Saturday, 23 April 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.04.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 April 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      साहित्य रसिकांच्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही - ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनपर भाषणात खासदार शरद पवार यांचं प्रतिपादन तर मानवी मूल्यांशी निष्ठा राखणारं लेखन व्हावं-संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचं आवाहन

·      महावितरणला दोन हजार मेगावॅटहून अधिक वीज उपलब्ध; भारनियमानातून काही अंशी दिलासा

·      एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपली; आतापर्यंत ७५ हजार कामगार कामावर हजर

·      शालेय शिक्षणात शेती या विषयाचा समावेश करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचा विचार

·      राज्यात इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी घेतली जाणार

·      औरंगाबाद तीन दिवसीय शेक्सपिअर महोत्सवाला कालपासून प्रारंभ

आणि

·      उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर ग्रामपंचायतीची घरपोहोच शुद्ध पेयजल वाहिका

****

सविस्तर बातम्या

लोकाश्रय आणि राजाश्रय ही साहित्यरथाची दोन चाकं आहेत, साहित्य रसिकांच्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही, असं प्रतिपादन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्‌घाटन केल्यानंतर बोलत होते. ग्रंथ प्रकाशन संस्थांची खालावलेली आर्थिक परिस्थिती निराशाजनक असून, ती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनात नव्याने प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाची उणीव प्रकर्षाने जाणवल्याचं, पवार म्हणाले. साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचं आणि स्नेहभावाचं नातं असावं, साहित्यिकांचा राजकर्त्यांवर अंकुश हवा, पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कण्ट्रोल असू नये, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.

नव्या साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा जाणवत असून, संशोधनात्मक लेखन वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली. सबळ पुराव्याशिवाय केलेलं ऐतिहासिक लेखन वेळीच रोखण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर आजकाल काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून, साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं, असंही पवार यांनी नमूद केलं.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव संमेलननगरीस दिलं याबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले. लतादीदींनी साहित्यातील गीत आणि काव्य प्रकाराला साज चढवला आणि कोट्यवधी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. साहित्यविश्वाने ह्याच ऋणानुबंधातून लतादीदींना दिलेली ही एक सार्थ आदरांजली असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. साहित्य महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.

संमेलनाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

साहित्यिकांनी मानवी मूल्यांशी निष्ठा राखणारं लेखन मोठ्या प्रमाणात करायला हवं, असं आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ सासणे यांनी केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सासणे यांनी, अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असताना, मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे, बालसाहित्यातून अद्‌भुतरस हद्दपार केला आहे, याकडे लक्ष वेधलं.

मराठी भाषा बोलणारे देशात दुसऱ्या आणि जगात १०व्या क्रमांकावर असल्याचं सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. तसंच साहित्य संमेलन इतर राज्यात व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उपयोग कोणाची निंदा नालस्ती करण्यासाठी होऊ नये असं मत संमेलनाचे प्रमुख पाहुणे दामोदर मावजो यांनी व्यक्त केलं. पुढील साहित्य संमेलन गोव्यात भरवावं, कोकणी माणूस त्याला प्रतिसाद देईल असं ते म्हणाले.

९६ वावं साहित्य संमेलन होण्यापूर्वी केंद्राने मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी अमित देशमुख यांनी यावेळी केली.

दरम्यान, ग्रंथदिंडीने या संमेलनाला प्रारंभ झाला. उदगीर शहर आणि तालुक्यातल्या विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी विविध पोशाखात या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं तयार केलेल्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तीन किलोमीटर अंतराच्या या ग्रंथदिंडीत महिलांची दुचाकी फेरी तसंच विविध पोशाखातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या ग्रंथदिंडीवर प्रत्येक चौकात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.

काल या संमेलनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: काय कमावले काय गमावले, मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण: किती खरे किती खोटे, मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्रीवादात अडकले आहे का, मराठी, कन्नड, तेलुगू, आणि उर्दू यांचा भाषिक आणि सांस्कृतिक अनुबंध, लेखक आणि लोकशाही मूल्ये, या विषयांवर परिसंवाद, निमंत्रितांचं कविसंमेलन तसंच लोकनृत्याचं सादरीकरण झालं. आज सकाळच्या सत्रात लेखक राजन गवस यांची मुलाखत, मान्यवर लेखकांचा सत्कार, दुपारच्या सत्रात कादंबरीकारांशी संवाद, कथाकथन, यासह सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

****

वीज महावितरण कंपनीला दोन हजार मेगावॅटहून अधिक वीज उपलब्ध झाल्यानं, राज्यातल्या नागरिकांना वीज भारनियमानातून काही अंशी दिलासा मिळाला आहे. यापैकी तेराशे ११ मेगावॅट वीज अदानी पॉवरकडून, तर ७०० मेगावॅट वीज महानिर्मितीकडून मिळणार असल्याची माहिती, महावितरणनं दिली आहे. अतिरीक्त वीज मिळाल्यामुळे भारनियमन कमी होणार असलं, तरीही नागरिकांनी काटकसरीनं वीज वापरावी, असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, भारनियमन बंद करण्याबरोबरच सुरळीत वीजपुरवठा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात माध्यमांशी बोलत होते. छत्तीसगड राज्यातली एक कोळसा खाण विकत घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****


राज्यात भारनियमन सुरु असतांना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडणार असल्याचा इशारा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. सामान्य ग्राहकाचं वीजबिल थकल्यानंतर, वीज कापणाऱ्या सरकारच्या अनेक खात्यांकडेच वीजबिलाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं उघड झालं आहे. राज्य महसूल विभागाने तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन, वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेली मुदत काल संपली. आतापर्यंत ७५ हजार कामगार कामावर रुजू झाले असल्याची माहिती, महामंडळानं दिली आहे. बडतर्फ कामगारांना कामावर हजर होण्यासाठी न्यायालयानं दिलेली चार आठवड्यांची मुदत येत्या २७ एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे २८ तारखेपासून सर्व कामगार कामावर हजर होतील, असा विश्वास एसटीचे जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी व्यक्त केला आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं केलेल्या कारवाई विरोधात हस्तक्षेप करण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. कुख्यात गूंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपावरून ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला अटक केली. सध्या ते आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने मलिक यांच्या विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. या सर्व कारवाई विरोधात आणि अंतरिम जामीनासाठी मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं हस्तक्षेप करण्याचं नाकारत, सर्वोच्च न्यायालयानं मलिक यांचा अर्ज फेटाळून लावला.

****

दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचं आरोपपत्र दाखल केल्यावरही, त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशी टीका, भारतीय जनता पक्षानं केली आहे. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत, मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून मलिक यांनी नवा विक्रम केला असल्याची टीका त्यांनी केली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १२१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७६ हजार ५०३ झाली आहे. या संसर्गानं काल कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ८३१ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ६६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २७ हजार ८५५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बीड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****


शालेय शिक्षणात शेती या विषयाचा समावेश करण्याच्या दृष्टीनं विचार सुरू असल्याचं कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २४ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृहं निर्माण करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कृषी क्षेत्रातल्या युवा शास्त्रज्ञांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यंदाच्या वर्षांपासून शासन महिला शेतकऱ्यांचा देखील सन्मान करणार असल्याचं, ते म्हणाले.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी दीक्षांत समारंभाला, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. दीक्षांत समारंभात चार हजार २३२ स्नातकांना पदव्या, पदव्युत्तर पदव्या तसंच पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आल्या. तसंच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं आणि रोख पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं.

****

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. या पार्श्वभूमीवर यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेनं आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र टीईटी परीक्षा घोटाळ्यात विनर कंपनीचं नाव आल्यामुळे शासनानं या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परंतू, विनर कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाने विनर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. परिणामी आता विनरच्या सहकार्याने येत्या २० जुलैला शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे.

****


साध्या सोप्या इंग्रजी भाषेत नाट्यलेखन केल्यामुळेच शेक्सपिअर आजही जगभरात जिवंत असल्याचं मत, प्राध्यापक डॉ. मुस्तजीब खान यांनी व्यक्त केलं आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं, औरंगाबाद इथं आयोजित शेक्सपिअर महोत्सवाचं, काल डॉ. खान यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेक्सपिअरनं इंग्रजी भाषेत सतराशे नवीन शब्द देवून भाषा समृद्ध केली. शेक्सपिअरनं त्याच्या विनोदी नाटकांमध्ये सर्वप्रथम महिलांना प्रमुख भूमिका दिल्याचं, डॉ.मुस्तजीब खान यांनी सांगितलं. या महोत्सवात काल नितीन गरुड यांनी दिग्दर्शित केलेल्या ॲनेक्स या नाटकाचा प्रयोग झाला.

आज या महोत्सवात दीपा मंडलिक यांच्या ‘पराक्रमी हिंदू राज्यांची अद्वितीय मंदिरं, या पुस्तकावर, डॉ प्रभाकर देव यांचं व्याख्यान होणार असून, ‘ती’ला समजून घेताना, हा स्त्री व्यक्तिरेखांचा मागोवा घेणारा प्रयोग सादर होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात सहा आर ओ अर्थात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले असून, दोन प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र काही अडचणींमुळे अनेक नागरिकांना आरओ प्लॅन्ट पर्यंत जाऊन पाणी घेऊन येणं शक्य होत नाही, हे लक्षात घेत, तेर ग्रामपंचायतीनं शुद्ध जल वाहिका उपलब्ध करून दिली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं. ही जलवाहिका घरपोहोच पाणी पुरवठा करेल. अवघ्या दहा रुपयांत १५ लीटर पाणी देणाऱ्या या उपक्रमाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर,

Byte…

काही अडचणींमुळे अनेक नागरिकांना आरओ प्लॅन्ट पर्यंत जाऊन पाणी घेऊन येणे शक्य होत नाही, तसेच आरओ प्लॅन्ट नसलेल्या भागातील नागरिकांना यापासून वंचित राहावं लागतं. अशा नागरिकांना देखील शुद्ध पिण्याचे पाणी कमीत कमी दरात उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक घरासमोर शुद्ध जल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल आहे. अवघ्या १० रुपयात १५ लिटर शुद्ध “आरओ” पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शुध्दजल वितरण व्हॅनला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. "आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर उस्मानाबाद" अभियाना अंतर्गत येणाऱ्या या शुध्द जल व्हॅन उपक्रमामुळे अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद

 

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय मोफत आरोग्य मेळावा घेण्यात आला. साडे तीनशेवर रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं झालेल्या आरोग्य मेळाव्यात ६०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १६० डिजिटल हेल्थ आयडी तयार करण्यात आले, तर आयुष्मान भारत योजनेचे ५० कार्ड वितरित करण्यात आले.

****

परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या तीन लाख तीन हजार लाभार्थ्यांपैकी, दोन लाख ८० हजार शेतकऱ्यांना, किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले असून, २३ हजार नोंदणीकृत लाभार्थ्यांना अर्ज भरल्यानंतर किसान क्रेडिट कार्डचं वाटप करण्यात येईल. यासाठी २४ एप्रिलला जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...