आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ एप्रिल २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
वेतन
श्रेणी मुद्यावरुन राज्यातल्या तहसिलदार आणि नायब तहसिलदारांनी आजपासून कामबंद आंदोलन
पुकारलं आहे. नायब तहसिलदार हे पद वर्ग दोनचं असलं तरी या पदाला इतर विभागांमधल्या समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळतं, त्यामुळे
किमान वेतन श्रेणी चार हजार ३०० रुपयांवरुन चार हजार ८००
रुपये करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
***
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात
अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं आज पुण्यात नऊ ठिकाणी छापे मारले. पुण्यातल्या काही व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे.
मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात
आली असून, ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे.
***
आज राज्यसभा दिवस आहे. १९५२ मध्ये राज्य परिषद म्हणून
ती अस्तित्वात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहातल्या सर्व माजी आणि वर्तमान सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाची लोकशाही मजबूत करण्यात आणि देशवासीयांना नवी दिशा देण्यात राज्यसभेनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
***
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं
होणार आहे. त्याचबरोबर पुणे, नागपूर आणि शिलॉंग इथल्या सीबीआयच्या
कार्यालयांच्या नवीन इमारतींचं उद्घाटन आणि सीबीआयच्या ट्विटर हँडलचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार
आहे.
***
जी - 20 देशांच्या ऊर्जा उत्सर्जन विषयक कार्यगटाची
बैठक काल गुजरातमधे गांधीनगर इथं सुरु झाली. कार्बन उत्सर्जन आटोक्यात ठेवण्यासाठी हरित हायड्रोजन हा आश्वासक पर्याय ठरेल
असा विश्वास, केंद्रीय नवीकरणीय उर्जा विभागाचे सचिव भूपिंदरसिंग
भल्ला यांनी यावेळी व्यक्त केला.
***
छत्रपती संभाजीनगर इथं रेल्वे स्थानकावरच्या पीटलाईनच्या कामाला काल प्रत्यक्षात
सुरूवात झाली असून, येत्या सहा महिन्यात सोळा डब्यांची पीटलाईन
तयार होणार असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. गेल्या
वर्षी ३ ऑक्टोबरला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पीटलाईनच्या कामाचं
भूमिपूजन झालं होतं.
//*************//
No comments:
Post a Comment