Saturday, 19 February 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 February 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा..

****

** छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह; किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव साजरा

** विविध संस्था संघटनांच्या वतींनं सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन

** नांदेड जिल्हा विकासासाठी राज्य सरकारकडून ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

आणि

** श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी तसंच टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

****

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. आज सकाळी किल्ले शिवनेरीवर शिवजन्मसोहळा साजरा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत राज्यातल्या गड- किल्ल्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता विकास करण्यात येत असल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं. किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत. किल्ले रायगड संवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून तिथंही अनेक विकास कामं सुरू असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली आहे. अप्रितम शौर्य आणि युद्धकौशल्या द्वारे महाराजांनी राष्ट्रीय चेतना जागृत केली, शिवरायांनी स्थापन केलेला राष्ट्रवाद आजही अनुकरणीय असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादनपद ट्विट संदेशात,  महाराजांचं सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला असून, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

मुंबई इथं महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया तसंच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

नाशिक शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नाशिक शहरात छत्रपती सेनेच्या वतीनं मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिवाजी पुतळ्यासमोर वाघनखं आणि कट्यार याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली, हा विश्वविक्रम नोंदवला गेल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली.

किल्ले सिंधुदुर्गवर प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. किल्ल्यातील मावळ्यांच्या वारसांना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सात-बारा वाटप करण्यात आलं.

 

किल्ले प्रतापगडावर महिला आणि बालविकास मंत्री विधीज्ञ यशोमती ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाचा मसूदा अर्पण केला. राज्याचं चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं.

****

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. शिवाजी महाराजांचं युध्दकौशल्य, गुणग्राहकता, कामकाजातील समन्वय, शुद्ध हेतूने आणि आत्मीयतेने रयतेसाठी केलेले कार्य प्रत्येकाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी असल्याचं, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

महावितरणच्या परिमंडल कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, पोवाडा तसंच लष्करात सेवा बजावलेल्या सुरक्षारक्षकांचा सत्कार करण्यात आला.

****

परभणी शहरात शिवजयंतीनिमित्तानं रांगोळी कलावंतांनी आपल्या कलेतून शिवरायांना अभिवादन केलं. शहरासह जिल्हाभरात अनेक ठिकाणी अन्नदान करण्यात आलं. जिल्ह्यात मानवत इथं रक्तदान शिबीरही घेण्यात आलं.

परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द इथले दिव्यांग दाम्पत्य सुमेध इंगोले आणि प्रियंका इंगोले यांना आज शिवजयंतीदिनी उदरनिर्वाहाचं साधनं म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी स्वखर्चातून शिलाई मशीन भेट दिलं.

****

बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

नांदेड इथं जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

जालना शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा परिसरात महाराजांना अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी सकाळपासून हजेरी लावत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यातून रस्त्यांसह इतर विकास कामांची पूर्तता करण्यात येईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि वृक्षमित्र संस्थेच्या संयुक्त विद्यमानं 'माझं घर-हरित घर' या उपक्रमांच्या बक्षिस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शहरात जवळपास ११ ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी उद्यानांसाठी वापरलं जात आहे. तसंच शहरात रस्त्यांच सिमेंट कॉक्रीटीकरण, रस्ता दुभाजकासह संगमस्थळांची सुधारणा या कामांना सुरवात झाली असून ६५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच काम पूर्ण करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात २५ लाख ५ हजार ३०० अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर ५ कोटी ९२ लाख १६ हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक हक्क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यात अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांची संख्या नाशिक, जळगाव, नंदूरबार, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सात जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

****

२०२३ या वर्षात आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीची बैठक भारतात होणार आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी आज ही माहिती दिली. हा निर्णय ऐतिहासिक असून मागील काही वर्षात भारतीय खेळांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. या महत्त्वाच्या क्षणी आपण भारताच्या प्रतिनिधीमंडळाचा भाग असल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

****

भारत आणि वेस्ट इंडिज टी ट्वेंटी क्रिकेट तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना उद्या कोलकाता इथं खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

श्रीलंकेविरुद्ध आगामी दोन कसोटी तसंच तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली, कसोटी तसंच टी ट्वेंटी संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. कसोटी संघात प्रियांक पांचाल, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, कोणा श्रीकर भारत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

 

टी ट्वेंटी संघात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि अवेश खान यांचा समावेश आहे. विराट कोहलीला टी ट्वेंटी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 04 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...