Friday, 22 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 22.09.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 22 September 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे जी-२० समुहाशी संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करतील. जी ट्वेंटी शिखर परिषद यशस्वी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं, असे सुमारे ३ हजार लोक या संवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेषत: शिखर परिषद सुरळीत पार पाडण्यासाठी ज्यांनी तळागाळातील स्तरावर काम केलं आहे, त्यांचा यात समावेश असणार आहे.

****

भारतातले वैद्यकीय क्षेत्रातले पदवीधर आता अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकणार आहेत तसंच वैद्यकीय व्यवसाय करु शकणार आहेत. भारताच्या राष्ट्रीय चिकित्सा आयोग -एनएमसीला १० वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागतिक महासंघानं मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळं भारतीय आयुर्विज्ञान शिक्षण संस्था आणि वैद्यकीय व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे तसंच त्यांची प्रतिष्ठाही वाढणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रीलयानं म्हटलं आहे.

****

चंद्रावर १४ दिवसांच्या अंतरानंतर पहाट होणार असून चांद्रयान-३ चा दुसरा टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. इस्रो चांद्रयानशी संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. चांद्रयान -३ चे सौरऊर्जेवर चालणारे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर, त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हे प्रयत्न यशस्वी झाल्यास, ते हा वैज्ञानिक प्रयोग चालू ठेवू शकतील, असा विश्वास केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेत "चांद्रयान-३ चं यश आणि अंतराळ क्षेत्रातील आपल्या राष्ट्राची इतर बाबतीत कामगिरी" या विषयावर काल आठ तासांहून अधिक काळ चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना डॉ. सिंह बोलत होते. कम्युनिकेशन सर्किट सक्रिय झाल्यानंतर चंद्र मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करणारा भारत जगातला पहिला देश बनेल, असं डॉ. सिंह यावेळी म्हणाले. लँडर आणि रोव्हर यांना अनुक्रमे गेल्या चार आणि दोन सप्टेंबर रोजी १४ दिवसांच्या चांद्र रात्रीच्या आधी विश्रांती देण्यात आली होती.

****

दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या प्रगतीची ९६.६० टक्के कामं पूर्ण झाली असून विद्युत खांबाच्या उभारणीचं काम सुरु आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि प्रकल्पातली उर्वरित कामं गुणवत्तेसह झपाट्यानं पूर्ण करण्याचे निर्देश दिले. हा प्रकल्प प्रदेशाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे, असं मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारचं सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण मंत्रालय आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं बीड जिल्ह्यातल्या दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरातल्या पात्र लाभार्थ्यांना परवा- रविवारी सहाय्यक साधनांचं वितरण करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण सोहळा होणार आहे.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या होंगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत साथियान ज्ञानसेकरन, अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांच्या भारतीय पुरुष टेबल टेनिस संघानं आज येमनचा ३-० ने सहज पराभव केला. या स्पर्धेत आज भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा सामना सिंगापूरशी होणार आहे.

****

सर्बियाच्या बेलग्रेड इथं सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत भारताची युवा पहेलवान अंतिम पंघालनं ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. या कामगिरीद्वारे तिनं भारतासाठी २०२४ पॅरिस ऑलिंपिकसाठीची पात्रताही मिळवली आहे. एकोणीस वर्षीय पंघालनं कास्य पदकासाठीच्या लढतीमध्ये युरोपीय स्पर्धेच्या दोनवेळच्या विजेत्या एम्मा जोना डेनीसवर १६-६ अशी सहज मात केली. भारताचं यंदाच्या या स्पर्धेतलं हे पहिलचं पदक आहे. पंघालनं जागतिक स्पर्धेत भारतासाठी जिंकलेलं हे तेवीसावं पदक असून यात एक सुवर्ण, ५ रौप्य आणि १७ कांस्यपदकांचा समावेश आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज मोहाली इथं होणार आहे. पंजाब क्रिकेट संघटनेच्या आयएस बिंद्रा क्रीडा संकुलात खेळवला जाणारा हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...