Saturday, 22 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 22.04.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 April 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटीव्ह याचिका दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      सरकारने आरक्षण मर्यादेबाबत भूमिका स्पष्ट करावी-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

·      नागरी सेवा दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट प्रशासन पुरस्कार सोहळ्यात लातूर आणि सोलापूरचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

·      राज्यात तसंच देशात सध्या दिसत असलेलं चित्र चिंताजनक-खासदार शरद पवार यांची टीका

·      गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांची कामं जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना

·      रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      बालविवाह प्रतिबंधासाठी विविध जिल्हा प्रशासनांकडून जनजागृती मोहीम

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा सनरायजर्स हैदराबादवर सात गडी राखून विजय


सविस्तर बातम्या

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह उपचारात्मक याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सरकार मराठा समाजाच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…

Byte…

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते पूर्णपणे सरकार फुल प्रुफ करेल अशा प्रकारची चर्चा झाली. मी एवढंच सांगतो, पूर्वी आरक्षण रद्द करतांना ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचं काम राज्य सरकार करेल. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्‌ध आहे. तोपर्यंत ज्या सुविधा इतर समाजाला ज्या मिळतायत, त्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना असेल, मराठा समाजाच्या तरूणांना असतील, त्या दिल्या जातील.

 

या बैठकीत मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. समाजाच्या आर्थिक, सामाजिक तसंच शैक्षणिक मागासलेपणासंदर्भात, सामाजिक संस्थेकडून सखोल सर्वेक्षण करण्यात यावं, मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीच्या दिवशी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेण्यात यावी, आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. याविषयावर विरोधी पक्ष नेत्यांशीही राज्य सरकार चर्चा करणार आहे.

****

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेले निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी असल्याचं, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते. इंद्रा साहनी प्रकरणातली ५० टक्के मर्यादा, ही मराठा आरक्षणातला मूळ अडसर आहे. राज्य सरकार गंभीर असेल तर या आरक्षण मर्यादेबाबत भूमिका तसंच पुढील धोरण स्पष्ट करावं, अशी मागणी चव्हाण यांनी केली. आरक्षण मर्यादा शिथिल झाली तर मराठा समाजासह देशभरातल्या अनेक समाजाच्या आरक्षणांच्या मागण्या मार्गी लागू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मराठा समाजाचा इतर मागासवर्ग -ओबीसीत सामवेश केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होते. सरकारची आरक्षण देण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करणं, हा एकमेव संवैधानिक मार्ग असल्याचं भानुसे यांनी म्हटलं आहे.   

****

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथून मराठा वनवास यात्रा काढण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी सहा मे रोजी ही यात्रा तुळजापूर इथून निघणार असून, सहा जून श्री शिव राज्याभिषेक दिनी ही यात्रा मुंबईत मंत्रालयावर पोहोचणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धाराशिवच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना काल याबाबत निवेदन देण्यात आलं.

****

नागरी प्रशासनामधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पुरस्कार काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोविड काळात आणि नंतरही आरोग्य मंत्रालयानं राबवलेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेला यावेळी पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याला ‘आरोग्यवर्धिनी’ उपक्रमासाठी तर सोलापूर जिल्ह्याला ‘ऑपरेशन परिवर्तन’ या उपक्रमासाठी, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारानं’ गौरव करण्यात आलं. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकारानं, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत, विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचं निदान, उपचार संदर्भ सेवा, इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची, प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या, ऑपरेशन परिवर्तन मुळे, जिल्ह्यातल्या अवैध दारू व्यवसायाला आळा बसला आहे. स्थानिक जनतेला स्वयंरोजगाराची साधनं उपलब्ध झाल्यामुळे ते अवैध दारू विक्रीपासून परावृत्त झाले आहेत.

****

नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातल्या तेरा पुरस्कारांचं वितरण, काल करण्यात आलं. आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत असतांना, नवनवीन संकल्पना राबवून अधिक संवेदनशीलपणे काम करावं, कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्तव्यं बजावायला हवीत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

राज्यात तसंच देशात सध्या जे चित्र दिसत आहे, ते चिंताजनक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात बोलत होते. गुजरात दंगलीतल्या आरोपींना मुक्त करणं ही कायदा आणि संविधानाची हत्या असल्याची टीका करत, पवार यांनी केंद्र तसंच राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या विधानाच्या आधारे, पवार यांनी केंद्राच्या भूमिकेवर टीका केली. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला पूर्णपणे राज्यसरकार जबाबदार असून, या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात घोषणांशिवाय काहीही मदत पडलेली नाही, असंही पवार यांनी नमूद केलं.

****

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने झालेले मृत्यू आणि सरकारने जारी केलेली आकडेवारी यात तफावत असल्याचं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबतची वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी न्यायालयीन चौकशीची मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचं, त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर येत असलेल्या चित्रफितींमुळे संभ्रम वाढत असून, सरकारी कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी सरकारची असल्याचं पवार यांनी नमूद केलं.

****

 

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त राज्यात ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. एक एप्रिल ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत पौष्टिक तृणधान्याची उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी विकास, यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात, महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरु करणं, आणि त्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या तरतूदीची घोषणा केली हेाती. यासाठी सोलापूर इथं ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचे विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

****

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांची कामं जलदगतीनं पूर्ण करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. हिंगोली जिल्हा अनुशेष निर्मूलनाबाबत, काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार संतोष बांगर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, यावेळी उपस्थित होते. या यासंदर्भातल्या अपेक्षित तांत्रिक बाबी पूर्ण करून जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी केली. तसंच बंधाऱ्यांचं धरणांमध्ये रुपांतर करण्याचं धोरणही लवकरच निश्चित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****


ईद उल फित्र - रमजान ईद आज साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या ईदहाग मैदानावर यानिमित्त विशेष नमाज अदा करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रेम, करुणा आणि एकमेकांमध्ये स्नेह वृद्धींगत करतो, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

ईद उल फित्र चा सोहळा म्हणजे एकत्र येत आनंद साजरा करण्याची एक चांगली संधी असते, असं धनखड यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो आणि परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो, अशी प्रार्थना करत असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. तर ईद-उल-फित्र संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दाऊदी बोहरा समाजानं काल ईद - उल - फित्र साजरी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दाऊदी बोहरा समाज बांधवांनी पारंपारिक वेषभूषेत मशिदींमध्ये नमाज अदा करुन आरोग्य, सुख आणि शांतीसाठी प्रार्थना केली.

****

अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सकारात्मक ऊर्जा देणारा हा सण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महात्मा बसवेश्वर जयंती आणि परशुराम जयंतीही आज साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा उत्सव समितीच्या वतीने वाहन फेरी काढण्यात येत आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं बसवेश्वर चौकात ध्वजारोहण होणार आहे.

परशुराम जयंतीनिमित्त ब्राम्हण समाज समन्वय समितीच्या वतीनं औरंगपुरा इथं स्तंभपूजन केलं जाणार आहे. यानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर शहरातून वाहन रॅली काढण्यात आली.

****


अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर नागरिकांना मालमत्तेसंदर्भातले व्यवहार सुलभतेने करता यावे, यासाठी आज आणि उद्या शासकीय सुट्टीच्या दिवशीही राज्यातले सह दुय्यम निबंधक कार्यालयं सुरू राहणार आहेत. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे यांनी हे निर्देश दिले.

 

साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला, राज्यात अनेक ठिकाणी विवाह सोहळे आयोजित केले जातात. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांनी बालविवाह निर्मूलन जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

परभणी जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी, जिल्हा प्रशासनातल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची, प्रत्येक गावाकरता सुकाणू अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे अधिकारी संबंधित गावात प्रत्यक्ष भेट देऊन गावातल्या विवाहाच्या नोंदी, तसंच ग्राम पंचायतींमधील विवाह नोंदणी तपासणार आहेत. याबरोबरच गावात विवाह होत असल्यास वधु आणि वर यांच्या वयाची खात्री करणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन तातडीने १०-९-८ आणि ११२ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

धाराशिव जिल्ह्यातही बालविवाह रोखण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी, यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, फेरी इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निर्देश दिले आहेत.

बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनंही बाल विवाह निर्मूलन जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनराईजर्स हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने दिलेलं १३५ धावांचं लक्ष्य, चेन्नईच्या संघानं एकोणिसाव्या षटकात पूर्ण केलं.

या स्पर्धेत आज लखनौ सुपर जायन्ट्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या कुंजखेडा आरोग्य उपकेंद्रात, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करुन रुग्णालय सुरु करण्याची मागणी, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. कुंजखेडा इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे, मात्र याठिकाणी अद्याप वैद्यकिय अधिकारी आणि डॉक्टरांची भरतीच न केल्यानं रुग्णालय सुरू होऊ शकलेलं नाही, याकडे खासदार जलिल यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वानिमित्त संध्याछाया वृध्दाश्रमात, ज्येष्ठ नागरिकांचं जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजनांची, अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांनी माहिती दिली. समाज कल्याण अधिकारी बि.एस.दासरी यांनी ज्येष्ठ नागरिकांना विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कनेरगाव नाका परिसरात काल सोसाट्याचा वारा तसंच विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतपीकांचं मोठं नुकसान झालं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...