Saturday, 4 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.02.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 February 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाला वर्ध्यात प्रारंभ

·      राज्य सरकार कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, तर 'एक राष्ट्र-एक भाषा' ही घोषणा मुळीच मान्य नसल्याची संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची स्पष्टोक्ती  

·      विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

·      विधानसभेची कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, भारतीय जनता पक्ष- महायुतीचाही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीनं लढवण्याचा निर्धार   

·      भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना युती विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा करणार

·      मराठा समाजाच्या तरुणांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून आरक्षण देण्यासंदर्भातला शासन निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडून रद्द

·      जालना जिल्ह्यात आभासी चलनाच्या फसवणूक प्रकरणात चार संशयितांना अटक

आणि

·      खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, आतापर्यंत १३ सुवर्ण, १७ रौप्य, १२ कांस्य पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई

****

राज्य सरकार कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वर्धा इथं आयोजित शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. समाजात होणाऱ्या विकास कामांचा उल्लेख साहित्यकांनी आपल्या रचनांमध्ये करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्‍याचे शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्‍याक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, स्‍वागताध्‍यक्ष दत्‍ता मेघे यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ हिंदी कवी आणि समीक्षक डॉ. विश्‍वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्‍वास, आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय महामंडळाच्‍या अध्‍यक्षा प्राध्यापिका उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची यावेळी उपस्थिती होती. सरकारनं चुकीचं काम केलं तर साहित्यिकांना कान धरण्याचा अधिकार असल्याचं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले…

‘‘सर्व सामान्यांच्या हिताचं जपणूक करणारं राज्य सरकार असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जेंव्हा आम्ही चांगले निर्णय घेऊ नक्की त्या ठिकाणी आपण आमच्या पाठीवर शाबासकीची थाप जेंव्हा द्याल, आणि साहित्यिकांकडून जेंव्हा ही थाप मिळते तेंव्हा आणखी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. आपण चांगलं काम करु लागतो आणि जेंव्हा सरकारकडून राज्यकर्त्यांकडून एखादा चुकीचा निर्णय झाला तरी देखिल आपल्याला वरिष्ठांना कान धरण्याचा देखिल अधिकार आहे.’’

ग्रामीण भाषा, बोली भाषा संवर्धनासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. राज्यातल्या थोरामोठांच्या यशोगाथा अधिक व्यापक स्वरूपात पुढे आणता येतील का, चांगल्या परदेशी साहित्याचा अनुवाद केला जाऊ शकेल का, अशा मुद्यांकडे त्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा देण्याची मागणी मान्य करण्यात आल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

'एक राष्ट्र-एक भाषा' ही घोषणा आम्हास मुळीच मान्य नाही, असं संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं. एक राष्ट्राला विरोध नाही, मात्र प्रादेशिक भाषा आणि भाषिक संस्कृतीतून राष्ट्रीय ऐक्य साधता येईल, असं ते म्हणाले. राज्यघटनेनं हिंदी ही संघराज्याच्या व्यवहारासाठी निवडलेली भाषा आहे, म्हणून महाराष्ट्रात व्यावहारिक भाषा म्हणून मराठीला वगळून हिंदी वापरता येणार नाही. हिंदी ही केवळ एकटी राष्ट्रभाषा नसून, देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांनाही राष्ट्रभाषांचा दर्जा प्राप्त असल्याचं ते म्हणाले. तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या, सामर्थ्यशाली एकराष्ट्रीयत्त्व निर्माण करण्याचा उद्देश सफल करण्याकरता प्रादेशिक मातृभाषांची वाढ करणारं साहित्य कसं निर्माण होईल, या वक्तव्याकडे बोट दाखवत चपळगावकर यांनी, सर्व प्रादेशिक भाषांत प्रसिद्ध होणारं साहित्य मराठीमध्ये, आणि मराठीतलं साहित्य सर्व भाषांमध्ये अनुवादित होण्यावर भर दिला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमावादाच्या पार्श्वभूमीवर पाटसकर निवाड्याप्रमाणे दोन भाषिक राज्यांच्या सीमा आखल्या जाव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. दररोजच्या व्यवहारात प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या मराठीचा अभिमान बाळगावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वाढती असहिष्णूता, बदलतं सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव या विषयांवर आपली भूमिका संमेलनाध्यक्ष या नात्यानं न्यायमूर्ती चपळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केली.

****

विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा तीन हजार ३८२ मतांनी विजय झाला. लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मतं, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मतं मिळाली. विजयासाठीचा कोटा पूर्ण होण्यासाठी तब्बल ३० तास मतमोजणीची प्रक्रिया चालली. राज्यातल्या विधान परीषदेच्या पाच जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडी, एका जागेवर भाजप तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

दरम्यान, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजय मिळवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांनी, काल औरंगाबाद मधल्या विविध शाळांना भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधत, निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. शिक्षकांच्या हक्कासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.  

****

विधानसभेची कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं काल जाहीर केला. कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार हे आज जाहीर करु असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले –

‘‘महाविकास आघाडीची तिनही पक्षांची आमची बैठक झाली. पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी - चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघ जे रिक्त झालेले आहेत, त्या ठिकाणचा दोन्ही जागांचा आढावा तिन्ही पक्षांच्या वतीने घेतला. त्याबाबतीतली अतिशय सकारात्मक चर्चा आमची झाली. आमचे मित्र पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि इतर जे आमचे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. आणि आमचा अंतिम निर्णय याबाबतीतला सगळे मिळून घोषित करु.’’

****

विद्यमान आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यातल्या इतर जागांवर विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केले होते. त्यामुळे या जागा बिनविरोध करण्याचा प्रश्न नाही, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय निवड समिती विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करेल, त्यानंतर सोमवारी कसबा आणि चिंचवड मतदार संघातले उमेदवार अर्ज दाखल करतील, असं आमदार चंद्रकात पाटील यांनी सांगितलं. ते काल पुण्यात बोलत होते. कसबा विधानसभेची पोटनिवडणूक, महायुतीतल्या सर्व घटक पक्षांनी पूर्ण ताकदीनं लढवण्याचा निर्धार काल झालेल्या घटक पक्षांच्या बैठकीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या दोन्ही जागा बिनविरोध व्हाव्यात अशी सर्वांची भूमिका आहे. यासाठी विरोधी पक्षांना पत्र पाठवली असून त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा असल्याचं, पाटील म्हणाले.

****

विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीला पराभव पत्करावा लागला, त्या पराभवाची कारणमिमांसा करून सुधारणा केली जाईल, तसंच राज्य सरकार जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.  काल वर्धा इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले –

‘‘ज्या काय जागा यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाहीत, त्याची कारणमिमांसा केली जाईल आणि नक्की त्याच्यावर विचार करुन सुधारणा केली जाईल. जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये देखील आपला तो विभाग काम करत आहे. त्याच्यावर विचार नक्की सुरु आहे.’’

****

मराठा समाजाच्या तरुणांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल - ईडब्ल्यूएस गटातून नोकर भरतीमध्ये राज्य सरकारकडून देण्यात आलेली विशेष संधी आणि त्याबाबत काढलेले सर्व शासन निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय लवाद - मॅटनं रद्द ठरवले आहेत. त्यामुळे या शासन निर्णयांच्या आधारे शासकीय सेवेत झालेली भरती बेकायदा ठरणार आहे. त्याचबरोबर २६ जून २०२२, १४ जुलै २०२२ आणि २३ जुलै २०२१ रोजी जाहीर झालेली उमेदवारांची अंतिम यादी देखील लवादाने रद्दबातल ठरवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या चार आठवड्यात आर्थिक मागास प्रवर्गातल्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करावी, अन्य प्रवर्गातली निवड यादी आहे तशीच ठेवावी, असे निर्देशही लवादानं दिले आहेत.

****

येत्या मार्च मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेची प्रवेशपत्रं, महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन, या संकेतस्थळावर सोमवार सहा फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून शाळेच्या स्कूल लॉगिन मधून डाउनलोड करून घेता येणार आहेत. ही प्रवेशपत्रं शाळांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत, अशी सूचना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही वेगळं शुल्क शाळेला घेता येणार नाही. प्रवेशपत्रामध्ये माध्यम किंवा विषय यात काही दुरुस्त्या असतील तर संबंधित शाळेने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. विद्यार्थ्याच्या फोटो, स्वाक्षरी, नाव, जन्मतारीख आणि जन्म स्थळासंदर्भातील दुरुस्त्या या शाळा स्तरावरच करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची असल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे.

****

जालना जिल्ह्यात क्रिप्टो करन्सी - आभासी चलनाच्या जीडीसी कॉईन फसवणूक प्रकरातल्या हस्तकासह चार संशयितांना, जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल पुणे इथून ताब्यात घेतलं. संशयितांकडून चार महामगड्या गाड्या, तीन लॅपटॉप, संगणक, नऊ महागडे मोबाईल, असा एकूण दोन कोटी ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून जीडीसी काईनमध्ये गुंतवणूक करण्याचं सांगून या आरोपींनी अनेकांची फसवणूक केली असून, पोलिसांनी त्यांच्या खात्यातून आर्थिक व्यवहार झालेल्या नातेवाइकांची विविध बँकामधली खाती गोठवली आहेत. या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत पाच कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम निष्पन्न झाल्याची माहिती जालना आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक बी.डी. फुंदे यांनी दिली.

****

मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याची मागणी, उस्मानाबादमधल्या मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे संयोजक युवराज नळे यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशाच्या इतिहासात हा एक मोठा स्वातंत्र्य लढा असून, नवीन पिढी या लढ्याच्या इतिहासापासून अनभिज्ञ आहे, त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात या योगदानाचा इतिहास समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालं आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबतचा आदेश काल जारी केला.

****

मध्य प्रदेशात सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. राज्याच्या खेळाडुंनी या स्पर्धेत आतापर्यंत १३ सुवर्ण, १७ रौप्य, १२ कांस्य पदकांसह एकूण ४३ पदकं जिंकली आहेत.

नेमबाजीमध्ये काल मिश्र दुहेरीत १० मीटर एअर रायफल प्रकारात राज्याच्या ऐश्वर्या आणि रणवीरनं सुवर्ण पदक जिंकलं. त्यांनी पश्चिम बंगालच्या अभिनव आणि स्वाती चौधरीचा पराभव केला.

महाराष्ट्राच्या मुलांनी योगासन प्रकारातल्या अखेरच्या दिवशी काल कलात्मक दुहेरी प्रकारात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं.

जिम्नॅस्टिक प्रकारात राज्याच्या आर्यन दवंडेला ऑल राऊंड प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

ॲथलेटिक्समध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत वसईच्या ईशा जाधवने सुवर्ण पदक पटकावलं, तर उंच उडी प्रकारात कोल्हापूरच्या अनिकेत माने यानं कांस्य पदक जिंकलं. भालाफेक प्रकारात शिवम लोहकरेने आणि शंभर मीटर शर्यतीत ऋषी देसां यांनी रौप्य पदक जिंकलं.

राज्याच्या पुरुष खो खो संघानं काल दिल्लीला ३८-२८ असं पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं. सलग पाचव्यांदा राज्याला हा बहुमान मिळाला आहे. महिलांच्या खो खो संघाला अंतिम सामन्यात ओडिशाकडून पराभव झाल्यानं, रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

ग्वाल्हेरमध्ये झालेल्या महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या नाईशा कौरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

****

खरीप २०२२ च्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना देण्यात येणारे २०० कोटी रुपये पुढील आठवड्यात अपेक्षित असल्याचं, उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील  यांनी सांगितलं आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडे राज्य सरकारच्या हप्त्याची रक्कम जमा झाली असून, पुढील तीन  ते चार दिवसात केंद्र सरकारचा हिस्सा प्राप्त होणं अपेक्षित आहे. ही रक्कम मिळताच उर्वरित पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना खरीप २०२२ ची नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार असल्याचं, भारतीय कृषी विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसचिव सिद्धेश रामसुब्रमण्यम यांनी सांगितल्याची माहिती आमदार पाटील  यांनी दिली.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत काल शहरात कुष्ठरोग जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...