Thursday, 2 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.02.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या पाच जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. यामध्ये मराठवाडा, कोकण, नागपूर शिक्षक मतदारसंघ तसंच अमरावती आणि नाशिकच्या पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स या कंपनीत सुरुवात झाली असून, मतमोजणी प्रक्रिया ५६ टेबलांवर होत आहे.

***

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु होणार आहे. लोकसभेत चंद्रप्रकाश जोशी, तर राज्यसभेत के लक्ष्मण धन्यवाद प्रस्ताव मांडणार आहेत.

***

काल सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर भारतीय जनता पक्षाच्या मुंबई शाखेने  विश्लेशणात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात अर्थसंकल्पाचं लोकशाहीकरण केलं असल्याचं मत पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांना निधी मिळाला असून, यात विदर्भ-मराठवाडा सिंचनासाठी ४०० कोटी रुपयांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.

***

निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटाला, शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत समारोप झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं.

***

सक्तवसुली संचालनालय -ईडीनं काल शाहुपुरी इथल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्यांची तपासणी केली. मुश्रीफ हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीनं छापे टाकले होते.

***

खेलो इंडिया स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महिला दुहेरीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर आणि जेनिफर वर्गीस या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं. पुरुष दुहेरीत जश मोदी आणि नील मुळे या जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

//***********//

 

 

 

 


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...