Friday, 3 February 2023

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 03.02.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  03 February  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ फेब्रुवारी २०२३   सायंकाळी ६.१०

****

·      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘राज्य अतिथी’चा दर्जा देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

·      ग्रंथ दिंडीनं शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाला प्रारंभ.

·      मुंबईवर हल्ला करण्याच्या धमकीच्या ई मेलनंतर प्रमुख धार्मिक स्थळं, पंचतारांकित हॉटेल्स, आणि महत्वाच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ.

·      विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय.

आणि

·      गव्हाचं तयार पीठ साडे एकोणतीस रूपये प्रति किलो दरानं विक्री करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

****

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘राज्य अतिथी’चा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वर्धा इथं आयोजित शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आज त्यांनी ही घोषणा केली. राज्याचे शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी आणि समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, खासदार, जिल्ह्यातील आमदार, तसंच आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापिका उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाला भेडसावणारे मुद्दे, त्याविषयी वाटणारी तळमळ आणि सामाजिक जाणीव यातून एक उत्तम आणि जबाबदार साहित्यिक जन्मला येतो अशी भावना व्यक्त केली. राज्य सरकार कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत त्यांनी, समाजात होणाऱ्या विकास कामांचा उल्लेख साहित्यकांनी आपल्या रचनांमध्ये करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सरकारनं चुकीचं काम केलं तर कान धरण्याचा अधिकार असल्याचं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले –

सर्व सामान्य लोकांच्या हिताचं जपणूक करणारं राज्य सरकार असायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही जेंव्हा आम्ही चांगले निर्णय घेऊ नक्की त्या ठिकाणी आपण आमच्या पाठीवर शाबासकीची थाप जेंव्हा द्याल आणि साहित्यिकांकडून जेव्हा ही थाप मिळते तेंव्हा आणखी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. आपण चांगलं काम करू लागतो आणि जेंव्हा सरकारकडून, राज्यकर्त्यांकडून एखादा चुकीचा निर्णय झाला तरी देखील आपल्याला वरिष्ठांना कान धरण्याचा देखील अधिकार आहे.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या मनोगतात विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. नुकत्याच शासन आयोजित साहित्य संमेलनाबाबत बोलताना, असं आयोजन स्वायत्त संस्था यांच्या मार्फत व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तत्पूर्वी, आज सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीमध्ये विठ्ठल-रुखमाई, विविध संत, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा आदी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध शाळांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर संमेलनस्थळी अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देणारा ई मेल राष्ट्रीय तपास यंत्रणा-एन आय ए ला प्राप्त झाल्यानंतर मुंबईतली प्रमुख धार्मिक स्थळं, पंचतारांकित हॉटेल्स, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळं आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेच्या नावानं हा धमकीचा इ-मेल पाठवण्यात आला आहे. यामध्ये मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत एनआयएनं मुंबई पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा इ-मेलमध्ये करण्यात आला आहे.

****

विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा ३ हजार ३८२ मतांनी विजय झाला. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी ४६ हजार ३४४ मतं घेतली तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मतं मिळाली. विजयासाठीचा कोटा पूर्ण होण्यासाठी तब्बल ३० तास मतमोजणीची प्रक्रिया चालली.

राज्यातील विधान परीषदेच्या पाच जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडी, एका जागेवर भाजप तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

****

राज्यातील कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवता यावीत या उद्देशानं राज्य शासन आणि जपानच्या वाकायामा स्टेटमधल्या वाकायामा प्रीफेक्चर कुस्ती महासंघ यांच्यात आज मुंबईत एक सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील मल्लांना तांत्रिक दृष्ट्या सक्षम करणं तसंच ऑलिम्पिक सारख्या विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवण्याच्या हेतुनं तंत्रज्ञानाचं आदान-प्रदान करण्यासाठी या सामंजस्य कराराची मदत होणार असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

****

देशातल्या दोन हजार रेल्वे स्थानकांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकानं सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. नवी दिल्लीत आज त्यांनी ही माहिती दिली. ही दुकानं २४ तास खुली राहतील आणि प्रवाशांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतील, असं ते म्हणाले.

****

गव्हाचं तयार पीठ साडे एकोणतीस रूपये प्रति किलो दरानं विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं, घेतला आहे. येत्या ६ फेब्रुवारीपासून विविध किरकोळ विक्री केंद्रांवर साडे एकोणतीस रूपये किलो दरानं नागरिकांना कणीक उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ - एनसीसीएफच्या केंद्रांवर तयार पीठाची विक्री केली जाईल. केंद्रीय बाजारामध्ये यापूर्वीच याच दरानं पीठ विक्री सुरू झाली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी, अन्न अर्थव्यवस्थेतील चलनवाढीच्या दृष्टीनं देशातल्या विविध केंद्राद्वारे केल्या जाणाऱ्या विक्रीचा आढावा घेतला. भारतीय अन्न महामंडळाच्या केंद्रातून नाफेड आणि एनसीसीएफ तीन लाख मेट्रीक टन गहू विक्रीसाठी घेतील असा निर्णयही या संबंधीच्या बैठकीत घेण्यात आला.

****

देशात २९ जानेवारीपर्यंत ३२ कोटी १२ लाख आयुष्मान भारत आरोग्य खाती उघडण्यात आल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली. लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात आज त्यांनी ही माहिती दिली. भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत २३ कोटी आयुष्मान कार्ड बनवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. ही योजना १० कोटी ७४ लाख कुटुंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुरक्षा प्रदान करते.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत आज औरंगाबाद शहरात कुष्ठरोग जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. स्वामी समर्थ प्राथमिक विद्या मंदिर आणि मातोश्री जीवाबेन पटेल माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी यावेळी कुष्ठरोग प्रतिज्ञा घेतली. चेहरा लालसर चकाकणारा, तेलकट गुळगुळीत असणे, अंगावर फिकट पाढूंरका लालसर बधीर चट्टे असणे आदी लक्षणे दिसल्यास उपचार घेण्याचं आवाहन डॉ.अभय धानोरकर यांनी केलं.

****

मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याची मागणी उस्मानाबादमधील मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे संयोजक युवराज नळे यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशाच्या इतिहासात हा एक मोठा स्वातंत्र्य लढा असून नवीन पिढी या लढ्याच्या इतिहासापासून अनभिज्ञ आहे, त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात या योगदानाचा इतिहास समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...