Wednesday, 16 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – जून २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये पहिल्या मूक आंदोलनाला आज सुरुवात झाली. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलं, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून, आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आलं असून, त्यांना आपली भूमिका मांडण्यास सांगितलं होतं. त्यानुसार सर्व लोकप्रतिनिधींनी, आपल्या मनोगतामध्ये मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगत, हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं अश्वस्त केलं आहे. राज्य सरकारकडून मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर नेते आंदोलनात सहभागी झाले होते. हा लढा मराठा आरक्षणासाठी निर्णायक असून, सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक व्हायला हवी, असं मत आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलं. या आंदोलनात राजकारण होऊ नये, समन्वय कायम ठेवून हा प्रश्न मिटवावा, असं आमदार विनय कोरे म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पत्र, संभाजीराजे यांना दिलं. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही आंदोलनात सहभागी होत आपली भूमिका मांडली. मराठा आंदोलनात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असं ते म्हणाले. मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या पाच जुलै पासून मुंबईत सुरु होणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.

****

केंद्र सरकारच्या बँकींग नियमन कायद्याच्या सुधारणांचा सहकारी बँकांच्या कामकाजावर अनिष्ट परिणाम होणार नाही, यादृष्टीने शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या सहकारी बँकर्ससोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. बँकींग नियमन कायद्याच्या सुधारणांचा सहकारी बॅंकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं समिती गठित केली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

आगामी आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी आणि पालखी घेऊन येण्यासाठी किमान ५० भाविकांना अटी आणि नियम घालून परवानगी द्यावी आणि संबंधित निर्णय बदलून सहकार्य करावं, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळानं केली आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी पायी वारी रद्द करण्यात आली असून, याविरोधात वारकरी मंडळातर्फे आज सोलापूर जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन करण्यात आलं आणि मागणीचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.  

****

देशात काल नव्या ६२ हजार २२४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ५४२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ९६ लाख ३३ हजार १०५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ७९ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एक लाख सात हजार ६२८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ८३ लाख ८८ हजार शंभर रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या आठ लाख ६५ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या २६ कोटी १९ लाख ७२ हजार १४ मात्रा देण्यात आल्या आहेत.  

****

सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमध्ये अंतर वाढवण्याचा निर्णय वैज्ञानिक चाचण्या आणि पारदर्शकतेच्या आधारावर घेण्यात आला असल्याचं राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.एन.के. आरोरा यांनी सांगितलं आहे. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी, राष्ट्रीय सल्लागार समितीच्या कोणत्याही सदस्याने या निर्णयाच्या बाबतीत आक्षेप घेतला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

“जल शक्ती अभियान : कॅच द रेन” मोहिमेला आपापल्या संबंधित मतदार संघांमध्ये आणि राज्यामध्ये पाठींबा द्यावा, यासाठी जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना वैयक्तिक पत्र लिहिलं आहे. आगामी मान्सूनच्या हंगामामध्ये पावसाचं पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावं, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचं सर्व कामकाज कृषी विभागाकडून करुन घेण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधववर यांना काल देण्यात आलं. जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी तसंच नायब तहसिलदार यांचा प्रधानमंत्री किसान योजनेच्या कामावरील बहिष्कार कायम असल्याचं, या निवदेनात नमूद करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...