Monday, 14 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्रेमी-अभ्यासकांचा सहभाग असलेली मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.

·      येत्या २६ जूनपासून, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात - शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे.

·      मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून काहीही निष्पन्न होणार नाही; संसदेत आवाज उठवण्याची गरज - अशोक चव्हाण.

·      राज्यात पाचही वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री - खासदार संजय राऊत.

·      निवडणुका स्वबळावर लढवण्याची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका योग्य - काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान.

·      मराठी माध्यमाच्या शाळा उद्यापासून सुरु, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच शाळेत तर विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेणार.

·      राज्यात १० हजार ४४२ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २९ जणांचा मृत्यू तर ३९७ बाधित.

आणि

·      औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात सहाजण ठार तर १२ जण जखमी.

****

राज्यातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्रेमी-अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या अडीचशे दुर्ग प्रेमींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत त्यांच्या सूचना काल जाणून घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या गड-किल्ल्यांचं पावित्र्य टिकवत त्यांचं संवर्धन करण्याचं काम सुरू असून, दुर्ग प्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी याबाबत आपल्या सूचना आणि प्रस्ताव, आपल्या सचिवालयातल्या संकल्प कक्षाकडे पाठवाव्यात असं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. या सूचना, ‘सीएम’ ‘संकल्प कक्ष’ ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन, या मेलवरही पाठवता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

****

औरंगाबाद इथून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जूनपासून, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपण राज्याचा दौरा करत असल्याचंही, त्यांनी काल औरंगाबादमध्ये समाज बांधवांशी संवाद साधल्यानंतर, एका पत्रकार परिषदेत सांगितलं. येत्या पाच जुलै पर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही, तर येत्या सात जुलैपासून सुरु होणारं राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा, त्यांनी यावेळी दिला.

****

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून काहीही निष्पन्न होणार नाही, असं मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ज्या ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत, त्यांनी तिथेच आवाज उठवला तर फायदा होईल, सर्वांनी कायदेशीर लढाई लढली पाहिजे, असं ते म्हणाले. बिलोली इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं लोकार्पण चव्हाण यांच्या हस्ते झालं.

****

राज्यात पाचही वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री कायम राहील हे अगोदरच ठरलं असल्याचं, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणं गैर नाही, अनेकांना तसं वाटत असतं, असं ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आता दिल्लीत मोर्चा काढून, केंद्र सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देणं योग्य असल्याचं राऊत यांनी नमूद केलं.

****

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेसनं स्वबळावर लढवण्याची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका योग्य असून, पक्षाचीही भूमिका हीच असल्यानं आपलं त्याला समर्थन असल्याचं, माजी मंत्री- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. काँग्रेस सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसनं एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून, स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल, असं खान म्हणाले.

****

राज्यात मराठी माध्यमाच्या शाळा उद्यापासून सुरु होत आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे यंदाही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच शाळेत येतील, विद्यार्थ्यांना मात्र घरी बसून, ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे.

दरम्यान, विद्या परिषदेच्या शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवरुन सोमवार ते शुक्रवार इयत्तानिहाय तासिकांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. हे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे. 

****

राज्यात काल १० हजार ४४२ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ०८ हजार ९९२ झाली आहे. काल ४८३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ११ हजार १०४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८८ शतांश टक्के झाला आहे. काल ७ हजार ५०४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ३९ हजार २७१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ४४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ५५ हजार ५८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २९ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ११, जालना सहा, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, बीड तीन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ११३ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात १०८, उस्मानाबाद ६३, लातूर ४४, परभणी २५, जालना २२, नांदेड २०, तर हिंगोली जिल्ह्यसत दोन नवे रुग्ण आढळून आले. 

****

मराठवाड्यातील जालन्यासह राज्यातल्या अमरावती, पुणे तसंच छत्तीसगडमधील बिलासपूर या ठिकाणी, शंभर खाटांनी युक्त-सुसज्ज फिरते मेडिकॅब रुग्णालय, लवकरच सुरु होणार आहे. मद्रासच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था- आय.आय.टी.तर्फे मॉड्यूलस हाउसिंग या स्टार्ट अप उपक्रमाद्वारे, हे रुग्णालय विकसित करण्यात आलं आहे. या मेडीकॅब रुग्णालयांचं वैशिष्ट्य म्हणजे, यात अतिदक्षता विभाग, जीवरक्षक उपकरणं आणि वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था असून, रुग्णालयांची २५ वर्षे टिकाऊ क्षमता असल्याचं, पत्र सूचना कार्यालयानं सांगितलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचं काम शासनानं ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावं, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असून या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असल्यानं राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि संबंधित गुत्तेदार यांनी हे काम गुणवत्तापूर्ण तसंच अधिक गतीनं होण्यासाठी यंत्र सामुग्रीची संख्या वाढवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ या रस्त्याच्या कामाची पाहणी राज्यमंत्री बनसोडे यांनी केली तसंच उदगीर इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एका महिन्याच्या काळात जर संबंधित गुत्तेदार यांनी रस्त्याच्या कामाची गती वाढवली नसल्याचं दिसून आलं तर त्यांच्या विरोधात निवेदनातल्या तरतुदीप्रमाणे राज्य रस्ते विकास मंडळानं कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देशही राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी दिले.

****

लातूर जिल्ह्यात पंचेचाळीस वर्ष आणि त्यावरील वयोगटासाठीचं लसीकरण आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू रहाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. महापालिकेतर्फे शहरातल्या पाच ठिकाणी पंचेचाळीस वर्षे वयोगटावरचं लसीकरण सुरू रहणार आहे. जिल्ह्यातल्या नागरिकांनी या लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास ०२३८२-२२३००२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असं अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केलं आहे.

****

उस्मानाबाद इथं कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडील गमावलेल्या अठरा वर्षाखालील मुलांना शिवसेना जिल्हा कार्यकारिणीतर्फे काल प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य म्हणून मुदतठेव प्रमाणपत्र देण्यात आलं. राज्याचे पर्यटन मंत्री - शिवसेना युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे-पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात हिरडपुरीच्या नदी पात्रात अवैधरित्या जमा वाळू साठा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल जप्त केला. पैठण येथील मोक्षघाट, नवगाव आणि हिरडपुरी इथं नदीपात्रात  वाळू चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी थेट या भागाला भेट देऊन ही कारवाई केली. पैठणच्या नाथ मंदिर परिसरातल्या मोक्ष घाट इथं वाळू उपशाची पाहणी करतांना काल तिथल्या तीन दुकानं कोरोना प्रतिबंधात्मक शासकीय नियमावलीचा भंग करत असल्याचं आढळल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरही कारवाई करत त्यांना टाळं ठोकलं.

****

परभणी इथं ३१ हजार झाडं लावण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते काल झाला. जिल्ह्यातील ज्या इच्छुक सामाजिक संस्थांना वृक्षारोपण करायचं  आहे, त्यांच्यासाठी विविध झाडांची रोपं शिवाजीनगर इथल्या  आमदार संपर्क कार्यालयात  मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या खुल्ताबाद तालुक्यात खांडी पिंपळगाव इथं भेंडाळा मारोती वन परीसरात सातारा जिल्ह्यातील कास पठार या बहुरंगी फुलांसाठी प्रसिद्ध ठिकाणासारखंच  पठार विकसित केलं जाणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग केला जात आहे. या उपक्रमाची सुरुवात काल बिजारोपण करुन करण्यात आली. याप्रसंगी गोंदवले यांच्यासह, अन्य प्रशासकीय अधिकारी तसंच भेंडाळा मारोती संस्थानचे अध्यक्ष महेश उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

****

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात सहाजण ठार झाले तर १२ जण जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद घाटात दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. २३ वर्षीय मोनिका रेनवाला, तिचे वडील ज्ञानेश्वर परदेशी आणि मामा बद्री जाधव हे फुगे विकून घराकडे परतत असताना हा अपघात झाला.

सिल्लोडजवळ झालेल्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद पेटल्यानंतर काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, हा वाद सुरु असतानाच भराडीकडे जाणाऱ्या भरधाव जीपनं या सगळ्यांना धडक दिली.

****

जालना शहरातल्या अंबड चौफुलीवर काल सकाळी खासगी बस आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जीपमधील एक महिला ठार झाली तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील तीन लहान मुलांसह दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर जालन्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त प्रवासी सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या चांदर इथले रहिवासी असून, ते जालन्यातल्या रामनगर इथं विवाहसोहळ्यासाठी येत असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.

****

आषाढी वारीसाठी पालख्यांसमवेत येणाऱ्या भाविकांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केल्यावरच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी नगराध्यक्षा साधना भोसले यांची केली आहे. भाविक लसीकरण करून आले तर स्थानिक नागरिकांना धोका कमी वाटेल अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथल्या संत ज्ञानेश्वर महाराज- माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यावरून आळंदीचे गावकरी आणि वारकरी यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पालखी सोहळा यावर्षीही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा व्हावा, अशी आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी आहे. तर पालखी सोहळा पायी व्हावा यावर वारकरी ठाम आहेत.

****

रामकृष्ण मठ नागपूरहून निघणाऱ्या जीवन-विकास मासिकाचे संपादक, आणि आकाशवाणी नागपूरचे निवृत्त केंद्र संचालक अनंत अडावदकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. आचार्य विनोबा भावे यांच्या वाङमयावर त्यांना पीएचडी मिळाली होती. त्यांची अनेक साहित्य विषयक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी पुणे, पणजी आणि यवतमाळ आकाशवाणी केंद्रातही काम केले होते.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू नगर परिषदेनं शहरातील सर्व माजी सैनिकांची घरपट्टी-पाणीपट्टी माफ केली आहे. काल एका कार्यक्रमात संबंधितांना बेबाकीचं प्रमाण पत्र उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी आणि नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

****

मराठवाड्यात या दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...