Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 16
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत प्रारंभ.
·
विश्वासघाताने स्थापन
झालेलं सरकार विधीमान्य नसल्याचं सांगत विरोधकांचा चहापानावर
बहिष्कार.
·
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी
वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सर्वत्र अभिवादन.
आणि
·
स्वराज्य महोत्सवात उद्या समूह
राष्ट्रगीत गायन; सर्व नागरिकांना सहभागी होण्याचं सरकारचं आवाहन.
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून
मुंबईत सुरू होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनकाळात १९,२०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक
सुट्या आहेत. तर २४ ऑगस्टला विधिमंडळ
कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सरकारनं
सर्वपक्षीय सदस्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
****
दरम्यान, विश्वासघाताच्या
पायावर स्थापन झालेलं सरकार विधीमान्य नसल्याचं सांगत विरोधी पक्षांनी सरकारच्या
चहापानावर बहिष्कार टाकला आहे. याबाबतचं पत्र विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर विधानसभेचे
विरोधीपक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
संयुक्त पत्रकार परिषद घेत, विरोधी पक्षांची भूमिका मांडली. अंबादास दानवे यांनी
कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकारची भूमिका बेपर्वाईची असल्याचं सांगत, टीईटी
घोटाळ्यात नातेवाईकांना नोकरी देणाऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल
सरकारवर टीका केली. ते म्हणाले....
जी घटना भंडारा आणि गोंदियामध्ये घडलेली
आहे. त्याला जोडूनच महाराष्ट्रात या काळात अनेक घटना घडलेल्या या चाळीस पन्नास दिवसात
आणि याच्याविषयी सरकारची भूमीका बेपर्वाईची आहे. सगळ्यात महत्वाचं टीईटी सारखा गैरप्रकार
करुन स्वत:च्या नातेवाईकांना नोकरी देण्याचा प्रकार घडलेला असताना अशा प्रतिनिधींना
मंत्रिमंडळात स्थान देणे हा सुद्धा प्रकार या सगळ्या याच्यात घडलेला आहे. बुलेट ट्रेनसाठी
इमिजिएट निधी या सरकारने दिलेला आहे. परंतू शेतकऱ्यांसाठी निधी मिळत नाही. या अधिवेशनात
हे विषय सुद्धा आम्ही सगळे मिळून घेणार आहोत.
अजित पवार यांनी आमदारांच्या
आक्षेपार्ह वर्तनाचा मुद्दा उपस्थित करत, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
राज्यात पूरस्थितीमुळे झालेलं नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेली जीवीत हानी, तसंच अन्य
घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने चहापान टाळून फक्त चर्चा करणं संयुक्तिक ठरलं
असतं, असं सांगत, सरकारनं किमान संवेदनशीलता दाखवायला हवी होती, असं
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्तांना
भरघोस मदती द्यावी यासह विविध मागण्या मांडत
पवार यांनी, चहापानावर बहिष्कार टाकल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
ओला दुष्काळ जाहीर करा. पंच्याहत्तर
हजार रुपये हेक्टरी मदत करा. फळबागांना हेक्टरी दीड लाख रुपये मदत जाहीर करा. मजूरांना
एकरकमी अनुदान दिलं गेलं पाहिजे तसंच अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक
शुल्क देखील माफ करा आणि यंदा विधेयक पण बरीचशी आहेत, तीपण चर्चा करुनच शासकीय विधेयक
मंजूर केली गेली पाहिजे. या सगळ्या कारणांमुळे आम्ही विरोधी पक्षांनी आज चहापानावर
बहिष्कार घालायचा निर्णय घेतलेला आहे.
****
राज्यातील गृहरक्षक दल- होमगार्ड सैनिकांना शासकीय कार्यालय,
निमशासकीय कार्यालय आदी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात यावं, असा आदेश शासनाने
पारित करावा, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. गृहरक्षक दलाचे अप्पर पोलिस महासंचालक
डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सुरक्षा रक्षक म्हणून होमगार्ड सैनिकांची
नेमणूक करण्यात आली तर सुरक्षा कामात आणखी तत्परता येईल असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून पालकत्व ॲपचं लोकार्पण केलं. बालकांसाठी जन्मापासून पहिले एक
हजार दिवस महत्त्वाचे असून या दरम्यान बालकांची शारिरिक, बौद्धिक वाढ होत असते. या
ॲपच्या माध्यमातून पालकांना यासंबंधी माहिती उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, देशात बालमृत्यू दर कमी करण्यात वेगानं पावलं
उचलली जात आहेत. २०१४ पासून ते २०१९ पर्यंत बाल मृत्यू दर हा दर हजारी ३५ एवढा कमी
झाला असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं
२०८ कोटी मात्रांचा
टप्पा पार केला आहे. काल सहा लाख दहा
हजार ८६३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०८ कोटी ३१ लाख २४ हजार ६९४ मात्रा देण्यात
आल्या आहेत.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त
आज संपूर्ण देशभरात स्मरण केलं जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह
अनेक मान्यवरांनी, राजधानी दिल्लीत 'सदैव अटल', या वाजपेयींच्या समाधीवर पुष्प अर्पण
करुन अभिवादन केलं.
मुंबईत कांदिवलीत अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्र
संकुलात वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. खासदार गोपाळ शेट्टी,
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वाजपेयींना
आदरांजली अर्पण केली.
****
जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम इथं भारत-तिबेट सीमा पोलिस
दल आयटीबीपीच्या सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळून सहा सैनिकांचा मृत्यू झाला,
इतर ३० सैनिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं श्रीनगर इथं उपचारासाठी दाखल करण्यात
आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गेल्या चार महिन्यात ७९ लाखांहून अधिक लहान मुलांची आधार
नोंदणी करण्यात आली आहे. यंदा ३१ मार्च रोजी
२ कोटी ६४ लाख आधार नोंदणीकृत असलेली मुलांची संख्या आता जुलै अखेर पर्यंत ३ कोटी ४३
लाख झाली आहे, अशी माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली.
****
देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
साजरा केला जात आहे. या अंतर्गत नऊ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत, राज्यात स्वराज्य
महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत उद्या सकाळी ११
वाजता समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान या उपक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, सहकारी तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठानं,
संस्था यांना उद्या सामुहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होण्याचं
आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
लातूर जिल्हा क्रीडा संकूलात ७५ ची प्रतिकृती करून सामूहिक
राष्ट्रगीत होणार असून जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयात, सामाजिक संस्था, नागरिकांनी
सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं, धरणांच्या
पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आज दारणा तसंच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात
आला आहे. जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे ३२ हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी गोदावरी पात्रात सोडलं जात आहे. पावसाचं प्रमाण पाहता, या विसर्गात वाढ
होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
****
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीला पूर आल्याने, अनेक कुटुंबांना
सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नदीची पातळी धोक्याच्या खुणेपेक्षा तीन मीटरने वाढली
असून, भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. भंडारा शहरातही अनेक भागात पुराचं पाणी
शिरलं आहे. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांनाही पुराचा फटका बसल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
धुळे शहरासह जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार
सुरु आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावात
पावसामुळे शेतात पाणी साचले असल्यानं पिकांचे नुकसान होत आहे. अक्कलपाडा धरणातून पाण्याचा
विसर्ग केला जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे.
****
No comments:
Post a Comment