Friday, 3 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.02.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

वर्धा इथं ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. संमेलनाचं औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

***

अमरावती पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या मतांचा कोटा पूर्ण न झाल्यानं अद्यापही मतमोजणी सुरुच आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ६९७, तर भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांना ४१ हजार ३१५ मतं मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

***

जी-20 च्या पहिल्या शाश्वत वित्तीय कार्यगटाच्या बैठकीला काल गुवाहाटी इथं सुरुवात झाली. जी-२० सदस्य देशांच्या प्रतिनिधींना शाश्वत जीवनशैलीला व्यापक स्वरूप देण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचं आवाहन, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं.

दरम्यान, जी - 20 समूहाच्या रोजगार विषयक कार्यगटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला राजस्थानच्या जोधपूर मध्ये काल प्रारंभ झाला. या बैठकीमध्ये अधिक मजबूत शाश्वत, संतुलित, सर्वसमावेशक आणि रोजगारसमृद्ध विकासासाठी सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.

***

कवीवर्य राजा बढे लिखित आणि शाहीर साबळे यांनी गायलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाला असून, या गीताच्या गायनाबाबतची नियमावली राज्य सरकारनं जारी केली आहे. या गीताचे पहिले दोन कडवे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आले असून, सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

***

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण शहरासह आजूबाजूच्या गावात काल जमिनीतून गूढ आवाज आला. तीन वर्षानंतर अशा प्रकारचा आवाज आला असून, नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

***

औरंगाबाद इथला महावितरणचा कर्मचारी अनिल गरंडवाल याला ४० हजार रुपये लाच घेताना काल रंगेहात पकडण्यात आलं. शेंद्रा औद्योगिक वसाहती मधल्या औद्योगिक मीटरचं व्यावसायिक मीटरमधे रुपांतर करुन देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

 

//*************//

 


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...