आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ जून २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी आज महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
आणि काँग्रेसचे महाराष्ट्र निरिक्षक कमलनाथ यांच्यासोबत आज दुपारी ही बैठक होणार आहे.
****
दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत आसामची राजधानी
गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० समर्थक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला
आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. त्यांना आज सकाळी
मुंबईत गिरगाव इथल्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं राजभवनातल्या
अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी काल आपापले उमेदवार
जाहीर केले. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं झारखंडच्या माजी राज्यपाल
द्रौपदी मुर्मू, तर विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची
घोषणा केली आहे.
****
अग्निपथ मोहिमेअंतर्गत अग्निवीरांची होणारी निवड निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं
केली जाईल, अशी माहिती लष्करी व्यवहार विभागाचे सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी
दिली. भारतीय वायू सेनेतली भरती प्रक्रिया या महिन्याच्या २४ तारखेपासून सुरू होईल.
तसंच लष्कर आणि नौसेनेसाठीची भरती पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून सुरू होईल, असं
त्यांनी सांगितलं.
****
अग्नीवीर हे संपूर्ण संरक्षण दलाला पर्यायी होऊ शकत नाही, असं राष्ट्रीय सुरक्षा
सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. ज्या अग्नीवीरांना संरक्षण दलात सामावून घेतलं
जाईल त्यांना त्यांनंतर कठोर प्रशिक्षण आणि दीर्घकालीन अनुभव मिळवावा लागेल, असं त्यांनी
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
****
जगतगुरू तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज पुण्यात
दाखल होणार आहे. पुणे महापालिकेनं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाची
जय्यत तयारी केली असून, पालखी मार्गावर स्वच्छतेसोबतच, पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा
उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment