Thursday, 2 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.06.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ जून २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख चाळीस हजार कोटींच्या पुढे राहिलं आहे. मे महिन्यात एक लाख ४० हजार ८८५ कोटी रुपये इतकं जीएसटीचं संकलन झालं. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात ९७ हजार ८२१ कोटी रुपये जीएसटीचं संकलन झालं होतं. त्या तुलनेत यंदाचं जीएसटी संकलन ४४ टक्क्यांनी जास्त असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा म्हणजे नीट-पीजीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ - एन बी ई एम एस नं केवळ दहा दिवसांच्या विक्रमी कालावधीत हा निकाल जाहीर केला. विद्यार्थी एन ए टी बोर्ड डॉट ई डी यू डॉट इन या संकेतस्थळावर आपला निकाल बघू शकतात. गेल्या महिन्यात २१ तारखेला ही परीक्षा झाली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी एका ट्वीटद्वारे परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

जम्मू-काश्मीरमधल्या शोपिंयामध्ये एका खासगी वाहनात आज सकाळी स्फोट होऊन तीन जवान जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, स्फोटाबाबत तपास सुरू आहे.

****

दिवंगत गायक के.के. यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. कोलकत्यात मंगळवारी रात्री त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव काल मुंबईत आणण्यात आलं. कोलकत्यात गाण्याचा एक कार्यक्रम झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं केके यांचं निधन झालं, ते ५३ वर्षांचे होते.

****

विविध प्रलंबित मागण्यांसाठी आठवडाभर बेमुदत आंदोलन करणाऱ्या राज्यातल्या परिचारिकांच्या मागण्यांबाबत १५ जुलैपर्यंत अभ्यास करून अंमलबजावणी केली जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर परिचारिकांनी काल बेमुदत आंदोलन मागे घेतलं. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने ही माहिती दिली.

****

जकार्ता इथं सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानचा एक - शून्य असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. भारताचा कर्णधार बिरेंद्र लाक्रा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

हरियाणात होणाऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ काल पुण्यातून रवाना झाला. बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात या संघानं सराव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...