Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 February
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१९ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं
ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
मुंबईत रेल्वे वाहतुकीच्या अत्याधुनिक
पायाभूत सुविधा निर्माण करण्याला सरकारचं प्राधान्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
ग्वाही
·
प्लास्टीक
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून अधिसूचना
जारी
·
राज्यात कोविड संसर्ग
झालेले नवे दोन हजार ६८ रुग्ण; मराठवाड्यात पाच रुग्णांचा मृत्यू तर नव्या १२४ बाधितांची नोंद
·
औरंगाबाद इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं शिवजयंतीच्या
पूर्वसंध्येला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
·
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट
प्रकरणी ३८ जणांना फाशी तर ११ जणांना आजन्म कारावास
·
आष्टी तालुक्यातल्या वक्फ बोर्ड इनामी जमीन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन नायब
तहसीलदार प्रदीप पांडुळे तसचं मंडळाधिकारी शिवशंकर सिंघनवाड यांना अटक
आणि
·
दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट
सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर आठ धावांनी विजय; मालिकेत विजयी आघाडी
****
स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबई शहराचं मोठं योगदान असून, मुंबईत रेल्वे वाहतुकीच्या
अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याची ग्वाही, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. काल मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा या दोन स्थानकांना
जोडणाऱ्या दोन अतिरिक्त मार्गिकांचं लोकार्पण, तसंच ३६ नव्या उपनगरी गाड्यांना, दूरदृष्य
संवाद यंत्रणेच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात
आला, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महारांजांना वंदन करून पंतप्रधानांनी आपल्या
भाषणाला प्रारंभ केला. रेल्वे सेवेच्या आधुनिकीकरणासोबतच मुंबई महानगर प्रदेशात रेल्वेचं
जाळं ४०० किलोमीटरने वाढवणार असून, मुंबईतल्या १९ स्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाईल,
असं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद -मुंबई द्रुतगती रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण व्हावा,
ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशात पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे विस्टाडोम कोच तयार
होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते.
वाहतुकीचे मार्ग म्हणजे विकासाच्या रक्तवाहिन्या असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी,
यापुढेही केंद्र सरकारचं सहाय्य असंच मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
****
पंतप्रधान पीक विमा योजनेत आतापर्यंत एक लाख सात हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी
वितरित करण्यात आला आहे. या योजनेला काल सहा वर्ष पूर्ण झाली, या पार्श्वभूमीवर केंद्रीय
कृषीमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. या वर्षी चालू महिन्यापर्यंत ३६ कोटी पेक्षा
अधिक शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांचा निधी अदा करण्यात आल्याची माहिती मंत्रालयानं दिली
आहे.
****
प्लास्टिक कचऱ्याची
विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्लास्टिक उत्पादकांची जबाबदारी निश्चित करणारी अधिसूचना, केंद्रीय वन आणि
पर्यावरण मंत्रालयानं जारी केली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत हे नवीन नियम लागू करण्यात
आले आहेत. एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं होतं, त्यानुसार ही पावलं उचलण्यात आली असल्याचं, केंद्रीय वन, पर्यावरण आणि
हवामानबदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं. प्लास्टिक कचरा
कमीतकमी व्हावा, त्याचं
पुनर्चक्रीकरण व्हावं, तसंच प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या दृष्टीनं या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, उत्पादकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था, दुकानदार, ग्राहक
यांच्याही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
*****
राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला
एकही रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या एकूण ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची संख्या चार हजार ४५६ झाली असून, त्यापैकी तीन हजार ५३१ रुग्ण बरे झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ६८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ५५ हजार ३६९
झाली आहे. काल १५ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ५४७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२
शतांश टक्के आहे. काल चार हजार
७०९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७६ लाख ८६ हजार ६७० रुग्ण कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८५
शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २१ हजार १५९ रुग्णांवर उपचार सुरू
आहेत.
****
मराठवाड्यात काल १२४ कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर लातूर जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा सामवेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३४ रुग्ण आढळले. उस्मानाबाद
२९, लातूर २४, नांदेड १९, बीड सहा, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी पाच, तर
जालना जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
कोणत्याही साथ-आजारांचा फैलाव रोखण्यासाठी साथरोगग्रस्त भागात जाऊन निदान करू शकणाऱ्या, ‘बीएसएल ३’ या
दक्षिण आशिया खंडातल्या पहिल्या प्रयोगशाळेचं, काल नाशिक इथं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
डॉ भारती पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. भारत हा औषधं आणि लस आयात करणारा देश राहिलेला
नसून, आता तो निर्यात करणारा देश झाला आहे, आत्मगौरवातून आत्मनिर्भरतेकडील हा प्रवास दूरदृष्टीच्या
नियोजनामुळंच शक्य झाल्याचं मत, डॉ.
भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी होत आहे. औरंगाबाद
शहरात क्रांती चौकात नूतनीकरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या
हस्ते तसंच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. या बाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत...
शिवछत्रपतींचं हे देशातलं सर्वाधिक उंचीचं शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातले
शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. चबुतरा आणि परिसराचं सौदर्यींकरण औरंगाबाद महानगरपालिकेनं पूर्ण केलं आहे.
****
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं यंदाची शिवजयंती वैचारिक शिवजयंती म्हणून साजरी
केली जात आहे. शिवजयंतीनिमित्तानं प्रसिद्ध विचारवंत दिवंगत गोविंद पानसरे लिखीत शिवाजी
कोण होता, हे पुस्तक वितरित केलं जाणार आहे. औरंगाबाद शहरात क्रांतीचौक इथं आज
सकाळपासून हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध असणार
आहे.
****
अहमदाबादमध्ये २००८ साली
झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद सत्र न्यायालयानं,
३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली
आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी दोषींच्या शिक्षेवरील
युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, हा
निकाल राखून ठेवला होता. २६ जुलै
२००८ ला अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते, यात ५६ लोकांचा मृत्यू झाला
होता, तर २०० जण जखमी झाले होते.
****
सक्तवसुली संचालनालय - ईडीने दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकर याला अटक केली आहे.
ईडीने मुंबईत नुकतेच काही ठिकाणी छापे घातले होते. त्यानंतर ईडीने इकबालच्या चौकशीसाठी
न्यायालयाकडे परवानगी मागितली होती, न्यायालयानं ती मान्य केली. ईडीने चौकशीदरम्यान
इकबाल याला अटक करून, त्याला विशेष न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयानं इकबालला
सात दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या
चिंचपूर इथल्या वक्फ बोर्ड इनामी जमीन
घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे तसचं मंडळाधिकारी शिवशंकर
सिंघनवाड यांना अटक करण्यात आली आहे. काल विशेष तपास पथकानं ही कारवाई केली. प्रदीप पांडुळे हे आष्टी तालुक्यात सुमारे आठ वर्षांपेक्षा
जास्त कालावधीत नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात यापूर्वीच तीन
आरोपींना अटक झाली आहे.
****
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. या
आधी संजय पांडे यांच्याकडे या पदाचा कार्यभार
होता. रजनीश सेठ १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी असून, आझाद मैदान दंगलीच्या
वेळी ते मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त होते. फोर्स वन
महाराष्ट्राचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं
आहे. यापूर्वी गृह
विभागाचे मुख्य सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.
****
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी
क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा आठ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत
भारतीय संघानं विराट कोहली आणि ऋषभ पंत या
दोघांच्या अर्धशतकाच्या बळावर वेस्ट इंडिजला १८७ धावांचं आव्हान दिलं. प्रत्यूत्तरादाखल
वेस्ट इंडिजचा संघ २० षटकात तीन बाद १७८ धावा करु शकला. भुवनेश्वर कुमारला
सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.या विजयाबरोबरच भारतानं तीन
सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतला शेवटचा सामना
उद्या कोलकाता इथं होणार आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मातीच्या ॲथलेटिक
ट्रॅकचं, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकमध्ये रुपांतर करण्यासाठी पाठपुरावा
करणार असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितलं आहे. काल
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात खेळाडूंसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
'खेलो इंडिया' योजनेअंतर्गत, प्रलंबित निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न
करणार असल्याचं, कराड यांनी सांगितलं. क्रिकेट, देशी क्रीडाप्रकार आणि ॲथलेटिक्स या
खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खासदार चषक स्पर्धा घेण्यात येणार असून, यासाठी समिती
स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात, गंगापूर इथल्या क्रीडा संकुलासाठी
केंद्राकडून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही, कराड यांनी सांगितलं.
****
दहावीच्या
परीक्षेचं ऑनलाईन प्रवेशपत्र मंडळाच्या संकेतस्थळावर कालपासून उपलब्ध करुन
देण्यात आलं आहे. यासंदर्भात काही तांत्रिक
अडचणी आल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन
माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना राज्य शिक्षण मंडळानं केलं आहे.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देताना विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारु नये,
प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा तसंच प्रवेशपत्रामध्ये
विषय अथवा माध्यम बदल असल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन दुरुस्त्या
करुन घ्याव्यात अशाही सूचनाही मंडळानं केल्या आहेत.
****
रस्ते विशेष दुरूस्ती कार्यक्रमाअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन रस्त्यांसाठी
राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. उस्मानाबाद-
कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर हा निधी मंजूर झाला आहे.
****
राज्यातल्या सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जालना जिल्ह्यातल्या
सेवली पोलीस ठाण्याला मिळाला आहे. त्याबद्दल सेवली ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस
निरीक्षक विलास मोरे यांचा पोलीस महासंचालकांकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
****
परभणी इथले ज्येष्ठ व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते धनराज जैन उर्फ
काकाजी यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते
८२ वर्षांचे होते. धनराज जैन हे प्रभात एज्युकेशन सोसायटी संचलित पी डी जैन होमिओपॅथी
महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष होते. जैन समाजातल्या विविध संस्था संघटनांशी ते संलग्न होते.
****
भारताचे आद्य क्रांतिगुरू गुरुवर्य लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल लहुजी सैनिक संघ आणि लहु प्रहार संघटनेच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्य कार्यक्रम सिडको परिसरातील आद्य क्रांतीगुरु गुरुवर्य लहुजी साळवे
यांच्या पुतळ्या जवळ घेण्यात आला, या
प्रसंगी लहू प्रहार चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment