Friday, 18 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.

****

२००८ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद सत्र न्यायालयानं ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. २६ जुलै २००८ ला अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते, यात ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण जखमी झाले होते.

****

ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान नव्यानं टाकलेल्या दोन रेल्वे मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान दोन उपनगरी रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. तसंच जनतेला संबोधितही करणार आहेत. ६२० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या नव्या मार्गिकांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी गाड्यांना वेगवेगळ्या मार्गिका उपलब्ध होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

****

औरंगाबाद शहरात क्रांती चौकातल्या नूतनीकरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, आज रात्री दहा ते बारा या वेळेत करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. शिवछत्रपतींचं हे देशातलं सर्वाधिक उंचीचं शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातले शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतरा आणि परिसराचं सौदर्यींकरण औरंगाबाद महानगरपालिकेनं पूर्ण केलं आहे.

दरम्यान, क्रांती चौक परिसरात रात्री १२ वाजेनंतर कोणताही कार्यक्रम होणार नाही, अशी सूचना, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३७ लाख ८६ हजार ८०६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १७४ कोटी ६४ लाख ९९ हजार ४६१ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी ८४ लाख ९० हजार १५२ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

दरम्यान, देशात काल नव्या २५ हजार ९२० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ४९२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६६ हजार २५४ रुग्ण बरे झाले. देशात सध्या दोन लाख ९२ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८६ वा भाग असेल.

****

एन ई ई टी एम डी एस अर्थात दंत शल्य चिकित्सा पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा चार ते सहा आठवडे पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. येत्या सहा मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. डॉक्टरांची संघटना आणि ही परीक्षा देऊ ईच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. एमडीएस प्रवेशासाठी आवश्यक असलेली आंतरवासिता यावर्षी ३१ मार्च ऐवजी ३१ जुलैला संपेल असंही मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रं, आजपासून शाळांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यासह ही प्रवेशपत्रं विद्यार्थ्यांना वितरीत करता येतील असं मंडळानं कळवलं आहे. 

****

परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना खतपुरवठा शासनाच्या वतीनं करण्यात यावा, तसंच कृत्रिम खत टंचाई भासू देऊ नये, अशी सूचना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी कृषी अधिकाऱ्याना केली आहे. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांच्या नावाने येणाऱ्या खताचं त्यांच्या मागणीनुसार वितरण करण्यात यावं, या कामी दिरंगाई सहन केली जाणार नाही, असं ते म्हणाले.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्ड आणि कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी परभणी इथं काल नाबार्ड च्या वतीनं बँकर्सची कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. जिल्ह्यातले काही सुशिक्षित तरूण कृषि क्षेत्राकडे वळत असून, शेतीविषयक नवीन प्रयोग करत आहेत, ही सकारात्मक बाब असल्याचं, त्या यावेळी म्हणाल्या. 

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कोलकाता इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...