Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व
श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक
लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक
आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर
अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी
राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
· राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत चर्चेला
प्रारंभ.
· नांदेड-पंढरपूर आणि लातूर- तिरुपती या दोन रेल्वेगाड्यांचे प्रस्ताव दक्षिण
मध्य रेल्वेकडे सादर; अहमदनगर ते आष्टी दरम्यान रेल्वे लवकरच धावणार.
· आमदार नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात शरण.
· राज्य शासनाचे वाङ्गमय पुरस्कार जाहीर; भारत सासणे यांना विंदा जीवनगौरव
पुरस्कार.
आणि
· औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आजपासून सर्वांसाठी खुली.
****
लाभात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमातून केंद्र सरकार निर्गुंतवणूक
करत असल्याबद्दल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते
आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर खरगे बोलत होते. राष्ट्रपतींच्या
अभिभाषणातून सरकारचं धोरण प्रतिबिंबित होत असतं, मात्र या अभिभाषणात त्याचा अभाव दिसल्याची
टीका खरगे यांनी केली. दरम्यान, भाजपच्या खासदार गीता उर्फ चंद्रप्रभा यांनी हा धन्यवाद
प्रस्ताव मांडला. तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव,
डीएमके पक्षाचे तिरुची शिवा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विकास रंजन भट्टाचार्य
यांनी या चर्चेत सहभाग घेतला. प्रस्तावावर चर्चा आज पूर्ण झाली नाही.
****
राज्यसभेत आज शून्य काळात सदस्यांनी रेल्वे परीक्षेचा मुद्दा उपस्थित
केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी या परीक्षेच्या निकालातल्या
कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची तसंच उमेदवारांच्या तक्रारींचा निराकरण करण्याची
मागणी केली.
****
नांदेड-पंढरपूर-नांदेड आणि तिरुपती-लातूर-तिरुपती या दोन रेल्वेगाड्या
सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेकडे सादर करण्यात आला आहे. लातूरचे खासदार
सुधाकर शृंगारे यांनी यासाठी मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव
आता दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आल्यानं या गाड्या लवकरच सुरू होण्याची शक्यता
वर्तवली जात आहे.
****
परळी बीड नगर रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक लवकरच सुरु होणार आहे. अहमदनगर
ते आष्टी दरम्यान बारा डब्यांची रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावर
गेल्या २० डिसेंबरला चाचणी घेण्यात आली होती.
****
आमदार नितेश राणे आज कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले. कणकवली इथले शिवसैनिक
संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी आमदार राणे यांचा नियमित जामीन अर्ज सिंधुदुर्ग
जिल्हा न्यायालयानं काल फेटाळून लावला. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दिलेलं
आव्हान मागे घेत, राणे आज कणकवली दिवाणी न्यायालयासमोर हजर झाले. न्यायालयानं त्यांना
पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
राष्ट्रगीताच्या अपमान प्रकरणी मुंबईतील शिवडी न्यायालयाने पश्चिम बंगालच्या
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समन्स बजावला आहे. ममता यांना येत्या २ मार्च रोजी
हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, मुंबईतील एका कार्यक्रमात बॅनर्जी
यांनी खाली बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. तसंच राष्ट्रगीत सुरू असताना त्या मध्येच
थांबल्या. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान होतो, असा युक्तीवाद करत भारतीय जनता पक्षाचे
मुंबईतील सचिव विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जीविरोधात तक्रार दाखल केली होती.
****
राज्य शासनाच्या वाङ्गमय पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यावर्षीचा
‘विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भारत सासणे यांना जाहीर करण्यात
आला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ मुंबईच्या लोकवाङ्गमय गृह या संस्थेला जाहीर
करण्यात आला. तीन लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे.
‘डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार’ रमेश वरखेडे तसंच पुण्याच्या
मराठी अभ्यास परिषदेला, तर ‘कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार’
डॉ.चंद्रकांत पाटील तसंच मुंबईच्या मराठी भाषा अभ्यास केंद्राला जाहीर करण्यात आला
आहे. दोन लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यशवंतराव
चव्हाण राज्य वाङ्गमय पुरस्कारांचीही घोषणाही करण्यात आली आहे.
****
धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगर परिषदनं माझी वसुंधरा अभियानांतर्गत
शहरात साडेसहा हजार एलईडी पथदिवे बसवले आहेत. हे पथदिवे सुरु बंद करण्यासाठी एकूण २४
ठिकाणी टाईमर बसवण्यात आले आहेत त्यामुळे विजेची मोठी बचत होत आहे.
****
कोविड प्रादुर्भावामुळे बंद असलेली औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
आजपासून सुरु झाली आहेत. कोविड लसीकरण प्रमाणपत्र तपासून आणि कोविड प्रतिबंधक नियमांचं
पालन करत पर्यटकांना प्रवेश देण्यात आला.
****
हिंगोली इथं शहरातील बाजारपेठेसह अनेक भागातील अतिक्रमण आज काढण्यात आलं.
नगरपरिषदेच्या वतीनं दोन दिवसांपासून सर्व अतिक्रमणधारकांना आपलं अतिक्रमण उचलून घेण्याचं
आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी नगर परिषद मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात भाजी मंडी परिसर, अंबिका टॉकीज रोड, फुल मंडी परिसर
या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.
****
हिंगोली इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज एचडीएफसी
एर्गो पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची नासधुस केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची
रक्कम अद्यापही मिळालेली नाही, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याची
विचारणा केली असता काहीच उत्तर न मिळाल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयाची
नासधूस केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
१९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया
यांच्यात उपांत्य फेरीसाठी सामना होणार आहे. अंन्टिग्वा इथं कुलीज्ड क्रिकेट मैदानावर
हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे.
****
एकदिवसीय महिला क्रिकेट फलंदाजीच्या क्रमवारीत मिताली राज ७३८ गुणांसह
दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सी नं महिला क्रिकेट
विश्वचषक २०२२ पूर्वी ही क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. ऑस्ट्रेलिया ची एलिसा हेली ७५०
गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताची स्मृती मंधाना ही ७१० गुणांसह या क्रमवारीत
सहाव्या स्थानावर आहे.
****
राज्यात थंडीची लाट कायम आहे. दरम्यान, राज्यात उद्या काही ठिकाणी ढगाळ
वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment