Monday, 20 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.02.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 20 February 2023

Time : 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २० फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      अंकाई-औरंगाबाद रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला प्रधान मंत्री गतिशक्ती उपक्रमांतर्गत मंजुरी

·      आगामी निवडणुका शिवसेनेसोबत युती करुन लढवण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

·      हिंदुत्व नव्हे, भाजपला सोडल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार

·      केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करणार, शिंदे गटाकडूनही कॅव्हेट दाखल

·      देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी, शिवनेरीवर शिवजन्मोत्सव तर पुण्यात शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण

·      ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताचा अधिकृत शुभारंभ

·      मुख्यमंत्र्यां विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी  खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध नाशिकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आणि

·      बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय

 

सविस्तर बातम्या

वर्षानुवर्षे रखडलेल्या अंकाई-औरंगाबाद रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर मंजूरी मिळाली आहे. पी.एम. गतिशक्ती उपक्रमांतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप -एनपीजी ने औरंगाबाद-अंकाई सह अन्य तीन मार्गाच्या दुहेरीकरणालाही मंजुरी दिली आहे. औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरणामुळे मुंबई, नवी दिल्ली, बेंगलोर, अमृतसर, हैद्राबाद, निझामाबाद अशा लांबच्या स्थळांना पोहचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरून प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतुक, तसंच औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीला मोठी मदत होणार आहे.

****

आगामी निवडणुका शिवसेनेसोबत युतीत लढवणार असल्याची घोषणा, केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी केली आहे. काल कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले..

 

Byte…

2024 मे फिर से एक बार देश मे चुनाव होने वाला है। हमे मालूम है, की हम और हमारे साथी दल शिवसेना महाराष्ट्र मे चुनाव लडेंगे। और सामने सारे इकठ्ठा होकर लडने वाले है। मै आपको विश्वास दिलाता हूं मित्रों की आने वाले चुनाव मे भारतीय जनता पार्टी का विजय ये महान भारत की रचना का चुनाव है, समृद्‌ध भारत की रचना का चुनाव है।

 

लोकसभा निवडणुकीत बहुमत नव्हे, तर संपूर्ण विजय मिळवण्याचं आवाहन शहा यांनी केलं. राज्यातल्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी करावा, असं त्यांनी सांगितलं.

****

आपण हिंदुत्व सोडलं नसून, भाजपला सोडलं असल्याचा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल मुंबईत उत्तर भारतीय नागरिकांशी संवाद साधत होते. आपण काँग्रेससोबत गेलो नाहीत, तर भाजपने आपल्याला काँग्रेसकडे ढकललं, असा आरोप करत, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपलं काय चुकलं, असा सवालही ठाकरे यांनी केला. ते म्हणाले…

 

Byte …

हम तो हिंदुत्ववादी थे। आज भी मै कहता हूं मै हिंदू हूं। मैने हिंदुत्व कभी छोडा नही और ना ही कभी छोडुंगा। मैने तो भाजप को छोडा है, हिंदुत्व को नही छोडा है। भाजप मतलब हिंदुत्व नही है। और उनका जो हिंदुत्व है वो हमारा हिंदुत्व नही है। वो हमे मंजूर नही है, खुले आम कहता हूं।और मै काँग्रेस के साथ गया, मै नही गया भाजप मुझे ढकेला है। और ये बात मै दोहराना इसलिये चाहता हूं ताकि गलत फाहमी आप के मन मे ना रहे। मुझे तो लोगों के सामने आना है, लोगों के बिच मे आना है, और पुछना है बताओ मैने क्या गलती की है? ढाई साल मै मुख्यमंत्री था, कहां मैने भेद किया है?

****

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करणार आहे. आज सकाळच्या सत्रात सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण उपस्थित केलं जाईल, असं आमदार अनिल परब यांनी काल सांगितलं. जुन्या याचिकांमध्ये नव्या याचिकेचाही समावेश केला जावा, अशी विनंती न्यायालयाला केली जाईल, असंही परब यांनी सांगितलं.

दरम्यान, याप्रकरणी शिंदे गटाकडुनही न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमची बाजुही ऐकून घ्यावी, अशी विनंती शिंदे गटाकडून या कॅव्हेट द्वारे करण्यात आली आहे.

****

देशभरात शिवजयंती काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांसह, शोभायात्रा तसंच मिरवणुका काढण्यात आल्या. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शिवनेरी परिसराचा विकास तसंच गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी पोलीस बँड पथकानं राष्ट्रगीत आणि 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून वाजवून सलामी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

किल्ले प्रतापगडावरही शिवजयंती उत्साहात साजरी झाली.

आग्रा इथल्या लाल किल्ल्यातल्या दिवाण - ए - आम मध्ये शिवजयंती काल उत्साहात साजरी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रा किल्ल्यावर यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणं हा ऐतिहासिक क्षण असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरवर्षी आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.

****

छत्रपती असूनही उपभोगशून्य स्वामी कसा असावा, याचा आदर्श शिवाजी महाराजांनी सर्वांसमोर ठेवला, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण शाह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी बोलताना ते म्हणाले…

 

Byte…

उन्होंने इस दुनिया के सभी शासकों के लिये एक उदाहरण प्रस्थापित किया की उपभोग शुन्य स्वामी कैसा होता है। स्वयं तो राजा थे, छत्रपती थे। पर उपभोगशुन्य स्वामी राज्य के धन का अपने लिये कदापि उपयोग न करनेवाला स्वामी कैसा होता है, राजा कैसा होता है, उसका उदाहरण शिवाजी महाराज ने हमारे सामने रखा है।

बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहता आलं, याचा अभिमान वाटत असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवसृष्टीचं उर्वरीत कामही वेळेवर पूर्ण होईल, त्यासाठी लागेल ती मदत राज्य सरकार करेल असं आश्वासन देत, राज्य सरकारच्यावतीनं ५० कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं क्रांतीचौक इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याना अभिवादन करण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवप्रतिमेची ढोल ताशाचा गजर आणि लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रसिद्ध व्याख्याते विश्वधर देशमुख यांचं शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यान झालं, शिवाजी महाराजांच्या कृतीशील स्मरणाची आता गरज असल्याचं, देशमुख यांनी नमूद केलं. ते म्हणाले…

 

Byte …

२६ नोव्हेंबर १९४९ ला आपण वचन दिलं, ते वचन आहे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय सगळ्यांना मिळवून देण्याचं. दर्जाची आणि संधीची समानता सगळ्यांना मिळवून देण्याची. आणि समजा हे घडत नसेल तर मला वाटतं ते घडण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच कृतीशील स्मरण आहे. शिवाजी राजांचं शाब्दिक स्मरण आता पुरे झालं, काल्पनिक स्मरण आता खूप झालं. आवेशपूर्ण स्मरणंही बऱ्यापैकी झालंय. छत्रपती शिवाजी राजांचं जे कृतीशील स्मरण आहे, ते कृतीशील स्मरण आपल्याला कसं करता येईल, याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे.

****

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झाल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल घोषित केलं. ते काल चंदपूर इथं झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम जागवतो, गीतामधून वीरतेचा मंत्र दिसतो असंही ते यावेळी म्हणाले. राज्यात काल सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. तसंच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचं सामुहिक गायन करण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे काल रक्तदान अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी परिचारिका महाविद्यालयातर्फे पथनाट्याचं सादरीकरण, रक्तदान विषयक चित्र प्रदर्शन तसंच रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयोजित तीन रक्तदान शिबिरातून १०७ जणांनी रक्तदान केलं.

****

नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार महसूल संतोष बनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

जालना शहरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीनं गांधीचमन चौक ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. एम.एस. जैन इंग्लिश स्कूलचे शिक्षक रमेश काळे आणि विद्यार्थ्यांनी दहा क्विंटल रांगोळीचा वापर करून चार हजार चौरसफूट जागेवर शिवरायांची प्रतिमा साकारली.

****

उस्मानाबाद इथं शिवजयंतीनिमित्त महाशिव दुचाकी फेरी काढण्यात आली. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर या दुचाकी फेरीत सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत मूर्तीसह शेकडो शिवप्रेमींनी या दुचाकी फेरीत सहभाग नोंदवला होता.

****

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. हिंगोली शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विविध पारंपरिक देखावे साकारण्यात आले होते. सायंकाळी आतषबाजीने या उत्सवाची सांगता झाली. औंढा नागनाथ इथल्या नागनाथ मंदिर परिसरातील ऋणमोचन नागतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त बारव सजावट करून ११ हजार दिव्यांची आरास करण्यात आली.

****

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिकच्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप करत युवा सेनेचे विस्तारक योगेश बेलदार यांनी रात्री उशिरा नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

****

बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघानं भारताला ११५ धावांचं विजयासाठी लक्ष्य दिलं होतं. त्यापूर्वी काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियानं एक गडी बाद ६१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत संपुष्टात आला. रविंद्र जडेजानं आपल्या कारकिर्दीत सर्वोत्तम गोलंदाजी करत ४२ धावा देत सात बळी घेतले. रविचंद्रन अश्विननं १६ षटकांत ५९ धावा देत तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं चार गडी गमावून ११८ धावा करत विजय मिळवला. रोहित शर्माने ३१ तर विराट कोहलीने २० धावा केल्या तर श्रीकर भरत २३ आणि चेतेश्वर पुजारा ३१ धावांवर नाबाद राहिले. रविंद्र जडेजाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मालिकेतला तिसरा कसोटी सामना इंदूर इथं येत्या एक मार्चपासून खेळवला जाणार आहे.

****

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाला देशात प्रथम क्रमाकांचा विभाग बनवण्याचा सरकारचा मानस असल्याचं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. नीति आयोगामार्फत मंजूर मोबाईल मिनी हॉस्पीटल फिरत्या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात सावंत बोलत होते. या फिरत्या रुग्णालयात १२० प्रकारच्या चाचण्या, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया तसंच चार रुग्णखाटांची सुविधा उपलब्ध असेल. वैद्यकीय मदत कक्ष कार्यशाळेचं उद्घाटनही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासनमुक्त करून वारकरी आणि नागरिकांच्या ताब्यात द्यावं, अशी मागणी करणारी याचिका भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरकारला मंदिरे ताब्यात घेण्याचा कोणताच अधिकार नाही, असा दावा त्यांनी केला आहे, याबाबत डॉ. स्वामी यांनी सामाजिक माध्यमांवर माहिती दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...