Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू
प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या
दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी
सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली
आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६
आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत
वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· एस.
टी कामगार संघटनांशी टप्प्याटप्प्यानं चर्चा करून राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याचे
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश, कामावर जाणाऱ्या कामगारांना अडवल्यास गुन्हे दाखल
करण्याची राज्य सरकारला न्यायालयाची परवानगी
· विधानपरिषदेच्या
पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड
· लातूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार पॅनलचं वर्चस्व, जळगावमध्येही सहकार पॅनलला तर
धुळे- नंदुरबार बँकेत सर्वपक्षीय शेतकरी पॅनलला बहुमत
· मुंबईचे
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचं अटकेपासून संरक्षण
· राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वानखेडे यांच्या विरुध्द बोलण्यास रोखता येणार नसल्याचं
मुंबई उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण
· राज्यात
६५६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ३२ बाधित
आणि
· मराठा
आरक्षण घालवल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाची माफी मागण्याची माजी मंत्री
बबनराव लोणीकर यांची मागणी
****
राज्य परीवहन -एस. टी कामगार संघटनांशी टप्प्याटप्प्यानं चर्चा
करून राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले
आहेत. एस. टी. कामगारांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपासंदर्भात दाखल याचिकांवर काल
मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. कामगारांच्या
संपामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे याचा सरकारनं विचार करावा तसंच या
प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीनं कामगार संघटनांशी चर्चा करून लवकरात लवकर सकारात्मक
तोडगा काढावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
संपकाळात ज्या कामगारांना कामावर यायचं आहे, त्यांना धमकावलं
जात असल्याचं एस. टी. महामंडळानं काल न्यायालयात सांगितलं. यावर न्यायालयानं कामावर
जाणाऱ्या कामगारांना न अडवण्याचे निर्देश संघटनांना दिले. असं घडल्यास गुन्हे दाखल
करण्यास राज्य सरकारला न्यायालयानं परवानगी दिली आहे.
आपल्या विविध मागण्यांवर मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचं
कामगार संघटनांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी नेमण्यात आलेली समिती येत्या १३ डिसेंबर रोजी आपला
अहवाल सादर करणार असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान एस. टी. कामगार संपाबाबत तोडगा काढण्यासाठी काल मुंबईत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली.
विविध राज्यांची परिवहन सेवा, कामगारांचा पगार आणि अन्य मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे
काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे
आमदार शरद रणपीसे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. सातव यांच्या बिनविरोध
निवडीचं वृत्त कळताच हिंगोली जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रज्ञा सातव
यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ
ठरवण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार
संघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, कोल्हापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपचे
अमल महाडिक, अकोला-वाशिम - बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे वसंत
खंडेलवाल तसंच महाविकास आघाडीचे गोपीकिशन बाजोरिया यांनी आपले उमेदवारी अर्ज काल दाखल
केले.
राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं
तीन दोन उमेदवारांची घोषणा केली. यात कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून
विद्यमान आमदार सतेज पाटील, धुळे-नंदुरबार मधून गौरव देवेंद्रलाल वाणी तर नागपूरमधून
छोटू उर्फ डॉक्टर रवींद्र भोयर यांचा समावेश आहे. भोयर यांनी कालच भाजपमधून काँग्रेसमध्ये
प्रवेश केला होता.
****
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ
जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार
पॅनलला आठ जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी सहकार पॅनलचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून
आले आहेत. केवळ एक जागा भारतीय जनता पक्ष प्रणित पॅनलला मिळाली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर महाविकास आघाडीच्या
सहकार पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार निवडून आले आहेत. एका जागेवर भाजपचे आमदार संजय सावकारे
निवडून आले. धुळे - नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी झालेल्या
निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी पॅनलने १३ जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची आज मतमोजणी
होणार आहे.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयानं
अटकेपासून संरक्षण दिलं आहे. न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पीठानं काल हा निर्णय दिला.
परमबीर सिंग यांनी अटकेची भीती न बाळगता न्यायालयासमोर हजर व्हावं, आणि चौकशीच्या कामात
सहभागी व्हावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. परमबीर सिंग हे देशातच
आहेत, मात्र ते महाराष्ट्रात आल्यास मुंबई पोलिसांकडूनच त्यांना धोका पोहचू शकतो, त्यामुळे
ते न्यायालयासमोर येऊ शकत नसल्याचं परमबीर सिंग यांचे वकील पुनीत बाली यांनी न्यायालयाला
सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वानखेडे यांच्या
विरुध्द बोलण्यास रोखता येणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं आहे.
वानखेडे यांना खाजगी आयुष्याविषयी मूलभूत हक्क असला तरी मलिक यांना व्यक्त होण्यासाठी
घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असल्याचं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान,
मलिक यांनी कोणतही विधान करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी असं सांगत मलिक यांना दोन
आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला
आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, आता याबाबतचा अंतिम निर्णय
मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल जालना
इथं बातमीदारांशी बोलत होते. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग सुरू करण्याची
मागणी पालकांकडून होत होती, त्यानुसार पाचवी पासून पुढच्या वर्गाच्या शाळा सुरु झाल्यानं
मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे, आणि या वयोगटातली कोरोना रुग्णसंख्या १ हजार ७११
नं वाढल्याचं दिसत आहे. म्हणूनच मुलांचं लसीकरण तातडीने केलं पाहिजे असं टास्क फोर्सचं
मत असल्याचंही टोपे यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यात काल ६५६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३० हजार, ५३१ झाली आहे. काल आठ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
एक लाख ४० हजार ७४७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे.
काल ७६८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ७६ हजार ४५० रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे.
राज्यात सध्या ९ हजार ६८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर
दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी ७ नवे रुग्ण आढळले. लातूर
पाच, नांदेड -परभणी-उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी चार रुग्ण, तर जालना जिल्ह्यात
एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल एकही
नवा रुग्ण आढळला नाही.
****
मराठा आरक्षण घालवल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाची
माफी मागावी, आणि मराठा समाजाची दिशाभूल करणं थांबवावं, असं माजी मंत्री बबनराव लोणीकर
यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. तत्कालीन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचं श्रेय मिळेल, या भीतीपोटी महाविकास आघाडी सरकारने
मराठा समाजाचं आरक्षण घालवलं, अशी टीकाही लोणीकर यांनी केली. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी
नव्यानं प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मतही लोणीकर यांनी व्यक्त केलं.
****
नांदेड, मालेगांव आणि अमरावती इथल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ
भारतीय जनता पक्षानं काल अनेक ठिकाणी निदर्शनं केली. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि जालना
इथं जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे अंदोलन करण्यात आलं. या मागणीचे एक निवेदन शिष्टमंडळानं
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्यावतीनं आयोजित आझादी का अमृत महोत्सव
व्याख्यानमालेत, आज आपण, ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असहकार चळवळीचे पर्व’, या विषयावर, जळगाव जिल्ह्यातल्या पोचारा इथल्या श्री सेठ मुरलीधरजी
मानसिंगका कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी एन पाटील यांनी
दिलेलं व्याख्यान ऐकणार आहात.
असहकार चळवळीचं पर्व हे सत्याग्रहाच्या युगातील एक महत्वाचा
टप्पा म्हणून ओळखलं जातं. देशभर असहकार चळवळीला सर्व जाती धर्माच्या जनतेनं मोठा प्रतिसाद
दिला. या चळवळीतून पुढील काळात स्वराज्य प्राप्तीच्या कार्याला अधिक बळ मिळालं असल्याचं
पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले..
१९२०
च्या असहकार चळवळीनं भारतभर जागृती घडवून आणून किसान, कामगार, विद्यार्थी, तरुण, व्यापारी,
सैनिक, स्त्रीया यासर्व घटकांमध्ये स्वराज्यासाठी त्यागाची भावना निर्माण झाली.ब्रिटीशांच्या
दडपशाहीला न जुमानता बहिष्कार या साधनाच्या माध्यमाने भारतीय जनता आपला असंतोष व्यक्त
करु शकली. सरकारच्या अत्याचारी धोरणाविरुद्ध हडताळ पाळून ब्रिटीश राज्यकर्त्यांमध्येही
ह्रदय परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच असहकार चळवळीचं हे पर्व व्यापक
जागृतीच्या दृष्टीने महत्वाचं ठरलं.
आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून
या व्याख्यानाचं प्रसारण होईल. औरंगाबाद ए आय आर न्यूज - आकाशवाणी समाचार औरंगाबाद
या युट्यूब चॅनलवरही हे व्याख्यान श्रोत्यांना ऐकता येईल.
****
हवामान
येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र्, कोकण, गोवा आणि विदर्भात
काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे
वेधशाळेनं वर्तवली आहे.
***
No comments:
Post a Comment