Friday, 21 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 21.04.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 21 April 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राज्य सरकारनं दाखल केलेली मराठा समाज आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

·      मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अचूक नियोजन करण्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

·      वाढत्या तापमानामुळे राज्यातल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना, आजपासून सुटी जाहीर

·      महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्याकरता, एक सदस्यीय समिती नियुक्त

·      अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

·      छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस मोठ्या प्रमाणावर हप्ता वसुली करत असल्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

आणि

·      आय पी एल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स विजयी

 

सविस्तर बातम्या

मराठा समाज आरक्षण प्रकरणात राज्य सरकारनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातून राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं होतं, या निर्णयावर राज्य सरकारनं पुन्हा ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळल्यानंतर मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, पुन्हा याचिका दाखल करायची असेल तर सरकार करेल, असं सांगितलं. ते म्हणाले,

Byte…

जस्टीस भोसले कमिटीने, त्यांचं असंच म्हणणं होतं की रिव्ह्यू पिटिशन मध्ये स्कोप कमी आहे. तरी सुद्धा ती दाखल केली होती, मागच्या सरकारमध्ये. परंतू आता जे काही मराठा आरक्षणासाठी जे फुल प्रूफ करण्याची आवश्यकता आहे, ते बिलकुल केलं जाईल. त्यासाठी क्यूरेटिव्ह पिटिशन असेल, किंवा आणखी जे काही करावं लागेल, ते पूर्णपणे आमचं सरकार करेल. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार आमचं कटीबद्ध आहे.

 

मराठा आरक्षणासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करणं महत्त्वपूर्ण आहे, किमान यानंतर तरी राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्ष ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल, अशी अपेक्षा असल्याचं चव्हाण म्हणाले.

या निर्णयानंतर मराठा आरक्षणाचे सर्व मार्ग बंद झाले असं नाही, तर यापुढे सुधारणा- क्यूरेटिव्ह याचिका करता येईल, असं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं लवकरात लवकर योग्य पावलं उचलावीत, असं आवाहन त्यांनी केलं.

****

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक आणि गुणांकन कार्यपद्धतीचं अचूक नियोजन करावं, असे निर्देश, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीच्या अनुषंगानं गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समितीसमवेत, काल मुंबईत झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. राज्यातली अकृषी विद्यापीठं, संलग्नित महाविद्यालयं तसंच स्वायत्त महाविद्यालयांत, आगामी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यासाठी करावयाची कार्यवाही, अणि त्याअनुषंगानं धोरणात्मक निर्णय, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सुकाणू समितीनं राज्य शासनास सादर केलेला अंतरीम अहवाल यावेळी स्वीकृत करण्यात आला.

****

नगरविकास दिनानिमित्त विविध पुरस्कारांचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण झालं. यामध्ये शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा २०२२मधल्या विजेत्यांमध्ये, क वर्ग महानगरपालिका गटात, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं प्रथम आणि डोंबिवली महानगरपालिकेनं द्वितीय पुरस्कार मिळवला आहे. ब वर्ग नगरपरिषद गटामध्ये मराठवाड्यातल्या हिंगोली नगरपरिषदेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. क वर्ग नगरपरिषद गटामध्ये परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था, जिव्हाळा ठेऊन काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,

 

Byte…

वाढतं नागरिकरण जेंव्हा होतं तेंव्हा त्याच्यावर ज्या काही सोयी-सुविधा आवश्यक आहेत मग मुलभूत सोयी-सुविधा मग रस्ते आहेत, पिण्याचं पाणी आहे, आरोग्य आहे, स्वच्छता आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, फक्त मोठ्या टोलेजंग इमारती झाल्या म्हणजे विकास झाला असं होत नाही तर त्या शहरामध्ये त्यांना जी काही विरंगुळ्याची साधने आहेत, उद्यानं आहेत खेळाला मैदान आहेत, ॲमेनिटीज आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत देण्याचं देखील काम जर केलं तर नक्कीच त्या अधिकाऱ्याचं नाव कायम त्या ठिकाणी राहत असतं.

 

विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमांतून वाढत्या नागरिकीकरणाला सोयी देण्याचा शासन प्रयत्न करत असल्याचं सांगून, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

वाढत्या तापमानामुळे राज्यातल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना, आजपासून सुटी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं काल याबाबतचा शासन निर्णय जारी केला. राज्यातल्या इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनानं त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

****

रायगड जिल्ह्यातल्या खारघर इथं ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातली वस्तुस्थिती तपासण्याकरता, एक सदस्यीय समिती काल नियुक्त करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची ही समिती, एका महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातल्या अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही ही समिती शासनाला शिफारसी करणार आहे.

****

खारघर दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, राज्यपाल रमेश बैस यांना पत्राद्वारे केली आहे. सुरुवातीला उष्माघातानं १४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यानंतर समाजमाध्यमातून वेगवेगळी माहिती उघडकीला येत आहे. जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीपेक्षा जास्त मृत्यू झाले, अशा अनेक बाबी टप्प्याटप्प्यानं समोर येत आहेत. या सर्व बाबींची शहानिशा करून सत्य जनतेसमोर येणं आवश्यक आहे, असं पवार यांनी आपल्या पत्रात नमुद केलं आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. राठोड यांच्या कार्यालयातले अधिकारी मोठ्या रकमेची मागणी करतात, हा महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट आणि केमिस्ट संघटनेचा आरोप, भ्रष्टाचार कुठवर गेला आहे याचं उत्तम उदाहरण आहे, अशी टीका पटोले यांनी केली. मंत्रालायातूनच पैसे मागितले जात आहेत हे चिंताजनक असून, राठोड यांच्यावर याआधी जमीन घोटाळ्याचा आरोप होता, पण त्याचीही चौकशी झाली नाही. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही गायरान जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप आहेत, असं पटोले म्हणाले. खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी १३ कोटी रुपये कशावर खर्च केले यावरही शंका उपस्थित केली जात असून, यातही घोटाळा केल्याचा आरोप केला जात असल्याचं पटोले म्हणाले.

****

उद्योगपती गौतम अदानी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी या दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या भेटीवेळी अन्य कोणीही उपस्थित नव्हतं.  हिंडेनबर्ग अहवालावरुन देशातले विरोधी पक्ष अदानींवर तीव्र टीका करत आहेत. संसदेच्या संयुक्त समिती मार्फत याची चौकशी व्हावी, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव असं नामांतर करण्यासंदर्भातल्या निर्णयावर सूचना आणि हरकतींची छाननीची प्रक्रिया सध्या सुरु असल्यानं दहा जून पर्यंत अंतिम अधिसूचना जारी केली जाणार नाही, असं राज्य सरकारनं काल उच्च न्यायालयात सांगितलं. धाराशिव नामांतराच्या राज्य सरकारच्या निर्णयाला १७ नागरीकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून, हा निर्णय राजकीय हेतुने आणि धार्मिक भावनेनं घेतल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. ही याचिका प्रलंबित असतानाच केंद्र आणि राज्य सरकारने नामांतर करुन अधिसूचना काढल्याच्या विरोधात पुन्हा एक याचिका दाखल करण्यात आली आहे. उस्मानाबाद शहराचं नामांतर धाराशिव करणारी अंतिम अधिसूचना काढण्यात आली असली तरी, जिल्हा प्रशासनाबरोबर सर्व संबंधित यंत्रणांना अंतिम अधिसूचना येईपर्यंत धाराशिव नावाचा वापर करु नये, अशा सूचना देण्यात येतील, असं राज्य सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस मोठ्या प्रमाणावर हप्ता वसुली करत असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शहरात दंगल रोखण्यात, गुन्हेगारांवर कारवाई करण्यात पोलिस कमी पडले, शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून पोलिस त्यांच्याकडून हप्ते घेतात, असा आरोप दानवे यांनी केला. या संदर्भातली एक यादीही त्यांनी सादर केली. पोलिस आयुक्त कारवाई करत नसल्यानं या संदर्भात आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं दानवे म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सात बाजार समित्यांच्या निवडणुकीत ३७८ उमेदवार रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७६ जणांनी अर्ज मागे घेतले. अंतिम उमेदवारांना उद्या निवडणूक चिन्हांचं वाटप होणार असून, येत्या २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

****

जालना जिल्ह्यात भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्यातल्या काही भागात काल वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसामुळे कांदा बियाणं, पिकांसह आंब्याच्या पिकाचं काही प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. भोकरदन इथं गारपीट झाल्याचं वृत्त आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी तसंच अजिंठा गावात काल संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस झाला.

नांदेड शहर आणि परिसरात काल रात्रीच्या वेळी वादळी वारा सुटला होता, त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला.

बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. परळी - गंगाखेड रस्त्यावर दादाहरी वडगाव इथं संगीता आमले या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

****

इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल मोहाली इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जस्‌ संघावर २४ धावांनी विजय मिळवला. रॉयल चँलेज बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करतांना वीस षटकांत चार बाद १७४ धावा केल्या. विजयाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जस्‌चा डाव एकोणीसाव्या षटकात दीडशे धावांवर संपुष्टात आला.

अन्य एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सनं २० षटकात १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या संघानं एकोणिसाव्या षटकात १२८ धावा करत विजय मिळवला.

****

परभणी जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची कामं एकत्रित करण्याऐवजी स्वतंत्र करावीत, असे निर्देश, खासदार संजय जाधव यांनी दिले आहेत. जिल्हा विकास, समन्वय आणि सनियंत्रण समिती- दिशाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यापूर्वी १६ गावांची एकत्रित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात अडचण आली होती,  त्याच धर्तीवर पुन्हा चार गावांची पाणीपुरवठा योजना एकत्रित सुरु न करता स्वतंत्र करण्याच्या सूचना जाधव यांनी केली.

****

सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवत रोड दरम्यान रेल्वे रुळाचं काम करण्याकरता उद्या शनिवारी पाच तास रेल्वे वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती, दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे. यामुळे मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस सव्वा दोन तास उशिरा धावणार आहे. तसंच नांदेड - पुणे एक्स्प्रेस ५० मिनिटं, काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस सव्वा तीन तास, तर नगरसोल - नरसापूर एक्स्प्रेस दीड तास उशिरा धावणार आहे.

परवा रविवारी धर्माबाद इथून पहाटे चार वाजता सुटणारी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस एक तास उशिरा सुटणार असल्याचं रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात एका टेम्पोतून १०२ गाई - वासरांची वाहतूक करत असताना, ६६ गायी आणि वासरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. एकाच टेम्पोमधून दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी ही जनावरं नेली जात असताना पोलिसांनी हा टेम्पो पकडला असता, तब्बल २१ जनावरांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर गंभीर जखमा तसंच अन्य कारणांनी आणखी ४५ जनावरांचा मृत्यू झाला. दोन दिवसात मृत्यू झालेल्या जनावरांचा आकडा ६६ वर पोहोचला आहे, तर ३६ जनावरांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणी वाहन चालक आणि मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

‘जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या विकासाची’ या उपक्रमात, वैयक्तिक, सामुहिक योजनांबरोबरच दिव्यांगांना देखील लाभ पोहोचवावा, असे निर्देश बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. यासंबंधिच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे लाभ देण्यासाठी, बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख ऊसतोड कामगार असल्याचं त्या म्हणाल्या.

****

उष्णतेचा कडाका वाढल्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र दर्शनाच्या वेळेत आजपासून बदल करण्यात आला आहे. प्रकल्पातल्या मुख्य परिसरात  पर्यटकांना फिरण्यासाठी पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊ आणि दुपारी तीन ते संध्याकाळी सात अशी राहणार आहे. उन्हाच्या तडाख्यापासून पर्यटकांचं संरक्षण व्हावं, याकरता हा  बदल केल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...