Monday, 22 November 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 November 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 November 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ नोव्हेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते शौर्य पुरस्कार प्रदान; प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र.

·      विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार संजय केनेकर यांची माघार; काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा.

आणि

·      राज्यातल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ भाजपची अनेक ठिकाणी निदर्शनं.

****

कर्तव्य बजावताना असामान्य शौर्य आणि समर्पणवृत्तीचं दर्शन घडवणाऱ्या सैन्य दलातल्या योद्ध्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये एका मोहिमेत दहशतवाद्यांचं षड्यंत्र निष्फळ केल्याबद्दल अभियांत्रिकी विभागातले सैनिक प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पाच दहशतवाद्यांना ठार करून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केल्याबद्दल मेजर विभूती शंकर ढोंडियाल यांना तसंच नायब सुभेदार सोमबीर यांना जम्मू कश्मीर मधल्या एका अभियानात केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं. पाकिस्तानचं एफ-16 लढाऊ विमान पाडून असामान्य कौशल्य दाखवल्याबद्दल ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

****

राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या हस्ते आज या सेवेचा प्रारंभ झाला. भारत निवडणूक आयोगातर्फे ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राबवण्यात येत असलेल्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने आता मतदार नोंदणी आणि त्यासंदर्भात सर्व प्रकारची माहिती आणि प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर मिळतील. मतदार यादीतल्या आपल्या नावाचा शोध घेणं, मतदार यादीत नाव नोंदवणं, त्यासाठीची आवश्यक कागदपत्रं, तांत्रिक स्वरूपाची माहिती, नाव किंवा पत्त्यात दुरुस्ती, नाव वगळणं आदी माहितीचा यात समावेश असेल.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांवर एच एन रिलायन्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना योग्यवेळी रुग्णालयातून सुटी देण्यात येईल असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फी मध्ये आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत बाबू बँड बाजा हा मराठी आणि काका मुथाई हा तामिळ चित्रपट दाखवला जाणार आहे. निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी हा मराठी चित्रपट आजचं मुख्य आकर्षण आहे. गोदावरी हा चित्रपट यावर्षीच्या सुवर्ण मयूर पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

****

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे आमदार शरद रणपीसे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. सातव यांच्या बिनविरोध निवडीचं वृत्त कळताच हिंगोली जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रज्ञा सातव यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, कोल्हापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपचे अमल महाडिक, अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल तसंच महाविकास आघाडीचे गोपीकिशन बाजोरिया यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.

****

लातूर जिल्हयातील १२६ ग्रामपंचायतीमधील २०० रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकांकरीता प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. यामुळं सदरिल ग्रामपंचायतीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहील असं उपजिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

नांदेड, मालेगांव आणि अमरावती इथल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे अंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आलं. प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वात झालेल्या या निदर्शनांमध्ये भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासामोर भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आलं. राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, मात्र, स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर सुरू असलेली कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. या मागणीचे एक निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. आमदार नारायण कुचे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

उस्मानाबाद इथं भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल डीझेल वरचा कर कमी करावा, तसंच महावितरण कडून सक्तीने होणारी कृषीपंपांची वीज तोडणी थांबवावी, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात येलकी इथं सशस्त्र सीमा दलाच्या छावणीत तैनात सैनिकाचा छातीत गोळी लागून मृत्यू झाला. पपला भानुप्रसाद असं या सैनिकाचं नाव असून, तो आंध्रप्रदेशातल्या विजयनगर जिल्ह्यातला रहिवासी आहे. आपल्या तुकडीतल्या एका डॉक्टरला आणण्यासाठी चारचाकी वाहनाने नांदेडला जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यात गाडी आदळल्याने रायफलमधून गोळी सुटली, ती भानुप्रसाद यांच्या छातीत लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...