Monday, 3 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भूतकाळात साध्य केलेल्या उद्दिष्टांबद्दल चर्चा करतानाच भविष्यकाळाबाबत मंथन करणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाचं नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. सीबीआयने गेल्या साठ वर्षांच्या कामकाजातून सामान्य नागरिकांचा विश्वास संपादित केला आहे. यासाठी आजवर या संघटनेत काम केलेले सर्व अधिकारी कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पुणे, नागपूर आणि शिलॉंग इथल्या सीबीआयच्या कार्यालयांच्या नवीन इमारतींचं उद्घाटन आणि सीबीआयच्या ट्विटर हँडलचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. पंतप्रधानांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदकं प्रदान केली.

***

महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडिया पोस्टने सुरू केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी, महिला सन्मान बचत पत्र हे या दिशेने एक उत्कृष्ट पाऊल असल्याचं नमूद केलं. इंडिया पोस्टने महिला सन्मान बचत पत्राची आजपासून सुरुवात केली आहे. एक लाख ६९ हजार टपाल कार्यालयांमध्ये तत्काळ प्रभावाने ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली असून, महिला आणि मुलींच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणासाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे.

***

संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही कायम राहिला. चार दिवसांच्या सुटीनंतर संसदेचं कामकाज आज पुन्हा सुरू झालं. राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज पुकारताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. लोकसभेत मात्र पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि केरळमधले माजी खासदार इनोसंट यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोकप्रस्ताव मांडला. सदनानं या दोन्ही सदस्यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

***

स्वच्छ उर्जा हरित भविष्य या विषयावरची जी-20 गटाची बैठक आज त्रिपुरात आगरतला इथं सुरु होत आहे. या बैठकीला ८५ विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दरम्यान, गुजरातमधल्या गांधीनगर इथं सुरु असलेल्या जी - 20 देशांच्या ऊर्जा उत्सर्जन विषयक कार्यगटाच्या बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी, ऊर्जा संक्रमण विषयावर चर्चा केली जात आहे.

***

छत्रपती संभाजीनगर प्रमाणे महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुढची सभा नागपूर इथं होणार असून, प्रत्येक सभेत केवळ दोनच नेते बोलतील, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेत उपस्थित नसल्याबद्दल प्रश्न विचारला असता, पवार यांनी, प्रत्येक नेता सभेला उपस्थित असायला पाहिजे, असं आवश्यक नसल्याचं सांगितलं.

***

काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सुरत सत्र न्यायालयात, सूरत न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. त्यासाठी काँग्रेसच्या कायदेशीर सल्लागारांनी याचिका तयार केली आहे. राहुल गांधी यांना सूरत न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका अवमानना प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे.

***

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं आज पुण्यात नऊ ठिकाणी छापे टाकले. पुण्यातल्या काही व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली असून, ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे.

***

वेतन श्रेणी मुद्यावरुन राज्यातल्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचं असलं तरी या पदाला इतर विभागांमधल्या समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळतं, त्यामुळे किमान वेतन श्रेणी चार हजार ३०० रुपयांवरुन चार हजार ८०० रुपये करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राज्यातले ६०० तहसीलदार आणि दोन हजार २०० नायब तहसीलदार या संपात सहभागी झाले आहेत.

***

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना आणि वैजापूर इथले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अभय पाटील चिकटगावकर यांनी आज हैदराबाद इथं भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री, भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...