Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
· नागरी सेवा दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट प्रशासन पुरस्कार प्रदान;
लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव.
· मराठा आरक्षणासाठी क्युरेटीव्ह उपचारात्मक याचिका दाखल करण्याचा
राज्य सरकारचा निर्णय.
· राज्यात १ एप्रिल ते ३१ मार्च २०२४ दरम्यान ‘महाराष्ट्र श्री
अन्न अभियान’ राबवण्यास मान्यता.
आणि
· गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध
प्रकल्पांची कामं जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना.
****
प्रशासकीय कामकाजात जाणारा वेळ वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची
आवश्यकता असून, तसं केल्यानेच कामकाजात सुलभता येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. नागरी सेवा दिनानिमित्त आज नागरी प्रशासनातल्या सर्वोत्कृष्ट कार्यासाठी
पंतप्रधानांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय आराखड्यानुसार काम केल्यास, लोकांच्या गरजा सुनिश्चित
करता येतील, तसंच आगामी धोरण निश्चित करण्यासही ही बाब लाभदायक असेल, असं पंतप्रधान
म्हणाले. देशवासियांच्या अपेक्षा वाढत असून, देशाच्या विकासासाठी तसंच व्यवस्थेत बदलासाठी
नागरिक आतूर आहेत, त्यामुळे निर्णय क्षमता गतीमान करून पूर्ण क्षमतेनं काम करण्याचं
आवाहन पंतप्रधानांनी केलं.
या कार्यक्रमात राज्यातून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी. पी. आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सन्मानित करण्यात आलं.
लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकारानं,
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि प्राथमिक
आरोग्य उपकेंद्रामार्फत विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून
ते विविध आजारांचं निदान, उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व
सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची, प्रधानमंत्री उत्कृष्ट
सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
****
नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील तेरा पुरस्कारांचं वितरण करण्यात
आलं, आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत असतांना नवनवीन संकल्पना राबवून अधिक संवेदनशीलपणे
काम करावं, कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली कर्तव्यं बजावायला हवीत, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले
****
मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह उपचारात्मक
याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार
याचिका फेटाळल्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत समाजाचं आर्थिक, सामाजिक तसंच शैक्षणिक
मागासलेपणासंदर्भात सामाजिक संस्थेकडून सखोल सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. यानंतर
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सरकार मराठा समाजाच्या पाठिशी असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले –
मराठा
समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते पूर्णपणे सरकार फुल प्रुफ
करेल अशा प्रकारची चर्चा झाली. मी एवढंच सांगतो, पूर्वी आरक्षण रद्द करतांना ज्या त्रुटी
राहिलेल्या आहेत, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचं काम राज्य सरकार करेल. राज्य सरकार
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे. तोपर्यंत ज्या सुविधा इतर समाजाला ज्या
मिळतायत, त्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना असेल, मराठा समाजाच्या तरूणांना असतील,
त्या दिल्या जातील.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, त्यांचे बलिदान
कुठल्याही शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचं देशकार्य शब्दांच्या पलीकडे आहे, असं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उदय निरगुडकर यांनी अनुवादित केलेल्या ‘वीर
सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईत
करण्यात आलं, या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. सावरकर गौरव यात्रेतून त्यांचा
इतिहास, देशभक्ती, त्याग सर्वांपुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याला चांगला प्रतिसादही
मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने झालेले मृत्यू
आणि सरकारने जारी केलेली आकडेवारी यात तफावत असल्याचं विधान सभेचे विरोधीपक्षनेते अजित
पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबतची वस्तुस्थिती
समोर यावी, यासाठी न्यायालयीन चौकशीची मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचं, पवार यांनी
सांगितलं. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर येत असलेल्या चित्रफितींमुळे संभ्रम वाढत असल्याचं
पवार यांनी सांगितलं. सरकारी कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी सरकारची असल्याचं
पवार यांनी नमूद केलं.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त राज्यात ‘महाराष्ट्र
श्री अन्न अभियान’ राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी
ही माहिती दिली. १ एप्रिल ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत पौष्टिक तृणधान्याची उत्पादन
वाढ, तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी विकास यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र श्री अन्न
अभियान सुरु करणे आणि त्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या तरतूदीची घोषणा केली हेाती. यासाठी
सोलापूर इथं ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात येणार असल्याचंही फडणवीस
यांनी सांगितलं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’
या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता
आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान,
या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचे विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय
घेतला आहे.
****
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध
प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा
विभागाला दिल्या आहेत. हिंगोली जिल्हा अनुशेष निर्मूलनाबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं
आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार संतोष बांगर, जलसंपदा विभागाचे
अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, उपस्थित होते. या यासंदर्भातील अपेक्षित तांत्रिक बाबी
पूर्ण करून जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी
यावेळी दिल्या. तसंच बंधाऱ्यांचे धरणांमध्ये रुपांतर करण्याचे धोरणही लवकरच निश्चित
करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या कुंजखेडा
आरोग्य उपकेंद्रात, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करुन रुग्णालय
सुरु करण्याची मागणी, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा
शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. कुंजखेडा इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत,
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे, मात्र याठिकाणी अद्याप
वैद्यकिय अधिकारी आणि डॉक्टरांची भरतीच न केल्यानं रुग्णालय सुरू होऊ शकलेलं नाही,
याकडे खासदार जलिल यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वा
निमित्त संध्याछाया वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरिकांचं जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबीर
घेण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा
गांधी निराधार योजनांची अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांनी माहिती दिली. समाज
कल्याण अधिकारी बि.एस.दासरी यांनी ज्येष्ठ नागरिकांना विभागाच्या विविध योजनांची माहिती
दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध
ठिकाणी प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरासंबंधी कारवाई करण्यात येत आहे. यावेळी करण्यात आलेल्या
कारवाईत एकशे सात किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करून एक्कावन्न हजार पाचशे रूपयांचा
दंड आकारण्यात आला. महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने
संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात येत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मौजे वाकद इथं जल जीवन मिशन
अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यासाठी एक कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार रुपयांचा
निधी मंजूर झाला असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त
छत्रपती संभाजीनगर इथं विशेष प्रचार कार्यक्रम घेण्यात आला. तहसीलदार छाया पवार यांनी
या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यावेळी पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली
तसंच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
****
No comments:
Post a Comment