Tuesday, 4 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 April 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

जगातल्या कोणत्याही आपत्तीला मिळालेला प्रतिसाद हा एकांगी न राहता तो एकत्रित असायला हवा, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत आपत्ती व्यवस्थापनावरील पायाभूत सुविधांवर पाचव्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय संमेलनाला आज सुरुवात झाली असून, यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संदेश प्रसारित करण्यात आला. आपत्तींचा सामना करण्यासाठी स्थानिक माहितीनी परिपूर्ण तंत्रज्ञान महत्वाची भुमिका बजावू शकेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. संकटकाळी सर्वसमावेशक अशा पायाभूत सुविधा उभारणं हा या वर्षीचा परिषदेचा उद्देश आहे.

***

पत हमी योजनेत सुधारणा करणं हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकट करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ही माहिती दिली. या उद्योगांना कर्जाचा प्रवाह वाढवण्यासाठी क्रेडिट गॅरंटी योजनेमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती राणे यांनी ट्विट संदेशाद्वारे दिली होती.

***

यंदाच्या हज यात्रेसाठी केंद्र सरकारनं एक लाख ४० हजार यात्रेकरूंची निवड केली आहे. ही निवड डिजिटल निवड प्रक्रियेतून करण्यात आली. या यात्रेकरूंपैकी दहा हजाराहून अधिक यात्रेकरूंचं वय ७० वर्षांपेक्षा जास्त असल्याचं, अल्पसंख्याक मंत्रालयानं म्हटलं आहे. एकूण एक लाख ८४ हजार अर्ज दाखल झाले होते.

***

राज्यात कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत असून, गेल्या तीन वर्षांत एक लाख ३७ हजारहून अधिक लाभार्थींना ८२४ कोटीहून अधिक रकमेचं अनुदान कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. शेतकऱ्यांना शेतीपूरक यंत्र सामग्री खरेदी करण्यास प्रोत्साहित करणं आणि त्याद्वारे कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणं, असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. लहान शेतकऱ्यांना वाजवी दरात या यंत्रसामग्रीचा लाभ घेता यावा यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून बळ दिलं जात आहे.

***

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सकल जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महावीर स्तंभ इथं सकाळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहकरण्यात आलं. त्यानंतर पैठण गेट इथून शोभायात्रा काढण्यात आली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, मुनिश्री डॉ.पुलकीतसागरजी महाराज, आचार्य रविनंद महाराज, खासदार इम्तियाज जलिल, पालकमंत्री अतुल सावे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शहरातल्या विविध भागातून विविध मंडळाचे, प्राऊड ऑफ जैन या विषयावर आधारित सजीव देखावे, या शोभायात्रेत सहभागी झाले होते. या माध्यमातून महत्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यात आली. महावीर मेडीकल फांऊडेशनच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं.

***

हनुमान जयंतीचा उत्सव परवा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं भद्रा मारोतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या भाविकांच्या सुविधेसाठी छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावरची वाहतुक उद्या सायंकाळपासून अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरकडून धुळे, देवगाव रंगारीकडे जाणारी जड वाहनं नगरनाका - एएस क्लब - माळीवाडा- वेरुळ - कसाबखेडा मार्गे जातील.

***

भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप उद्यापासून फ्रान्समध्ये सुरु होणाऱ्या ऑर्लिन्स मास्टर २०२३ बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहेत. माद्रिद मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभूत झालेली ऑलिम्पिक विजेती पी व्ही सिंधूं तसंच लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय हे या स्पर्धेमधून बाहेर पडले आहेत.

***

राज्यात पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. विदर्भात उद्या तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सहा आणि सात तारखेला पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी परिपक्व झालेला गहू, भाजीपाला तसंच फळपिकांची काढणी करून सुरक्षित साठवणूक करावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. विजांचा कडकडाट तसंच वादळी वारे वाहत असताना, जनावरांची काळजी घेण्याची सूचनाही विभागानं केली आहे.

***

दरम्यान, यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा उष्ण राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण भारत, वायव्य भारताचा काही भाग वगळता एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या हंगामात देशाच्या बहुतांश भागात यंदा कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील, असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे.

//**********//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...