Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 12
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
बाळासाहेब
ठाकरे समृद्धी महामार्गालगत हाय स्पीड बुलेट ट्रेनबाबत चर्चेला सुरवात; मुंबई-नागपूर
प्रवास तीन तासात-रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं सूतोवाच.
·
पोलिस तपास कार्यात
उत्कृष्टतेसाठीची गृहमंत्री पदकं जाहीर; राज्यातले ११ पोलिस तर सीबीआयच्या १५ अधिकाऱ्यांचा
समावेश.
·
राज्यात ६०८
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान.
आणि
· स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा
सह विविध उपक्रमांना प्रारंभ.
****
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या लगत हाय स्पीड बुलेट ट्रेन
प्रकल्पाबाबत चर्चा सुरू झाली असून, माध्यमातून मुंबई ते नागपूर तीन तासात प्रवास करतात
येणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं
पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत
चर्चा झाली असून पुढील महिन्यात - मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन संदर्भात दिल्लीत बैठक
होणार आहे अशी माहिती दानवे यांनी दिली.
दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य
दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानांतर्गत रेल्वे मंत्रालय आणि सांस्कृतिक
मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यात भगूर इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
जन्मस्थानी असलेल्या सावरकर स्मारकात दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर
सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दानवे तसंच उपस्थितांनी सावरकरांना अभिवादन
केलं. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसांचा दानवे यांच्या हस्ते यावेळी
सत्कार करण्यात आला.
****
पोलिसांना तपास कार्यात उत्कृष्टतेसाठी दिली जाणारी केंद्रीय
गृहमंत्री पदकं जाहीर झाली आहेत. राज्यातल्या ११ पोलिसांचा यामध्ये समावेश आहे. केंद्रीय
गृह मंत्रालयानं आज याबाबतचं पत्रक जारी केलं, त्यात दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातले
पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलिस निरीक्षक प्रमोद तोडरमल, दिलीप पवार, दीपशिखा
वारे, सुरेशकुमार राऊत, जितेंद्र वानकोटी, समीर अहिरराव, सहायक पोलिस निरीक्षक मनोज
पवार, राणी काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर आणि अजित पाटील यांचा हे पदक
विजेत्यांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या १५ अधिकाऱ्यांना
देखील तपासात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं जाहीर झालं आहे.
****
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष पदी
नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बावनकुळे यांची
प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई महानगर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भातलं नियुक्तीपत्र जारी केलं आहे.
****
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी
१५ ऑगस्टपासून राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत
स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. विभागाच्या प्रधान सचिव मनिषा
वर्मा यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यातील ६ विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता,
नाविन्यता, युनिकॉर्न याविषयी मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृती केली
जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण तसंच त्यांच्या संकल्पनांचे
सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना १०
हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यतची पारितोषिकेही दिली जाणार असल्याचं वर्मा यांनी
सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जीवन गाणे गातच जावे‘ हा कार्यक्रम घेण्यात आला.
सर्व कारागृहांमधे सांस्कृतिक, प्रबोधनात्मक आणि समुपदेशनात्मक कार्यक्रमांचं आयोजन
करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयानं एक विक्रम केला आहे. व्यावसायिक कलाकारांसोबतच,
कारागृहातल्या कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केलं. गेल्या महिन्या भरापासून
नियोजन सुरू असलेल्या या कार्यक्रमात एक हजारापेक्षा जास्त कलाकारांनी भाग घेतला. या
कार्यक्रमामुळे नवी दिशा मिळाली असून, भावी आयुष्यात त्याचा चांगला उपयोग होईल अशी
आशाही अनेक कैद्यांनी व्यक्त केली.
****
राज्यात पावसाचं प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतल्या
६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८
सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू
झाली. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. या सर्व
ठिकाणी १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, असं त्यांनी सांगितलं.
यामध्ये मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या २४, किनवट ४७, अर्धापूर ०१, मुदखेड ०३, नायगाव ०४, लोहा ०५,
कंधार ०४, मुखेड ०५, देगलूर ०१, हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ०६. परभणी जिल्ह्यात
जिंतूर ०१ तर पालम तालुक्यातल्या चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
****
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०७
कोटी ४७ लाख मांत्रांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत ३ कोटी ९६ लाखांहून अधिक किशोरवयीनांना
लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. कोविडमुक्तिचा
दर ९८ पूर्णांक ५३ शतांश टक्के इतका आहे. काल दिवसभरात, देशात नव्या १६ हजार ५६१ कोविड
ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
****
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत नांदेड
इथं कृषी पायाभूत सुविधा निधी योजना कृषी संगम कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन
करण्यात आलं.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी,
यासाठी कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेकडून आयोजित कृषी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाला. कार्यशाळेत नाबार्ड, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, पोकरा योजना,
बँके विषयी माहिती देण्यात आली.
****
रान भाज्यांमध्ये किटकनाशकांचा अंश हा शून्य असतो. त्या आरोग्यासाठी
लाभदायक असतात. त्यामुळे रानभाज्यांविषयी आवड निर्माण होणे गरजेचं असल्याचं मत औरंगाबाद
विभागीय कृषि सह संचालक दिनकर जाधव यांनी व्यक्त केलं आहे. राज्य शासनाचा कृषि विभाग,
आत्मा आणि कृषि विज्ञान केंद्र औरंगाबादच्या वतीनं आज तिसऱ्या रान भाजी महोत्सवाचं
उद्धाटन दिनकर जाधव यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद महानगरपालिका झोन क्रमांक ३ कार्यालयाच्या माध्यमातून
तिरंगा ध्वज वितरण केंद्राचे आयोजन करून लोकांना ध्वज वाटप करण्यात आले. तिरंगा ध्वजासाठी
लोकांनी उत्सुकतेने गर्दी रोशन गेट या ठिकाणी केली. दरम्यान, हर घर तिरंगा उपक्रमात
औरंगाबाद विभागासाठी सहा लाख दोन हजार राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचं,
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’
अंतर्गत परभणी इथं ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’
या सांस्कृतिक समारोहाचं आमदार डॉ.रत्नाकर
गुट्टे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधिक्षक जयंत मिना, औरंगाबाद येथील राज्य
राखीव दलाचे समादेशक निमित गोयल यावेळी उपस्थित होते.
अमृत महोत्सवानिमित्त नांदेड तालुक्यातील
विष्णुपुरी इथं आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात गावकऱ्यांनी मोठा सहभाग
नोंदवला.
****
हिंगोली शहरात आज महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने
तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते
या प्रभात फेरीचं उद्घाटन झालं. हर घर तिरंगा मोहीम राबवत असताना
प्रत्येकाने कोविड-19 बूस्टर डोस घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नगरपालिका, तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज उपलब्ध असून, सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयांनी ध्वजसंहितेचं पालन करत १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करावं, असं
त्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्टला उस्मानाबाद
इथं भव्य शोभा यात्रेचं आयोजन करण्यात
आलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी खेळ आदी कार्यक्रम
या यात्रेदरम्यान घेण्यात येणार आहेत. या यात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे
****
No comments:
Post a Comment