Friday, 18 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१८ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोविड-19शी लढण्याचं फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही वेळात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.

****

मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. मराठवाडा विकास आंदोलन आणि उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादला व्हावे यासाठी झालेल्या लढ्यात त्यांचा मोठा वाटा होता.

****

राज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर करण्याचे प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. हे प्रकल्प पुणे, गडचिरोली आणि जालना इथं सुरू होणार आहेत.

****

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यात अतिवृष्टी झाली. वारणा धरणातील पाणीसाठा एका रात्रीत दिड दशलक्ष घनमीटरने वाढला असून, सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी २३ फुटावर गेली आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरु असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पायथा वीज गृहातून २१०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा-इल्हाडी रस्त्यावर भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण ठार झाले. काल सायंकाळी ही घटना घडली. मृत दोघेही सोमठाणा इथले रहिवासी असून, ते शेतातून घरी जात असताना ही दुर्घटना घडल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.

****

तात्पुरत्या रद्द करण्यात आलेल्या काही विशेष रेल्वे गाड्या आजपासून सुरु होत आहेत. यात औरंगाबाद ते रेणीगुंठा विशेष एक्स्प्रेस आणि नांदेड ते औरंगाबाद विशेष एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रेणीगुंठा-औरंगाबाद ही उद्या शनिवारपासून तर औरंगाबाद -नांदेड ही रेल्वेगाडी येत्या २१ तारखेपासुन सुरु होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...