आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ एप्रिल २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक वसुंधरा दिवस आज साजरा होत आहे. 'आपल्या ग्रहामध्ये
गुंतवणूक करा' अशी यावर्षीची वसुंधरा दिनाची संकल्पना आहे. पृथ्वी आपल्याला देतच असते, आणि हा प्रवाह
निरंतर राखण्यासाठी आपणही आपल्या प्रयत्नांची गुंतवणूक तिच्यासाठी निरंतर करत राहिलं
पाहिजे, असा या संकल्पनेचा हेतू आहे. यानिमित्त दिलेल्या
संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी काम
करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं आहे. भारत
निसर्गाशी सुसंगत राहण्याच्या आपल्या संस्कृतीच्या अनुषंगाने शाश्वत विकासासाठी कटिबद्ध
असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
***
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं घेण्यात
आलेल्या विशेष प्रचार कार्यक्रमाचं उद्घाटन तहसीलदार
छाया पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी पोवाड्याच्या माध्यमातून
जनजागृती करण्यात आली तसंच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
***
ईद उल फित्र आज साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर यानिमित्त नमाज
अदा करण्यात आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण देखील आज साजरा होत आहे. यानिमित्तानं घर, मौल्यवान दागिने आणि अन्य वस्तू खरेदीसाठी
बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.
महात्मा बसवेश्वर जयंती आणि परशुराम जयंतीही आज साजरी
होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा उत्सव समितीच्या
वतीनं वाहन फेरी काढण्यात आली, तसंच शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं
बसवेश्वर चौकात ध्वजारोहण करण्यात आलं.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मौजे वाकद इथं जल जीवन मिशन
अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन, विधान परिषदेचे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते काल झालं. यासाठी
एक कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध ठिकाणी
प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरासंबंधी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत एकशे सात किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करून
एक्कावन्न हजार पाचशे रूपयांचा दंड आकारण्यात आला.
//***********//
No comments:
Post a Comment