस्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत-असेगाव रस्त्यावरील टाकळगाव इथं नदी तुडुंब भरून
वाहत आहे. या ठिकाणचा रस्ता बंद असून, नागरिकांनी
वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन, जिल्हा
प्रशासनानं केलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड, मठपिंपळगाव, आलमगाव, तीर्थपुरी, कुंभार
पिंपळगाव या भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. बदनापूर, भोकरदन, मंठा तालुक्यातल्या काही भागातही पावसानं
काल हजेरी लावली.
****
यवतमाळच्या पुसद परिसरात काल ढगफुटी सदृश्य कोसळलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं. धुळे
जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात रोहीणी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरपूर पॅटर्न अतंर्गत बांधलेले बंधारे भरून वाहत आहे. तालुक्यातील थाळनेर गावात वीज
पडून एक जणाचा मृत्यू झाला.
बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खामगाव तालुक्यातल्या
ढोरपगाव सह परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं.
****
राज्यात काल १० हजार ९८९ नवे कोविड
रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५८ लाख ६३ हजार ८८० झाली आहे. काल २६१
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं
दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख एक हजार ८३३
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. काल १६ हजार ३७९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५५ लाख ९७ हजार ३०४ रुग्ण, कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५
पूर्णांक ४५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ६१
हजार ८६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ६७९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर ३६ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला.
मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या १२, औरंगाबाद आठ, बीड सात, जालना चार हिंगोली आणि
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
समावेश आहे.
बीड जिल्ह्यात १४६ रुग्ण आढळले. औरंगाबाद १४४, नांदेड १३८, उस्मानाबाद ११९,
लातूर ६७, जालना ३२, परभणी ३०, तर हिंगोली जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळून आले.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीविरूद्धचा अविश्वास ठराव, ३५ विरुद्ध शून्य मतानं पारित
झाला. हिंगोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँगेस, शिवसेना
आणि काँग्रेसच्या आघाडीची सत्ता आहे. शिक्षण सभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या
रत्नमाला चव्हाण यांच्याकडे होतं. काल या अविश्वास ठरावावरील चर्चेस उपस्थित
असलेल्या सर्व ३५ सदस्यांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. यामध्ये शिवसेनेचे ११,
काँग्रेसचे १०, राष्ट्रवादीचे १०, दोन अपक्ष तर दोन भाजपाच्या सदस्यांच्या समावेश होता. १५ सदस्य मात्र
गैरहजर होते. जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून त्यापैकी दोन जागा रिक्त आहेत.
शिक्षण सभापतीपदाचा पदभार घेतल्यानंतर चव्हाण यांच्यावर सदस्यांना विश्वास न
घेता कामं करणं यासह इतर आरोप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी पुढाकार घेतला.
****
जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटी रुपयांचा
आराखडा तयार करून, हा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. परभणीचे आमदार
डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं, काल
पाटील यांची भेट घेऊन, या कालव्याच्या दुरुस्तीची मागणी
केली. यासाठी आवश्यकता भासल्यास जागतिक बँकेकडून कर्ज घेतलं जाईल, असं पाटील यांनी सांगितल्याचं, आमदार डॉक्टर राहुल
पाटील म्हणाले. हा कालवा नादुरुस्त असल्यामुळे या कालव्यातून पूर्ण क्षमतेनं पाणी
वहन होत नाही. त्यामुळे परभणी मतदारसंघातली ५० टक्के गावं, गेल्या
अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती
लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी, करण्यात येत आहे.
****
अनुसुचित जातीसाठीच्या आरक्षणाची अ, ब,
क, ड वर्गवारी करावी,
आणि मातंग समाज तसंच अन्य जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ द्यावा,
अशी मागणी लहु प्रहार या सामाजिक संघटनेनं,
विभगीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. क्रांतीवीर
लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगानं शिफारस केलेल्या, आणि
राज्य शासनानं तत्वत: मान्य केलेल्या ६८ शिफारशी संदर्भातील शासन निर्णय तात्काळ
पारीत करावे, मातंग भुमिहिनांना गायरान जमिनीचं वाटप करावं, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास
महामंडळाचं भागभांडवल एक हजार कोटी रूपये करावं, आणि बंद पडलेल्या योजना तात्काळ सुरु
कराव्यात, यासह अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या
आहेत.
****
अनुसुचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक-अॅट्रॉसिटी
कायद्यांतर्गत, अन्यायग्रस्ताला शासनाच्या वतीनं देण्यात
येणारं आर्थिक सहाय्य त्वरीत देण्यात यावं, अशी सूचना औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी,
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
झाल्यानंतर अन्यायग्रस्ताला समाज कल्याण विभागाकडून २५ टक्के रकमेच्या स्वरूपात मदत दिली जाते, त्यांनतर न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, ५०
टक्के रक्कम आणि फिर्यादीच्या बाजूने निकाल लागल्यानंतर उर्वरित २५ टक्के आर्थिक
सहाय्य दिलं जातं. गेल्या दिड
वर्षांपासून हे आर्थिक सहाय्य शासनस्तरावर प्रलंबित असल्याचं त्यांनी या पत्रात
नमूद केलं आहे.
****
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न
देणाऱ्या पिकविमा कंपन्यांविरूद्ध, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी, न्यायालयात खटला दाखल केला आहे. शासनाच्या वतीनं
पंचनामे करण्यात आले होते, पंचनाम्याद्वारे राज्य शासनानं
तातडीनं अनुदान दिलं. मात्र ७२ तासात ऑनलाईन तक्रार न
केल्याचं कारण देऊन कंपन्यांनी विमा देण्यास
नकार दिला. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेत
प्रश्न उपस्थित करुनही काहीच उपयोग झाला नाही, त्यामुळे न्यायालयात
विमा कंपन्याविरोधात दावा दाखल करण्यात आला आहे असल्याचं,
खासदार निंबाळकर आणि आमदार घाडगे-पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान,
खरीप २०२० हंगामातील प्रलंबित पिक विमा तात्काळ वितरित करावा,
या मागणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना
पाठवावेत, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी, उस्मानाबाद मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी
शासन निर्णयानुसार, त्यांच्या नफ्यातला १० ते २५ टक्के निधी, वैद्यकीय उपकरण खरेदी करण्यासाठी वापरावा, असं
आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
कडून खरेदी करण्यात आलेल्या दहा व्हेंटिलेटरचं लोकार्पण करताना
ते काल बोलत होते. खरेदी
केलेली ही उपकरणं जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावीत, असं
ते म्हणाले.
****
उस्मानाबाद इथल्या कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या, ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’, या काव्यसंग्रहाला, लातूर च्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर अकॅडमीच्या वतीनं, उत्कृष्ठ कवितासंग्रहाचा
राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचं हे तेरावं वर्ष असून, कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर, एका सोहळ्यात हा
पुरस्कार वितरित केला जाणार असल्याचं, अकॅडमीचे सचिव प्रकाश
घादगीने यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment