Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 08 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून आज दोन्ही सदनांच्या कामकाजाला
सुरुवात झाली. एम व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपती पदाची
कारकीर्द आता संपत असून, त्यांच्या निरोपादाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज राज्यसभेत भाषण केलं. नायडू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विद्यापीठं आणि शैक्षणिक
संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये प्राधान्यानं उपस्थित राहून सतत युवा वर्गाला नवी उर्जा
देण्याचा प्रयत्न केला, सदनातही युवा सदस्यांना प्रोत्साहन देत त्यांना नवनवीन कामं
करण्यास उद्युक्त केलं, असं पंतप्रधान म्हणाले. आपण नायडू यांच्या विविध भुमिका बघितल्या,
त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांचा नाविन्याचा ध्यास घेतला, सभापती
म्हणून जीव ओतून काम करताना त्यांची प्रतिष्ठा आणि निष्ठा बघितली, त्यांच्या अनुभवांचा
लाभ देशाला यापुढेही मिळत राहील, असंही पंतप्रधान म्हणाले.
लोकसभेत
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारतानं मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा
प्रस्ताव मांडला. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नियोजन
राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग, शशी थरुर आदींनी कामकाजात सहभाग घेतला.
****
राष्ट्रीय
चाचणी संस्था - एनटीएनं यावर्षी घेतलेल्या जेईई मुख्य सत्र दोनच्या परीक्षेचा निकाल
जाहीर झाला आहे. या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळवले असून, यात राज्यातल्या
श्रेणिक मोहन साकला याचा समावेश आहे. जेईई मुख्य सत्र दोनच्या परीक्षेचा निकाल जेईई
मेन डॉट एन टी ए डॅट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०६ कोटी मात्रांचा
टप्पा पार केला आहे. काल ३४ लाख ७५
हजार ३३० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०६ कोटी ५६ लाख ५४ हजार ७४१ मात्रा देण्यात
आल्या आहेत. दरम्यान, देशात काल नव्या १६
हजार १६७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली,
४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १५
हजार ५४९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ३५ हजार ५१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
शिक्षक
पात्रता परीक्षा - टीईटी घोटाळ्याप्रकरणी
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे आमदार
अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रं रद्द
करण्यात आली आहेत. परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या
उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात हजार ८७४ विद्यार्थ्यांची नावं आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. या
यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुलींचा समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रेल्वे प्रवाशांना प्रवासात कोणत्याही क्षणी वैद्यकीय मदतीची गरज लागू शकते, त्यामुळे नाशिक रोड सह सात रेल्वे स्थानकांवर रुग्णालय आणि बाह्य रुग्ण विभाग सुरू
करण्यात येणार आहे. नाशिक रोड इथल्या रेल्वेच्या
अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सध्या रेल्वे स्थानकावर केवळ रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी
रुग्णालय असून, तेही प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. इंडिया वन
प्रोजेक्ट अंतर्गत खादी आणि अन्य देशी अन्न उत्पादनांची दुकानंही सुरू झाली असून, आता कोच रेस्टॉरंट आणि कॅप्सूल
हॉटेल देखील उपलब्ध होणार असल्याचं, संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
राज्यात
अनेक भागात आज जोरदार पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा
पुरपरीस्थिती उद्भवली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी
पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातल्या राधानगरी
धरणात २०३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून, धरणातून सोळाशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग
सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या दुगारवाडीच्या धबधब्याजवळ काल रात्री अडकलेल्या २२ पर्यटकांची सुखरूप
सुटका करण्यात आली. मात्र, एक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त
केली जात असून, त्याचा शोध सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांमध्ये
पाणी शिरलं आहे. जिल्ह्यातले एकबुर्जी आणि सोनल प्रकल्प पूर्ण भरले असल्यानं वाशिम शहराच्या पिण्याच्या पाण्याची
चिंता मिटली आहे. मालेगाव तालुक्यातल्या पांगरी ते अमानी या
मुख्य रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं पाच गावांचा संपर्क तुटला आहे.
****
बर्मिंगहॅम
इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. बॅडमिंटन, हॉकी
आणि टेबल टेनिसमध्ये अंतिम फेरीत भारताचे खेळाडू आज खेळणार आहेत. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदकांसह एकूण ५५ पदकं जिंकली आहेत.
//**********//
No comments:
Post a Comment