Monday, 14 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१४ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २५ कोटीचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत आतापर्यंत लसीच्या २५ कोटी ४८ लाख ४९ हजार ३०१ मात्रा देण्यात आल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

आज जागतिक रक्तदान दिवस. यानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी, मानवता म्हणजेच रक्तदान, असं म्हटलं आहे. रक्तदानाशिवाय पवित्र असं दुसरंच कोणतंच कार्य नाही, मानवाच्या सेवेचं हे एक उत्तम उदाहरण असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

संरक्षणविषयक उपकरणांमध्ये अभिनव संशोधन करणाऱ्या संरक्षण अभिनवता संस्थेसाठी, आगामी पाच वर्षांकरता ४९८ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचा प्रस्ताव, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाला यामुळे चालना मिळेल, असं संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

कोविड नंतरच्या काळात भविष्याला आकार देण्यासाठी आर्थिक वृध्दीची कास धरणं हाच उपाय असल्याचं, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. पुढच्या पिढीला आमूलाग्र बदललेला समाज मिळवून देण्याची संधी त्यानिमित्तानं मिळाली असल्याचं, ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. देशात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आली असून, उत्तम कारखानदारी व्यवसाय आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पोषक वातावरण आहे, असं ते म्हणाले.

****

बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावं, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ते काल पुण्यात या संदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते.

****

मुंबईत पाच दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाल्यानंतर जोरदार पाऊस पडत आहे. मात्र मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव क्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस पडलेला नाही. असं असलं तरी सध्या मुंबईत जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्यानं पाणी कपातीचा प्रश्नच नसल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 26 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 26 April -2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...